

पुणे: राज्यातील 10 नगरपालिकांच्या हद्दीतील मिळकतींच्या मिळकतपत्रिका तयार करण्यासाठी हाती घेण्यात आलेल्या नक्शा प्रकल्पांतर्गत बारामती आणि चंद्रपूर या जिल्ह्यातील घुग्गुस या दोन नगरपालिकांमधील मिळकतींचे सर्वेक्षण पूर्ण झाले आहे. अन्य आठ नगरपालिकांमधील सर्वेक्षण येत्या एप्रिलअखेर पूर्ण होऊन मेअखेर सर्व 10 नगरपालिकांमधील मिळकतींची मिळकतपत्रिका तयार होतील, अशी माहिती जमाबंदी आयुक्त तथा भूमी अभिलेख संचालक शैलेश नवाल यांनी दिली. राज्यात काही शहरांमध्ये 1925 पासून सिटी सर्व्हे उपलब्ध आहे. याचाच आधार घेत शहरी स्वामित्व योजनेत शहरी भागातील मिळकतींना मिळकतपत्रिका देण्यात येत आहे. या योजनेला आता ‘नक्शा योजना’ असे संबोधण्यात येत आहे.
शहरी स्वामित्व योजनेत प्रायोगिक तत्त्वावर राज्यातील गोंदिया, आर्वी (जि. वर्धा), धर्माबाद (जि. नांदेड) तसेच मलकापूर व रहिमतपूर (जि. सातारा) या पाच शहरांचा समावेश करण्यात आला होता. या ठिकाणी देण्यात आलेल्या मिळकतपत्रिकेचा प्रयोग आता देशपातळीवर 100 शहरांमध्ये करण्यात येत आहे. त्यासाठी राज्यातील 10 शहरांचा समावेश आहे. सर्व्हे ऑफ इंडियाच्या माध्यमातून हे सर्वेक्षण केले जात आहे.
गेल्या मार्चमध्ये हा प्रकल्प सुरू करण्यात आला. त्यासाठी बारामती (जि. पुणे), पंढरपूर (जि. सोलापूर), वरणगाव (जि. जळगाव), मूर्तिजापूर (जि. अकोला), बुलडाणा, शिर्डी (जि. अहिल्यानगर), कुळगाव बदलापूर (जि. ठाणे), अंबरनाथ (जि. ठाणे), कन्नड (जि. संभाजीनगर), घुग्गुस (जि. चंद्रपूर) या 10 शहरांचा समावेश आहे. या सर्वेक्षणासाठी लिडार ड्रोनचा वापर केला जात आहे. यातून तयार होणारा नकाशा व नगरपालिकांनी प्राधिकृत केलेला लेआउटचा मंजूर नकाशा यांची सांगड घालून प्रत्यक्ष जमिनीवर पडताळणी केली जात आहे. यामुळे प्रत्येक घराचे किंवा त्या मालमत्तेचे अक्षांश व रेखांश निश्चित असल्याने त्याचा भौगोलिक संदर्भ ठरविला जाणार आहे. यानंतर मिळकतींची तपासणी करून मिळकतपत्रिका तयार करण्यात येत आहे.
याबाबत नवाल म्हणाले, या 10 शहरांमध्ये सर्वेक्षणाचे काम वेगाने सुरू आहे. प्रत्येक मिळकतीची पडताळणी महत्त्वाची असून, त्याबाबत अचूकता असण्यास भूमी अभिलेख विभागाचे प्राधान्य आहे. त्यातील बारामती आणि चंद्रपूर जिल्ह्यातील घुग्गुस या दोन शहरांमधील सर्वेक्षण पूर्ण झाले आहे. तर, अन्य 8 शहरांमधील सर्वेक्षण एप्रिलअखेर होणार आहे. या सर्व 10 शहरांमधील मिळकतींची मिळकतपत्रिका तयार होण्यासाठी मे महिना उजाडणार आहे. मिळकतपत्रिका तयार झाल्यानंतर यामुळे शहरांच्या नकाशांमध्ये अचूकता येणार आहे.
या भौगोलिक संदर्भांमुळे सातबारा उताऱ्यांवर एक क्रमांक आणि नकाशावर दुसराच क्रमांक हा विरोधाभास थांबणार आहे. त्यामुळे न्यायालयीन वादही संपुष्टात येतील. याच मिळकतपत्रिकेवर बँकांकडून कर्जही उपलब्ध होऊ शकेल.
मनपा, न. पं., न. पा.मध्येही राबविणार सिटी सर्व्हे
या प्रकल्पानंतर राज्यातील 29 महापालिका, 119 नगरपंचायती आणि 241 नगरपालिकांमध्येही सिटी सर्व्हे राबविण्यात येणार आहे. त्यामुळे नव्याने समाविष्ट झालेल्या गावांमध्ये सिटी सर्व्हे झाल्यानंतर महापालिका किंवा नगरपालिकांना विकास आराखडा तयार करण्यासाठी पुन्हा सर्वेक्षण करण्याची गरज भासणार नाही.