Pune Jilha Parishad Pudhari
पुणे

Pune Jilha Parishad Election 2026: पुणे जिल्हा परिषद व पंचायत समितीसाठी आज मतदान

29 लाखांहून अधिक मतदार हक्क बजावणार; जिल्ह्यात 3,605 मतदान केंद्रांवर मोठा बंदोबस्त

पुढारी वृत्तसेवा

पुणे: जिल्हा परिषद व पंचायत समितीसाठी आज (शनिवारी) मतदान होणार आहे. महानगरपालिका, नगरपालिका निवडणुकीत मतदान केलेल्यांनी जि. प., पं. स.ला दुबार मतदान करू नये, असे आवाहन जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी केले आहे. या निवडणुकीसाठी प्रशासन सज्ज असल्याचेही त्यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.

मतदानाची मतमोजणी 9 फेबुवारी रोजी सकाळी 10 वाजल्यापासून करण्यात येणार आहे. पुणे जिल्हा परिषदेच्या 73 गटासाठी 299, तर 13 पंचायत समितीच्या 146 गणांसाठी 528 उमदेवार रगणात आहेत. मतदानाची वेळ सकाळी साडेसात ते सायंकाळी साडेपाच वाजेपर्यंत आहे. मतदानाच्या एक तास आधी ‌‘मॉक पोल‌’ घेतला जाणार आहे. मोठा पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. मतदारांनी निवडणुकीत उत्स्फूर्तपणे मतदान करावे. नागरिक व राजकीय पक्षांनी आदर्श आचारसंहितेचे पालन करून शांततेत संपूर्ण प्रक्रिया पार पाडावी. ‌‘पोलिंग पार्टी‌’ सर्व साहित्यांसह आपापल्या मतदान केंद्रावर पोहचल्या असून, मतदान प्रक्रियेसाठी सज्ज असल्याचे डुडी यांनी सांगितले.

ते म्हणाले, मतदानासाठी जि. प. व पं. स. कार्यक्षेत्रात सार्वजनिक सुटी जाहीर करण्यात आली आहे. ही सुटी त्या मतदारसंघातील मतदार कामानिमित्त मतदारसंघाबाहेर असले, तरी लागू राहील. केंद्र शासनाची शासकीय, निमशासकीय कार्यालये, सार्वजनिक उपक्रम, बँका आदींनाही ही सार्वजनिक सुटी लागू राहील. मतदान प्रक्रियेसाठी 14 हजार 318 बॅलेट युनिट, 5 हजार 813 कंट्रोल युनिट, 3 हजार 968 मेमरी चिप आणि 3 हजार 991 बॅटरी वितरित करण्यात आल्या आहेत.

29 लाखांहून अधिक मतदार हक्क बजावणार

जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूक 2026 करिता जिल्ह्यात 3 हजार 605 मतदान केंद्र असून, त्याअंतर्गत पुरुष 15 लाख 27 हजार 151, स्त्री 14 लाख 49 हजार 560 आणि इतर 94 असे एकूण 29 लाख 76 हजार 805 मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत.

3 हजार 605 मतदान केंद्र

बारामती तालुक्यात 299, मावळ 243, मुळशी 227, शिरूर 337, हवेली 263, दौंड 317, इंदापूर 400, पुरंदर 235, भोर 237, वेल्हे 105, आंबेगाव 239, जुन्नर 366 आणि खेड 337 अशी एकूण 3 हजार 605 मतदान केंद्र आहेत. यामध्ये प्रत्येक तालुक्यात एक, याप्रमाणे 13 आदर्श व महिला मतदान केंद्र तसेच हवेली, भोर आणि इंदापूर तालुक्यात प्रत्येकी एक याप्रमाणे तीन परदानशीन मतदान केंद्र आहेत.

दोन मते आवश्यक

जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीसाठी अनेक ठिकाणी एकच मतदान यंत्र असणार आहे. जिल्हा परिषद गटासाठी मतदान यंत्रावर पांढरा रंग आणि पंचायत समितीच्या गणासाठी गुलाबी रंग असणार आहे. दोन्ही मत दिल्यावरच प्रक्रिया पूर्ण होणार आहे. यामुळे प्रत्येक मतदाराने दोन मते द्यावी, असे आव्हान राज्य निवडणूक आयोगाचे आयुक्त दिनेश वाघमारे यांनी केले आहे.

तेवीस हजारांहून अधिक कर्मचारी कार्यरत

सर्व मतदान केंद्रांवर केंद्राध्यक्ष, मतदान अधिकारी आदी अधिकारी-कर्मचाऱ्यांची नेमणूक करण्यात आली आहे. संपूर्ण निवडणूक कामकाजासाठी एकूण 23 हजार 114 अधिकारी व कर्मचाऱ्यांची नियुक्ती केली आहे.

मतदान केंद्रावर प्रतीक्षा कक्ष

मतदान केंद्रावर ज्येष्ठ नागरिक, महिलांसाठी प्रतीक्षा कक्ष तयार केले आहेत. ज्या मतदान केंद्रांवर रांग लागेल, तेथे हे मतदार प्रतीक्षा कक्षात थांबतील आणि त्यांचा क्रमांक आल्यावर मतदान करतील.

...असा असेल बंदोबस्त

2 पोलिस आयुक्त, 1 पोलिस अधीक्षकासह 10 हजार पोलिसांचा बंदोबस्त या निवडणुकीसाठी आहे. पुणे व पिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्त, पुणे ग््राामीण पोलिस अधीक्षक, 6 अप्पर पोलिस आयुक्त, 80 पोलिस निरीक्षक, 412 पोलिस उपनिरीक्षक, 6 हजार 646 पोलिस अंमलदार, 2 हजार 471 होमगार्ड तसेच केंद्रीय राखीव पोलिस दल आणि राज्य राखीव पोलिस दलाच्या 11 तुकड्या तैनात करण्यात आल्या आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT