

पुणे: निवडणूक आचारसंहिता लागू असतानाही संस्थेच्या नावात बदल करून आदर्श आचारसंहिता भंग केल्याप्रकरणी निवडणूक प्रशासनाकडून चार संस्थांना नोटीस काढण्यात आली आहे. त्यामध्ये येथील पुणे जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ (कात्रज डेअरी), पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीसह बारामती तालुका सहकारी दूध संघ आणि बारामती खरेदी-विक्री संघ यांचा समावेश आहे.
निवडणूक प्रशासनाकडून दुग्ध व्यवसाय विकास आणि सहकार विभागाच्या जिल्हा कार्यालयामार्फत विचारणा करण्यात आली आहे. गुरुवारी ( दि. 5) संबंधित कार्यालयात चौकशीसाठी अधिकाऱ्यांचे पथके पोहोचताच खळबळ उडाल्याचे सांगण्यात आले. पुणे जिल्ह्यामध्ये जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांची आदर्श निवडणूक आचारसंहिता लागू आहे. असे असताना कात्रज दूध संघाने पुणे जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाला दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे नाव देण्याची घोषणा केली.
त्याचबरोबर ठराव करून नाव देण्याचा घेतलेला निर्णय, पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीने त्यांच्या फुलांच्या बाजाराला अजितदादांचे नाव देण्याची केलेली घोषणा, त्याचप्रमाणे बारामती तालुका सहकारी दूध संघ आणि बारामती खरेदी-विक्री संघ यांनीदेखील अजित पवार यांचे नाव देण्याची घोषणा करून या संबंधातील बातम्या संबंधित पदाधिकाऱ्यांनी जाहीर केल्या आहेत. हा आदर्श निवडणूक आचारसंहितेचा भंग असल्याने या प्रकरणी कारवाई सुरू केली आहे. वर्तमानपत्रांमध्ये आलेल्या बातम्या आणि प्रश्न अनुषंगाने जिल्हाधिकाऱ्यांच्या निवडणूक विभागाकडून ही कारवाई करण्यात आली. संबंधित संस्थांकडून लेखी खुलासा तत्काळ सादर करून घेण्यात येत असल्याचे सांगण्यात आले.
पुणे विभागीय दुग्ध उपनिबंधक राजकुमार पाटील यांनी त्यांच्या अधिकाऱ्यांचे पथकामार्फत आज सायंकाळी कात्रज दूध संघात नोटीस बजावली व पथकाने चौकशी केली. तसेच, पुणे जिल्हा सहकार निबंधक (ग््राामीण) प्रकाश जगताप यांच्या कार्यालयाकडून पुणे कृषी बाजार समितीलादेखील नोटीस देण्यात आली.
त्याचबरोबर बारामती येथील सहकारचे सहायक निबंधकामार्फत तालुका दूध संघ आणि तालुका खरेदी-विक्री संघ यांना नोटीस दिली आहे. याप्रकरणी तत्काळ खुलासा देण्यास सांगितले असून, संबंधित कागदपत्रांचे दस्तऐवज सादर करण्यास सांगितले आहे. सायंकाळपासून या संस्थांच्या कार्यालयामध्ये निवडणूक प्रशासनाकडून सहकार विभागाच्या अधिकाऱ्यांमार्फत ही कारवाई सुरू करण्यात आल्याची माहिती मिळाली.