

पुणे: पुणे जिल्हा परिषदेत विविध विषय समित्यांच्या सभापतिपदांसाठी जोरदार चुरस निर्माण झाली असून, 2 एप्रिल रोजी होणाऱ्या निवडणुकीकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे. कृषी, बांधकाम, समाजकल्याण आदी महत्त्वाच्या समित्यांसाठी अनेक इच्छुकांनी जोरदार लॉबिंग सुरू केली आहे. त्यामुळे अंतिम क्षणी कोणाच्या गळ्यात सभापतिपदाची माळ पडते, याबाबत उत्सुकता शिगेला पोहचली आहे.
सभापतिपदाच्या शर्यतीत शांताराम इंगवले, करण खलाटे, सागर मिसाळ, विष्णू हिंगे, विक्रम खुटवड, अंकिता पाटील, तुषार थोरात, श्रीमंत ढोले आणि जितेंद्र बढेकर, सुनील राऊत, छाया तांबे, कल्पना काळे, मोनिका हरगुडे यांची नावे प्रामुख्याने पुढे येत आहेत. या सर्वांनी आपापल्या गटांतर्गत, तसेच वरिष्ठ पातळीवर पाठिंबा मिळवण्यासाठी हालचाली वेगात केल्या आहेत.
काही इच्छुकांनी जिल्हा परिषद सदस्यांशी संपर्क साधत मतांची जुळवाजुळव सुरू केली आहे.विशेषतः कृषी व बांधकाम या समित्या जिल्हा परिषदेत अत्यंत महत्त्वाच्या मानल्या जातात. ग््राामीण भागातील विकासकामांवर या समित्यांचा थेट प्रभाव असतो. त्यामुळे या सभापतिपदासाठी इच्छुकांमध्ये मोठी स्पर्धा दिसून येत आहे.
समाजकल्याण समितीचे सभापतिपदही राजकीयदृष्ट्या महत्त्वाचे असल्याने त्यासाठीही अनेक दावेदार पुढे सरसावले आहेत. दरम्यान, जिल्हा परिषदेत अलीकडेच नव्या सदस्यांची निवड झाल्याने गटबाजीचे समीकरणही बदलले आहे. त्यामुळे कोणता गट वरचढ ठरतो आणि कोणत्या इच्छुकाला संधी मिळते, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
पक्षांतर्गत समन्वय आणि वरिष्ठ नेत्यांचा कल यावरही अंतिम निर्णय अवलंबून राहणार असल्याचे राजकीय जाणकारांचे मत आहे. 2 एप्रिल रोजी होणारी ही निवडणूक जिल्हा परिषदेत पुढील सत्तासमीकरणांची दिशा ठरवणारी ठरणार आहे. त्यामुळे इच्छुकांबरोबरच कार्यकर्त्यांमध्येही उत्सुकतेचे वातावरण निर्माण झाले असून, निवडणुकीपूर्वी राजकीय हालचालींना वेग येण्याची चिन्हे आहेत.