पुणे: जिल्हा परिषद शाळांमधील विद्यार्थ्यांना जागतिक भाषा आणि संस्कृतीची ओळख व्हावी, यासाठी पुणे जिल्हा परिषद आणि सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या परकीय भाषा विभागाच्या संयुक्त विद्यमाने राबविण्यात येणाऱ्या परकीय भाषा शिक्षण उपक्रमाचा विस्तार करण्यात आला आहे. उपक्रमाच्या दुसऱ्या वर्षात यंदा पाच परकीय भाषांमधील २४० शिक्षकांना प्रशिक्षण दिले जात आहे.
विद्यापीठाच्या परकीय भाषा विभागामार्फत २१ सप्टेंबरपासून जिल्हा परिषदेच्या शिक्षकांसाठी ऑनलाइन प्रशिक्षण वर्ग सुरू झाले आहेत. यामध्ये जर्मन, फ्रेंच, स्पॅनिश, रशियन आणि जपानी या भाषांचा समावेश आहे. पहिल्या वर्षी दोन भाषांसाठी १०२ शिक्षकांना प्रशिक्षण देण्यात आले होते. यंदा शिक्षकसंख्या १०२ वरून २४०, तर भाषासंख्या २ वरून ५ करण्यात आली आहे. यंदा जर्मन भाषेसाठी १३२, फ्रेंचसाठी २८, स्पॅनिशसाठी २५, रशियनसाठी २५ आणि जपानी भाषेसाठी ३० शिक्षकांची निवड करण्यात आली आहे.
या शिक्षकांना १८० तासांचा संरचित भाषा अभ्यासक्रम शिकवला जात आहे. ऐकणे, वाचन, लेखन आणि बोलणे, या चार प्रमुख भाषाकौशल्यांवर प्रशिक्षणात भर देण्यात आला आहे. अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर शिक्षकांना संबंधित भाषेतील दैनंदिन संभाषण समजून घेणे, साधे मजकूर वाचणे, संवाद साधणे तसेच छोटे निबंध लिहिण्याची प्राथमिक कौशल्ये आत्मसात करता येणार आहेत.
हा उपक्रम 'प्रशिक्षकांचे प्रशिक्षण' (Training of Trainers) या संकल्पनेवर आधारित आहे. प्रशिक्षण घेतलेले शिक्षक आपल्या शाळांमध्ये विद्यार्थ्यांना संबंधित परकीय भाषा आणि संस्कृतीची प्राथमिक ओळख करून देणार आहेत. पहिल्या वर्षी प्रशिक्षण घेतलेल्या १०२ शिक्षकांनी प्रत्येकी सुमारे ५० विद्यार्थ्यांपर्यंत ज्ञान पोहचवल्याने अंदाजे ५ हजार १०० विद्यार्थ्यांना परकीय भाषा आणि संस्कृतीची ओळख झाली आहे.
परकीय भाषांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या भाषिक जाणिवेला, संवादकौशल्याला आणि विविध संस्कृती समजून घेण्याच्या क्षमतेला चालना मिळण्यास मदत होते. तसेच, परिसराच्या पलिकडील भाषा, संस्कृती आणि जागतिक संदर्भ समजून घेण्याची संधी विद्यार्थ्यांना मिळत आहे. जिल्हा परिषद आणि विद्यापीठाचा हा उपक्रम विद्यार्थ्यांना भविष्याभिमुख आणि व्यापक जागतिक दृष्टिकोन असलेल्या शिक्षणाशी जोडण्याच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण ठरत आहे.