Purandar Airport Project Pudhari
पुणे

Purandar International Airport Funding Delay: पुरंदर आंतरराष्ट्रीय विमानतळ निधीअभावी रखडला; 6 हजार कोटींची प्रतीक्षा

जमीन संपादन, परवानग्या आणि निधीअभावी प्रकल्पाला विलंब; पैसे कोणत्याही क्षणी मिळण्याची शक्यता

पुढारी वृत्तसेवा

पुणे: पुणे जिल्ह्याच्या विकासासाठी महत्त्वाकांक्षी मानल्या जाणाऱ्या पुरंदर आंतरराष्ट्रीय विमानतळ प्रकल्पाला अद्याप निधीची प्रतीक्षा आहे. केंद्र आणि राज्य शासनाच्या स्तरावर प्रकल्पास तत्त्वतः मान्यता मिळूनही प्रत्यक्ष कामाला सुरुवात होण्यासाठी आवश्यक आर्थिक तरतूद अद्याप झालेली नाही. दरम्यान, कोणत्याही क्षणी पैसे येतील, अशी माहिती जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी दिली.

पुरंदर तालुक्यातील पारगाव, कुंभारवळण, एकहतपूर आदी गावांच्या परिसरात हा विमानतळ उभारण्याचे नियोजन करण्यात आले आहे. पुणे शहरातील वाढती लोकसंख्या, उद्योगधंद्यांचा विस्तार आणि विद्यमान लोहगाव विमानतळावरील ताण लक्षात घेता नवीन विमानतळाची गरज अधोरेखित झाली आहे. मात्र, निधीअभावी प्रकल्पाची गती मंदावली आहे. राज्य शासनाने प्रकल्पासाठी जमीन संपादनाची प्रक्रिया सुरू केली असली तरी शेतकऱ्यांना योग्य मोबदला आणि पुनर्वसनाच्या मागण्यांवर अजूनही समाधानकारक तोडगा निघालेला नाही.

याशिवाय पर्यावरणीय परवानग्या, तांत्रिक अहवाल आणि केंद्र शासनाकडून अंतिम मंजुरी या टप्प्यांमध्येही विलंब होत असल्याचे दिसून येते. उद्योग क्षेत्राकडून मात्र या प्रकल्पाकडे मोठ्या अपेक्षेने पाहिले जात आहे. पुणे हे आयटी, ऑटोमोबाईल आणि स्टार्टअप क्षेत्राचे केंद्र बनत असताना आंतरराष्ट्रीय दर्जाचे विमानतळ उभारणे अत्यावश्यक मानले जात आहे. विमानतळ सुरू झाल्यास गुंतवणुकीत वाढ होऊन रोजगारनिर्मितीला चालना मिळेल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे. दरम्यान, स्थानिक लोकप्रतिनिधींनीही या प्रश्नावर शासनाचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न सुरू केला आहे.

निधी उपलब्ध करून देत प्रकल्पाला तातडीने गती द्यावी, अशी मागणी सातत्याने केली जात आहे. आगामी अर्थसंकल्पात या प्रकल्पासाठी विशेष तरतूद होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे. एकूणच, पुरंदर विमानतळ हा पुण्याच्या भविष्यातील विकासाचा महत्त्वाचा टप्पा मानला जात असला तरी निधीअभावी तो सध्या प्रतीक्षेतच आहे. शासनाने लवकरात लवकर निर्णय घेतल्यास प्रकल्पाला गती मिळून पुण्याच्या विकासाला नवे पंख मिळू शकतील.

कोणत्याही क्षणी येऊ शकतात पैसे

पुरंदर विमानतळासाठी कोणत्याही क्षणी सहा हजार कोटी रुपये प्राप्त होतील, अशी माहिती जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी दिली. ते म्हणाले, बँकेने पैसे देण्यास तयारी दर्शवली आहे. मात्र, प्रशासकीय नियमानुसार सर्व प्रकिया पूर्ण करण्यात येत आहे. ते पूर्ण झाले की कोणत्या क्षणी तत्काळ पैसे जमा होतील. आमची पूर्ण तयारी झालेली आहे. पैसे आले की लगेच आपण शेतकऱ्यांचे पॅकेज जाहीर करणार आहोत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT