पुणे: पंढरपूरमध्ये आषाढी वारीच्या कालावधीत बंदोबस्तासाठी येणारे पोलिस अधिकारी आणि कर्मचारी यांच्यासाठी पुनीत बालन ग्रुप'कडून जीवनावश्यक वस्तूंचे ९ हजार किट देण्यात आले आहेत. या किटमध्ये दैनंदिन गरजेच्या वस्तूंचा समावेश असल्याने वारीच्या बंदोबस्ताच्या कालावधीतील पोलिस बांधवाची गैरसोय टळणार.
दरवर्षी संत ज्ञानेश्वर महाराज आणि संत तुकाराम महाराज यांच्या पालखीसमवेत लाखो वारकरी पंढरपूरमध्ये दर्शनासाठी येत असतात. सातारा जिल्हा हद्दीतून पालखीचे मार्गक्रमण होत असताना २ हजार ७०० पुरुष पोलिस आणि ३०० महिला पोलिस बंदोबस्तासाठी असतात. त्यांच्यासाठी ३ हजार किट उपलब्ध करून देण्याची विनंती सातारा पोलिस अधीक्षक कार्यालयाने केली होती.
तसेच २५ जुलै रोजी पंढरपुरात भरणाऱ्या आषाढी वारीसाठी येणाऱ्या भक्तांच्या बंदोबस्तासाठी पंढरपुरात ६ हजार ५०० पुरुष पोलिस, तर २ हजार महिला पोलिसांचा बंदोबस्त लावलेला आहे. त्यांनाही जीवनाश्यक साहित्याचे किट उपलब्ध करून देण्याची विनंती पंढरपूर उपविभागीय कार्यालयाकडून युवा उद्योजक पुनीत बालन यांच्याकडे केली होती.
त्यानुसार बालन यांनी तत्काळ हे किट उपलब्ध करून दिले आहेत. त्यानुसार सोलापूर ग्रामीण पोलिस दलासाठी ७ हजार, तर सातारा ग्रामीण पोलिस दलासाठी २ हजार असे एकूण ९ हजार किट उपलब्ध करून दिले आहेत.
किटमधील वस्तू
कोलगेट पाऊच, टूथब्रश, पॅराशूट तेल बॉटल, ओडोमास, ग्लुकोज, डेटॉल साबण, शेंगदाणा चिक्की, कापडी मास्क, पाणी बॉटल आणि महिला पोलीस कर्मचाऱ्यांसाठी सॅनिटरी पॅड.
विठुरायाच्या दर्शनासाठी येणाऱ्या वारकऱ्यांची अत्यंत काटेकोरपणे सुरक्षा व्यवस्था बघण्याचं महत्त्वाचं कार्य करत असतात. ही एकप्रकारे सेवाच असून, ही सेवा करत असताना त्यांचीही कोणतीही गैरसोय होऊ नये यासाठी पोलिसांच्या मागणीनुसार दैनंदिन वस्तूंचे किट देण्यात आले आहे.पुनीत बालन, युवा उद्योजक