वाल्हे: पिंपळे (ता. पुरंदर) येथील उच्चशिक्षित महेश गुलाब पोमण यांनी सासवड आणि पिंपळे येथील शेतीत सहा प्रकारच्या बेरी उत्पादनाचा यशस्वी प्रयोग केला आहे. रासबेरी, ब्लॅकबेरी, स्ट्रॉबेरी, मलबेरी, गोजबेरी, ब्लूबेरी अशा एकूण सहा प्रकारच्या बेरीची लागवड तीन एकर क्षेत्रावर केली आहे.
उच्चशिक्षित पोमण यांनी कोरोना महामारीच्या संकटात त्यांचा इंजिनिअरिंग वर्कशॉपचा व्यवसाय बंद केला. त्यानंतर शेतात नवनवीन प्रयोग करायला सुरुवात केली. बेरीला असलेली मागणी पाहता त्याचे उत्पन्न घ्यावे, असा विचार केला. बेरीची लागवड करून ”पोमण ॲग््राो फूड्स” ही कंपनी स्थापन केली. स्वतः मार्केटिंग करून पुणे, मुंबई, बंगळुरू, हैदराबाद, दिल्ली शहरात थेट माल पोहचविला.
सासवड येथे 10 गुंठे पॉलिहाउस भाडेतत्त्वावर घेऊन 10 जुलै 2025 रोजी रासबेरीच्या तीन व्हरायटींची लागवड केली. लागवड करताना टिश्यू कल्चरच्या 700 रोपांची निवड करण्यात आली. रोगप्रतिकारक क्षमता चांगली असणारी आणि महाराष्ट्रातील वातावरणास अनुकूल असणाऱ्या रोपांची निवड करण्यात आली. लाल राजा, राणी आणि प्रधान अशा जातींची निवड करण्यात आली. लागवडीनंतर 3 महिन्यांत रासबेरीचे उत्पादन सुरू झाले.
आत्तापर्यंत 10-12 हार्व्हेस्टिंग करण्यात आले आहे. या रासबेरीला बाजारात 2000 ते 4500 रुपये प्रतिकिलो बाजारभाव मिळत असल्याची माहिती उत्पादक पोमण यांनी दिली आहे. पिंपळे व सासवड येथील पोमण यांच्या शेतामध्ये रासबेरी 3 व्हरायटीची एकूण 700 रोपे, इंडियन ब्लॅकबेरी 1000 रोपे, विंटर डाऊन आणि स्वीट सेन्सेशन या स्ट्रॉबेरीच्या वाणाची 2000 रोपे, इंडियन मलबेरीची 3000 रोपे, इंडियन गोजबेरीची 1000 रोपे आणि बेरीलँड या वाणाच्या ब्लूबेरीची 200 रोपे लावली आहेत.
‘कमी क्षेत्रात जास्त उत्पादन आणि आधुनिक पद्धतीने शेती करून अधिक फायदा मिळविता येतो. पारंपरिक शेतीसोबतच आधुनिक शेतीला शेतकऱ्यांनी प्राधान्य दिले पाहिजे. शेतकऱ्यांनी नवनवीन प्रयोग आपल्या शेतात करावेत व अधिक फायदा करून घ्यावा.’महेश पोमण, शेतकरी