

पुणे: जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीच्या प्रचारासाठी अवघे सात दिवस शिल्लक असताना जिल्ह्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापले होते. उमेदवारांकडून कोपरा सभा, प्रचारफेऱ्या तसेच मतदारांच्या घरोघरी जाऊन भेटीगाठी घेतल्या जात होत्या. मात्र, बुधवारी राज्याच्या राजकारणाला मोठा धक्का देणारी घटना घडली. उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा बारामती येथे विमान अपघातात दुर्दैवी मृत्यू झाला. या घटनेमुळे संपूर्ण राज्यात शोककळा पसरली असून, जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीचा प्रचार तत्काळ थांबवण्यात आला आहे.
राज्य सरकारने उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनानिमित्त शुक्रवारपर्यंत दुखवटा जाहीर केला आहे. या पार्श्वभूमीवर सर्वच राजकीय पक्षांनी तसेच अपक्ष उमेदवारांनी प्रचार स्थगित करण्याचा निर्णय घेतला आहे. कोणत्याही प्रचारसभा किंवा रोड शो घेण्यात येणार नाहीत. मतदारांना केवळ पत्रके देण्यात येणार असून, दुखवट्यानंतरच पुन्हा प्रचार सुरू करण्यात येईल, असे उमेदवारांकडून सांगण्यात येत आहे.
अजित पवार हे जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणूक प्रचारासाठी मुंबईहून विमानाने बारामतीकडे निघाले होते. मात्र, बारामती विमानतळाजवळ विमानाचा अपघात झाला. या भीषण दुर्घटनेत अजित पवार यांच्यासह पाच जणांचा मृत्यू झाला. या घटनेनंतर राष्ट्रवादी काँग््रेास, भाजप, काँग््रेाससह सर्वच राजकीय पक्षांतील नेते व कार्यकर्ते दु:खात आहेत.
यासंदर्भात राष्ट्रवादी काँग््रेास शरदचंद्र पवार पक्षाचे जिल्हाध्यक्ष विजय कोलते म्हणाले, “उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनामुळे राज्याच्या राजकारणात भरून न येणारी पोकळी निर्माण झाली आहे. या दुःखद घटनेमुळे सर्व उमेदवारांनी प्रचार पूर्णपणे थांबवला आहे. सरकारने जाहीर केलेल्या दुखवट्यानंतरच प्रचार पुन्हा सुरू केला जाईल.”
“जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग््रेासच्या दोन्ही गटांतील सर्व उमेदवारांची निवड स्वतः अजित पवार यांनी केली होती. त्यांच्या नेतृत्वाखाली हे उमेदवार निवडणूक रिंगणात उतरले आहेत. त्यामुळे अजित पवार यांना श्रद्धांजली अर्पण करत हे उमेदवार धैर्याने व जबाबदारीने निवडणूक लढवतील,” असेही त्यांनी सांगितले.
विजयी मिरवणुकाही काढल्या जाणार नाहीत
राष्ट्रवादी काँग््रेासचे जिल्हाध्यक्ष विठ्ठल शिंदे म्हणाले, “उमेदवारांच्या कोणत्याही प्रचारसभा घेतल्या जाणार नाहीत तसेच रोड शोही केले जाणार नाहीत. कोणत्याही प्रकारची वाद्ये वाजवली जाणार नाहीत. केवळ मतदारांना पत्रके दिली जात आहेत. उमेदवार निवडून आले तरी विजयी मिरवणुका काढल्या जाणार नाहीत.”