पुणे: पुरंदर तालुक्यात उभारण्यात येणाऱ्या प्रस्तावित छत्रपती संभाजीराजे आंतरराष्ट्रीय विमानतळासाठी भूसंपादन प्रक्रियेला वेग आला असून करारनाम्यांद्वारे संमती देण्याची मुदत आता १५ जुलैपर्यंत वाढविण्यात आली आहे. शेतकऱ्यांच्या मागणीनुसार हा निर्णय घेण्यात आला असल्याची माहिती जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी दिली. यापूर्वी ही मुदत ३० जूनपर्यंत होती.
विमानतळासाठी सात गावांतील एकूण १,२१६ हेक्टर जमिनीचे संपादन प्रस्तावित असून आतापर्यंत १,०१० हेक्टर जमीन प्रशासनाच्या ताब्यात आली आहे. या जमिनीच्या मोबदल्यापोटी जिल्हा प्रशासनाने सुमारे १,१५० कोटी रुपयांचे वाटप केले आहे.
राज्य शासनाने या प्रकल्पासाठी प्रति एकर १ कोटी ६१ लाख रुपयांचा मोबदला निश्चित केला आहे. भूसंपादनासाठी आवश्यक निधी उपलब्ध करून देण्याच्या प्रक्रियेलाही गती मिळाली आहे. एमआयडीसीकडून आणखी १,००० कोटी रुपयांचा निधी जिल्हा प्रशासनाकडे प्राप्त झाला असून उर्वरित मोबदला वितरणाची प्रक्रिया आता अधिक वेगाने पार पडणार असल्याचे डुडी यांनी सांगितले.
मोबदला वाटपात सुरुवातीला मूळ शेतकऱ्यांना प्राधान्य देण्यात आले होते. मात्र, संपादित क्षेत्रात गुंतवणूकदारांचाही सहभाग असल्याने आता त्यांनाही मोबदला वितरणात प्राधान्य देणार आहे. त्यामुळे महिनाभरात मोबदला वाटपाची गती आणखी वाढण्याची अपेक्षा आहे.
एमआयडीसीच्या अधिसूचनेनुसार शेतकऱ्यांना मोबदल्यासोबत परताव्याच्या स्वरूपात १० टक्के विकसित भूखंड देण्याची तरतूद आहे. त्यासाठी संमती देण्याची अंतिम मुदत ३० जून होती. अनेक शेतकरी कुटुंबांमधील वारसा व मालकीसंदर्भातील वाद प्रलंबित असल्याने मुदतवाढ देण्याची मागणी केली होती. त्यानुसार आता १५ जुलैपर्यंत करारनाम्यांद्वारे संमती नोंदविता येणार असल्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.