पुणे: जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या मतदानासाठी जिल्हा प्रशासनाने 23 हजार 743 अधिकारी व कर्मचाऱ्यांची नियुक्ती केली आहे. प्रत्यक्षात 18 हजार 179 अधिकारी व कर्मचाऱ्यांची गरज असून, राज्य निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार 30 टक्के अतिरिक्त मनुष्यबळ उपलब्ध करून देण्यात आले आहे. निवडणुकीच्या तारखेत बदल करण्यात आला असून, आता ही निवडणूक 7 फेबुवारीला होणार आहे.
जिल्ह्यात एकूण 3 हजार 605 मतदान केंद्र स्थापन केली आहेत. इंदापूर तालुक्यात सर्वाधिक 400 मतदान केंद्र असून, तेथे 2632 अधिकारी व कर्मचारी तैनात राहतील, तर वेल्हा तालुक्यात 105 मतदान केंद्र असून, तेथे 450 अधिकारी व कर्मचारी तैनात करण्यात येणार आहेत.
जिल्हा परिषदेच्या निवडणुकीसाठी जिल्ह्यातील मतदान केंद्रांची संख्या मतदारांच्या संख्येनुसार निश्चित करण्यात आली आहे. या सर्व मतदान केंद्रांसाठी 18 हजार 179 मतदान अधिकारी व कर्मचाऱ्यांची आवश्यकता आहे. तसेच आपत्कालीन परिस्थितीसाठी 30 टक्के अतिरिक्त अधिकारी व कर्मचारी म्हणून 5 हजार 564 जणांची नेमणूक केली आहे. त्यामुळे जिल्ह्यात एकूण 23743 अधिकारी व कर्मचारी प्रत्यक्ष मतदान प्रक्रियेत सहभागी होणार आहेत. या सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांना मतदान केंद्रावरील कामासाठी नियुक्तीचे आदेश जिल्हा प्रशासनाने जारी केले आहेत.
बाराशेहून अधिक मतदार असलेल्या मतदान केंद्रांसाठी अतिरिक्त मतदान केंद्राध्यक्ष अर्थात प्रिसायडिंग ऑफिसरची नियुक्ती करण्यात येणार आहे. या सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांचे तीन टप्प्यांत प्रशिक्षण घेण्यात येणार असून, पहिली दोन प्रशिक्षणे प्रत्येकी दोन दिवसांची असतील, तर तिसरे व अंतिम प्रशिक्षण प्रत्यक्ष मतदानाच्या आदल्या दिवशी जाईल.
13 पैकी 8 तालुक्यांत सूक्ष्म निरीक्षक नियुक्त
प्रत्येक मतदान केंद्रावर मतदान केंद्राध्यक्ष, मतदान अधिकारी क्रमांक 1, 2 व 3 तसेच एक शिपाई यांची नेमणूक करण्यात येणार आहे. तसेच 13 तालुक्यांपैकी 8 तालुक्यांमध्ये सूक्ष्म निरीक्षकांची नियुक्ती करण्यात आली आहे. मात्र बारामती, मावळ, शिरूर, हवेली व पुरंदर या तालुक्यांमध्ये सूक्ष्म निरीक्षकांची नेमणूक करण्यात आलेली नाही.