पुणे: पुणे जिल्हा परिषदेमार्फत शिक्षक भरती प्रक्रियेला वेग देण्यात आला असून, दुसऱ्या टप्प्यात १२९ शिक्षकांना नियुक्ती देण्यात आली आहे. मंगळवारी (दि.३ नोव्हेंबर) समुपदेशन प्रक्रिया राबवून या शिक्षकांना रिक्त असलेल्या शाळांमध्ये नियुक्ती देण्यात आली. पवित्र पोर्टलच्या माध्यमातून शिक्षक भरती प्रक्रियेसाठी जिल्हा परिषदेला रिक्त पदांची माहिती शासनास कळविण्यात आली होती. त्यानुसार पहिल्या टप्प्यात ४३६ शिक्षक उपलब्ध झाले होते. त्यापैकी ३१५ शिक्षकांना दि. १९ ऑक्टोबर रोजी समुपदेशनाद्वारे रिक्त शाळांमध्ये नियुक्ती देण्यात आली होती.
त्यानंतर दुसऱ्या टप्प्यात ४८० शिक्षक उपलब्ध झाले असून, त्यापैकी १२९ शिक्षकांची समुपदेशन प्रक्रिया पूर्ण करून त्यांना नियुक्ती देण्यात आली. त्यामुळे आतापर्यंत एकूण ४४४ शिक्षकांना नियुक्ती मिळाली आहे.
जिल्हा परिषद शाळांमधील शिक्षकांची रिक्त पदे मोठ्या प्रमाणात भरली जाणार असल्याने ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण मिळण्यास मदत होणार आहे. शिक्षकांची उपलब्धता वाढल्यामुळे शाळांमधील शैक्षणिक वातावरण अधिक सक्षम होऊन विद्यार्थ्यांच्या गुणवत्तावाढीस निश्चितच चालना मिळेल.
ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण मिळावे, शिक्षकांची रिक्त पदे भरली जावीत आणि जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये शैक्षणिक गुणवत्ता वाढावी, यासाठी नियुक्ती प्रक्रिया जलदगतीने पूर्ण करून उपलब्ध शिक्षकांना त्यांच्या नियुक्तीच्या शाळांवर रुजू करून घ्यावे, अशा सूचना प्रशासनाला देण्यात आल्या आहेत.
शिक्षकांच्या नियुक्तीचा तपशील
शिक्षक हा विद्यार्थ्यांच्या गुणवत्तापूर्ण शिक्षणाचा केंद्रबिंदू आहे. त्यामुळे रिक्त पदांवर उपलब्ध झालेल्या शिक्षकांना तातडीने शाळांमध्ये रुजू केल्यास विद्यार्थ्यांना त्याचा थेट लाभ मिळेल. शिक्षकांची कमतरता दूर करून जिल्हा परिषदेच्या शाळांमधील शैक्षणिक गुणवत्ता उंचावणे हे आमचे प्राधान्यक्रम आहे, अशी माहिती जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष विवेक वळसे पाटील यांनी दिली.