

पुणे: मनपाची पहिली सर्वसाधारण सभा 9 तारखेला होणार असून, या बैठकीत स्थायी समितीच्या अध्यक्षांची आणि इतर सदस्यांची निवड करण्यात येणार आहे. या समितीसमोर पुणे महापालिकेचा बहुप्रतीक्षित 2026-27 चा अर्थसंकल्प आयुक्त नवलकिशोर राम हे 13 फेबुवारी रोजी सादर करणार आहेत.
महापालिकेची निवडणूक नुकतीच पार पडली आहे. या निवडणुकीत भाजपचे 119 नगरसेवक निवडून आले आहेत. महापौर व उपमहापौर निवडीसाठी 9 तारखेला महापालिकेची सर्वसाधारण सभा आयोजित केली असून, या सभेत या निवडी करण्यात येणार आहेत. भाजपने महापौरपदासाठी मंजूषा नागपुरे, तर उपमहापौर पदासाठी परशुराम वाडेकर यांचे नाव निश्चित केले आहे. भाजपचे सभागृहात मोठे संख्याबळ असल्याने दोघांची निवड निश्चित आहे. याच सभेत स्थायी समितीच्या अध्यक्षांची व इतर सदस्यांची निवड होणार आहे. 16 सदस्यीय समितीत भाजपचे 12, राकाँचे 3, तर काँग््रेासचा 1 सदस्य असेल.
या स्थायी समितीसमोर 13 फेबुवारीला आयुक्त नवल किशोर राम त्यांचा पहिला अर्थसंकल्प सादर करणार आहे. सध्या अर्थसंकल्प तयार करण्याचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. सर्व विभागाकडून गेल्या वर्षी झालेल्या खर्चाची, तसेच पुढच्या वर्षांची मागणी याची माहिती मागविण्यात आली आहे.
त्यानुसार भांडवली व महसुली खर्चावर अर्थसंकल्प सादर करण्यात येणार आहे. 4 वर्षांनंतर सभागृहात हा अर्थसंकल्प मांडण्यात येणार आहे. भाजपच्या जाहीरनाम्यात अनेक घोषणा करण्यात आल्या असून, त्याची पूर्तता करण्यासाठी या अर्थसंकल्पांत तरतुदी केली जाण्याची शक्यता आहे.
आयुक्तांनी अर्थसंकल्प सादर केल्यावर स्थायी समिती अध्यक्ष त्यात सुधारणा करतात आणि सर्वसाधारण सभेसमोर अर्थसंकल्प सादर करतात. 31 मार्चपूर्वी सर्वसाधारण सभेने अर्थसंकल्पावर चर्चा करून मंजुरी देणे आवश्यक आहे. त्यानंतरच त्याची अंमलबजावणी करता येते. दरम्यान, आयुक्तांनी अर्थसंकल्प सादर करण्याची तयारी सुरू केली असून, सर्व विभागांकडून माहिती घेण्यात आली.