Punit Balan Cricket Academy Pudhari
पुणे

Punit Balan Cricket Academy: पुनीत बालन क्रिकेट अकॅडमीचा धडाकेबाज विजय

एमसीए मेन्स कॉर्पोरेट शिल्डमध्ये कपील सन्सवर मोठ्या फरकाने मात

पुढारी वृत्तसेवा

पुणे : एमसीए मेन्स कॉर्पोरेट शिल्ड टूर्नामेंटअंतर्गत खेळल्या गेलेल्या क्रिकेट सामन्यात पुनीत बालन क्रिकेट अकॅडमीच्या संघाने दमदार फलंदाजी आणि शिस्तबद्ध गोलंदाजीच्या जोरावर कपील सन्स संघावर ८० धावांनी दणदणीत विजय मिळवला.

प्रथम फलंदाजी करणाऱ्या पुनीत बालन क्रिकेट अकॅडमीने निर्धारित ५० षटकांत तब्बल ४०४ धावांचा अक्षरशः डोंगर उभा केला. संघाच्या या धावसंख्येत पवन शहा आणि सचिन ढास यांनी केलेली शतकी खेळी निर्णायक ठरली. सलामीला आलेल्या हर्ष मोगवीरा (३०) आणि पवन शहा यांनी संघाला वेगवान सुरुवात करून दिली. त्यानंतर पवन शहा आणि सचिन धस यांनी दुसऱ्या विकेटसाठी तब्बल १५१ धावांची भागीदारी केली. शहाने १०१ चेंडूंत ११ चौकार ठोकत १०१ धावा केल्या, तर त्याला दमदार साथ देत धस यानेही ९५ चेंडूंत ९ चौकार आणि २ षटकारांची आतषबाजी करत शतक (१०१) झळकावले. सामन्याच्या शेवटच्या षटकांत सिद्धार्थ म्हात्रेने आक्रमक फलंदाजी करत ३४ चेंडूंत ५० धावा केल्या. त्यामुळे संघाने ४०० चा टप्पा पार करत ७ बाद ४०४ अशी भक्कम धावसंख्या उभारली.

या लक्ष्याचा पाठलाग करताना कपील सन्स संघाने कडवी लढत देण्याचा प्रयत्न केला. मात्र ठराविक अंतराने विकेट पडल्याने विजयी लक्ष्य गाठण्यात हा संघ अपयशी ठरला.

संघाकडून सिद्धेश वीरने ३८ चेंडूंत ५१ धावा, नीरज जोशी अनुराग कवाडे यांनी प्रत्येकी अर्धशतक (५० धावा) करत संघाला विजयाकडे नेण्याचा प्रयत्न केला. कपील सन्स संघाचा ४४.५ षटकांत ३१५ धावांवर खेळ आटोपला. त्यामुळे पुनीत बालन क्रिकेट अकॅडमीने कपील सन्सवर ८९ धावांनी विजय मिळवला. या सामन्यात अनुराग कवाडे यांनी आपल्या कारकिर्दीतील १५०० धावांचा टप्पा पूर्ण केला. सामन्याचे पंच म्हणून अक्षय पवार, महेश सावंत, नवीन माने यांनी काम पाहिले.

एमसीए मेन्स कॉर्पोरेट शिल्ड टुर्नामेंटमध्ये पुनीत बालन क्रिकेट अकॅडमीच्या दणदणीत विजयाने अत्यंत आनंद झाला. संघातील सर्वच खेळाडूंनी सांघिक खेळाचे प्रदर्शन घडवले. यापुढेही संघाचे असेच सातत्य राहील आणि वेगवेगळ्या स्पर्धांत संघ कायमच चमकदार कामगिरी करेल, असा विश्वास आहे.
पुनीत बालन (मालक, पुनीत बालन अकॅडमी)

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT