Purandar Airport Project Pudhari
पुणे

Purandar International Airport: पुरंदर आंतरराष्ट्रीय विमानतळामुळे दौंड-पुरंदरच्या विकासाला वेग; खोर परिसरातील जमिनींचे भाव गगनाला

छत्रपती संभाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ प्रकल्पामुळे अर्थकारणाला नवे वळण; शेतकऱ्यांसाठी ‘सुगीचे दिवस’ येण्याची चिन्हे

पुढारी वृत्तसेवा

रामदास डोंबे

खोर : पुरंदर तालुक्यात साकारत असलेल्या छत्रपती संभाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ प्रकल्पामुळे संपूर्ण दौंड-पुरंदर तालुक्याच्या विकासाला अभूतपूर्व गती मिळणार आहे. राज्य शासनाने या महत्त्वाकांक्षी प्रकल्पासाठी सुमारे 6 हजार कोटी रुपयांचे कर्ज मंजूर केले असून, सुमारे 900 हेक्टर क्षेत्राच्या भूसंपादन प्रक्रियेला वेग आला आहे.

या पार्श्वभूमीवर परिसरातील शेतजमिनींच्या बाजारभावात मोठी उसळी येण्याची शक्यता व्यक्त होत आहे. काही ठिकाणी प्रतिएकर 2 कोटी रुपयांपर्यंत दर मिळू शकतो, अशी जोरदार चर्चा सुरू आहे. त्यामुळे अनेक वर्षे अल्पभावात असलेल्या जमिनी आता सोन्याच्या मोलाच्या ठरण्याची चिन्हे स्पष्ट दिसू लागली आहेत.

या पार्श्वभूमीवर परिसरातील शेतजमिनींच्या बाजारभावात मोठी उसळी येण्याची शक्यता व्यक्त होत आहे. काही ठिकाणी प्रतिएकर 2 कोटी रुपयांपर्यंत दर मिळू शकतो, अशी जोरदार चर्चा सुरू आहे. त्यामुळे अनेक वर्षे अल्पभावात असलेल्या जमिनी आता सोन्याच्या मोलाच्या ठरण्याची चिन्हे स्पष्ट दिसू लागली आहेत.

खोर गाव विकासाच्या उंबरठ्यावर

दौंड तालुक्यातील खोर गाव हे विमानतळ हद्दीपासून अगदी जवळ असल्याने या प्रकल्पाचा सर्वाधिक सकारात्मक परिणाम येथे दिसून येणार आहे. एकेकाळी बाजारात विचारही न झालेल्या जमिनींना आता गुंतवणूकदारांकडून मागणी वाढू लागली आहे. विमानतळ उभारणीमुळे खोर गावातील शेतकरी वर्गाच्या आर्थिक स्थितीत आमूलाग््रा बदल घडण्याची शक्यता आहे. जमीनमूल्यवाढ, बांधकाम व्यवसाय, निवासी प्रकल्प, व्यावसायिक संकुले, गोदामे, हॉटेल्स आणि सेवा क्षेत्रात मोठी वाढ होण्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे.

लॉजिस्टिक पार्कमुळे औद्योगिक संधी

आंतरराष्ट्रीय विमानतळ परिसरात लॉजिस्टिक पार्क उभारण्याची योजना प्रस्तावित असून, त्यामध्ये खोर गावाचा काही भाग समाविष्ट होण्याची चिन्हे आहेत. या माध्यमातून स्थानिक युवकांसाठी रोजगाराच्या नव्या संधी निर्माण होतील. शेतीपुरता मर्यादित असलेला हा भाग आता औद्योगिक आणि व्यापारी दृष्टिकोनातून महत्त्वाचा ठरणार आहे.

रस्ते विकासाला मिळणार चालना

खोर गावातून जाणारा डोंबेवाडी घाटमार्ग हा विमानतळाकडे जाण्यासाठी अत्यंत जवळचा आणि सोयीचा मार्ग ठरणार आहे. त्यामुळे या मार्गाच्या मजबुतीकरण व रुंदीकरणाच्या 8पान 3 वर

कामांना प्राधान्य मिळण्याची शक्यता आहे. गावातील अंतर्गत रस्ते, पाणीपुरवठा, वीजपुरवठा यांसारख्या पायाभूत सुविधांनाही वेग येणार आहे.

आर्थिक परिवर्तनाचा केंद्रबिंदू

पुरंदर आंतरराष्ट्रीय विमानतळ हा केवळ वाहतूक सुविधा वाढवणारा प्रकल्प नसून, तो संपूर्ण दौंड-पुरंदर परिसराच्या सामाजिक व आर्थिक परिवर्तनाचा केंद्रबिंदू ठरणार आहे. दुष्काळी छाया सहन केलेल्या या भागासाठी हा प्रकल्प विकासाचा नवा अध्याय लिहिणार असल्याचे चित्र स्पष्ट होत आहे. खोर गावातील शेतकरी वर्गासाठी हे ‌’सुगीचे दिवस‌’ सुरू होण्याची चाहूलच मानावी लागेल. एकंदरीत विकासाच्या आकाशात झेप घेणाऱ्या या प्रकल्पामुळे खोर गाव आणि परिसराचा चेहरामोहरा बदलणार हे निश्चित मानले जात आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT