Development Work Pudhari
पुणे

Pune Zilla Parishad Development Works: जिल्ह्यातील रस्त्यांची कामे 25 मेपर्यंत पूर्ण करण्याचे आदेश

पुणे जिल्हा परिषदेकडून विकासकामांना गती; शिक्षण, आरोग्य व सौरऊर्जा प्रकल्पांवर विशेष भर

पुढारी वृत्तसेवा

पुणे: पावसाळ्यापूर्वी रस्तेविकासाची कामे पूर्ण करण्याच्या उद्देशाने बांधकाम विभागाला सूचना देण्यात आल्या आहेत. जिल्ह्यातील रस्त्यांच्या डांबरीकरणाची सर्व कामे 25 मेच्या आत पूर्ण झाली पाहिजेत, असे आदेश प्रशासनाला दिल्याची माहिती जिल्हा परिषद अध्यक्ष वीरधवल जगदाळे यांनी पत्रकार परिषदेत दिली.

या वेळी उपाध्यक्ष विवेक वळसे पाटील उपस्थित होते. जगदाळे म्हणाले, पावसाळ्यात नागरिकांची गैरसोय होऊ नये आणि कामाचा दर्जा टिकून राहावा, यासाठी ही कालमर्यादा निश्चित करण्यात आली आहे. जि. प. प्रशासनाने नुकत्याच सादर केलेल्या 301 कोटी रुपयांच्या अर्थसंकल्पाच्या अंमलबजावणीबाबत आता अधिक काटेकोर भूमिका घेतली जाणार आहे. आत्तापर्यंत या अर्थसंकल्पापैकी केवळ सुमारे 60 टक्के निधी खर्च होत असल्याचे निदर्शनास आले असून, उर्वरित निधी वापरला जात नव्हता. या पार्श्वभूमीवर उपलब्ध असलेला संपूर्ण निधी प्रभावीपणे खर्च करण्यासाठी ठोस पावले उचलली जाणार आहेत.

शिक्षण आणि आरोग्यावर विशेष भर

ज्या ठिकाणी विद्यार्थ्यांची पटसंख्या जास्त आहे, अशा शाळांना ‌‘मॉडेल स्कूल‌’ म्हणून विकसित केले जाणार आहे. यामुळे ग््राामीण भागातील विद्यार्थ्यांनाही दर्जेदार आणि आधुनिक शिक्षण मिळणे सुलभ होईल. त्याचबरोबर, पर्यायी ऊर्जास्रोतांचा वापर वाढविण्यासाठी जिल्हा परिषदेने महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. येणाऱ्या काळात जिल्ह्यातील 40 प्राथमिक आरोग्य केंद्रे आणि 300 शाळांमध्ये सौरऊर्जा प्रकल्प राबविण्यात येणार आहेत. यामुळे वीजबिलात बचत होण्यासोबतच आरोग्य केंद्र आणि शाळांना अखंडित वीजपुरवठा मिळण्यास मदत होईल.

एप्रिलच्या दुसऱ्या आठवड्यात पुरवणी अर्थसंकल्प

जिल्ह्याच्या विकासासाठी निधीची कमतरता नाही. मात्र, उपलब्ध निधी वेळेत खर्च न होणे, ही चिंतेची बाब आहे. प्रशासकीय दिरंगाईमुळे विकासकामांना खीळ बसू नये, यासाठी आता ठोस पावले उचलली जाणार आहेत. सध्याच्या लोकप्रतिनिधींनी सुचविलेल्या विकासकामांचा आणि सूचनांचा अंतर्भाव करण्यासाठी एप्रिल महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात पुरवणी अर्थसंकल्प सादर केला जाणार आहे. यात प्रलंबित कामांना गती मिळेल आणि नियोजित योजनांसाठी अतिरिक्त तरतूद उपलब्ध करून दिली जाईल.

रिक्त पदांचा प्रश्न ऐरणीवर

सध्या शिक्षण विभागात 4 गटशिक्षण अधिकाऱ्यांची पदे रिक्त आहेत. आगामी मे महिन्यात आणखी काही अधिकारी निवृत्त होणार असल्याने ही संख्या वाढण्याची शक्यता आहे. या रिक्त जागांमुळे कामाचा ताण वाढत असून, यावर लवकरात लवकर तोडगा काढण्यासाठी पाठपुरावा केला जाणार असल्याचे जगदाळे यांनी सांगितले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT