

पुणे: मानवी त्रुटी, तांत्रिक बिघाड, देखभालीचा अभाव आणि खराब हवामानामुळेच विमानांचे अपघात होत असल्याचे प्राथमिकदृष्ट्या अनेकदा समोर आले असल्याचे मत हवाई वाहतूक तज्ज्ञ धैर्यशील वंडेकर यांनी व्यक्त केले.
अनेकदा विमान अपघातांमध्ये वैमानिकाची चूक हे प्रमुख कारण आढळते. वैमानिकाची निर्णय घेताना झालेली चूक, परिस्थितीजन्य जागरूकतेचा अभाव, थकवा, लक्ष विचलित होणे आणि उड्डाण नियंत्रण गमावणे यामुळे स्टॉल, स्पिन, अयोग्य बँकिग किंवा वेगावर नियंत्रण न राहणे अशा घटना घडतात. विशेषतः प्रशिक्षण व खासगी विमानांमध्ये मानवी त्रुटींचे प्रमाण तुलनेने अधिक आढळते. अशा घटना घडण्यामध्ये तांत्रिक बिघाड हे दुसरे महत्त्वाचे कारण आढळत असून, इंजिन किंवा पॉवर लॉस, प्रोपेलरमधील समस्या, लँडिंग गीअर दोष आणि स्ट्रक्चरल फटीग यांचा त्यात समावेश होतो. वंडेकर म्हणाले, जनरल एव्हिएशनमधील लहान विमाने, प्रशिक्षण उड्डाणे, हेलिकॉप्टर, खासगी विमाने यांचे अपघात हे व्यावसायिक विमानांच्या तुलनेत अधिक प्रमाणात होतात.
पाच वर्षांत 53 हवाई अपघात
डीजीसीए व आरटीआयच्या उपलब्ध डेटानुसार, भारतात 2020 ते 2025 या कालावधीत 53 नागरी हवाई अपघात नोंदवले गेले असून त्यात 320 हून अधिक मृत्यू आणि अंदाजे 180 जखमी झाले आहेत. या काळात अपघातांच्या संख्येत वाढ झाल्याचे देखील निरीक्षण आहे. यापैकी बहुसंख्य अपघात हे लहान विमाने, प्रशिक्षण उड्डाणे, हेलिकॉप्टर आणि नॉन-शेड्युल्ड ऑपरेशन्स दरम्यान घडले, असे वंडेकर म्हणाले.
हे उपाय करणे आवश्यक
2024 पर्यंत देशात 119 नॉन-शेड्युल्ड ऑपरेटर्स (एन-एसओपी) सुमारे 427 विमानांसह कार्यरत होते. विमान व हेलिकॉप्टर अपघात टाळण्यासाठी व जनरल एव्हिएशन अधिक सुरक्षित करण्यासाठी एन-एसओपी व एफटीओकडून नियमित व दर्जेदार देखभाल, प्रिडिक्टिव्ह मेंटेनन्स आणि इंजिन हेल्थ मॉनिटरिंग अनिवार्य करणे, वैमानिक व तांत्रिक कर्मचाऱ्यांचे सखोल प्रशिक्षण विशेषतः सिम्युलेटर आधारित स्टॉल/स्पिन रिकव्हरी, थकवा व्यवस्थापन, एफडीटीएल, सीआरएम, थकवा व्यवस्थापन, अचूक इंधन नियोजन, ऑपरेशनल शिस्त, अद्ययावत हवामान माहिती, सेफ्टी मॅनेजमेंट सिस्टीमची प्रभावी अंमलबजावणी आणि डीजीसीएच्या एअरवर्दीनेस तपासण्या, सेफ्टी ऑडिट्स व देखरेख यांची वारंवारिता वाढवणे आवश्यक आहे, असे वंडेकर म्हणाले.
विमान चार्टर कंपन्या, एफटीओ, एन-एसओपी यांच्याकडून डीजीसीएचे नियम, सिव्हिल एव्हिएशन रिक्वायरमेंटस, मेंटेनन्स, प्रशिक्षण, लॉगबुक, सेफ्टी मॅनेजमेंट सिस्टीम इत्यादींचे अनुपालन यामध्ये कोणतेही उल्लंघन आढळल्यास सक्त कारवाई करण्यात यावी, तरच विमान अपघात रोखण्यास मोठा हातभार लागणार आहे.
धैर्यशील वंडेकर, हवाई वाहतूकतज्ज्ञ