पुणे: पुणे जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग््रेास पक्षाने घवघवीत यश मिळवत स्पष्ट बहुमत मिळविले आहे. 73 पैकी तब्बल 51 गटांमध्ये राष्ट्रवादीने विजय मिळविल्याने जिल्हा परिषदेतील सत्तेचे चित्र जवळपास स्पष्ट झाले आहे. या यशानंतर आता सर्वांचे लक्ष जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदाकडे लागले आहे. पुणे जिल्हा परिषदेचे अध्यक्षपद पुढील अडीच वर्षांसाठी सर्वसाधारण गटासाठी राखीव असल्याने अध्यक्षपदाची माळ कोणाच्या गळ्यात पडणार? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. या पदासाठी निकाल लागताच जोरदार रस्सीखेच सुरू झाली आहे.
एकीकडे पक्षातील ज्येष्ठ आणि अनुभवी सदस्यांना संधी दिली जाणार का? तर दुसरीकडे नव्या आणि तरुण चेहऱ्याला नेतृत्वाची संधी मिळणार? असे प्रश्न उपस्थित झाले आहेत. अध्यक्षपदाबरोबरच उपाध्यक्ष आणि विविध सभापतिपदांसाठीही चुरस पाहायला मिळण्याची शक्यता आहे. या पदांवर कोणाला संधी मिळणार? हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.
राष्ट्रवादी काँग््रेासकडून निवडून आलेल्या अनेक सदस्यांना राजकीय अनुभव आहे. यात दौंड तालुक्यातील खडकी गटातून वीरधवल जगदाळे, आंबेगाव तालुक्यातील पारगाव तर्फे अवसरी गटातून विवेक वळसे पाटील, शिरूर तालुक्यातील मांडवगण फराटा गटातून सुजाता पवार, इंदापूर तालुक्यातील बावडा गटातून अंकिता हर्षवर्धन पाटील, काटी गटातून श्रीमंत ढोले, मुळशी तालुक्यातील पिरंगुट गटातून शांताराम इंगवले, तर भोर तालुक्यातील भोंगवली गटातून विक्रम खुटवड यांचा समावेश आहे. हे सर्व सदस्य यापूर्वीही जिल्हा परिषदेत निवडून आले आहेत. तेथे कसे कामकाज चालते, याचा चांगला अनुभव आहे. याचबरोबर यंदाच्या निवडणुकीत राजकीय पार्श्वभूमी असलेले अनेक तरुण चेहरेही प्रथमच जिल्हा परिषदेत पोहचले आहेत.
यापूर्वीही काहीवेळा पहिल्यांदाच निवडून आलेल्या सदस्याला अध्यक्षपदाची संधी मिळाली आहे. त्यामुळे नव्या सदस्यांमध्येही उत्सुकता वाढली आहे. प्रथमच निवडून आलेल्या सदस्यांमध्ये डॉ. प्राजक्ता दिगंबर दुर्गाडे, तुषार रमेश थोरात, यशराज आप्पासाहेब जगदाळे, सुनीता बुट्टे-पाटील, करण खलाटे आदी नावांची चर्चा आहे. या तरुण नेतृत्वाला संधी मिळेल का? हेसुद्धा पाहावे लागणार आहे. दरम्यान, विजयी उमेदवारांच्या नावांचा अधिकृत गॅझेट बुधवारी (दि. 11) प्रसिद्ध होणार आहे. त्यानंतर जिल्हा प्रशासनाकडून अध्यक्ष व उपाध्यक्षपदाच्या निवडणुकीची तारीख जाहीर केली जाणार आहे. ही निवडणूक जिल्हा परिषद सभागृहात पार पडण्याची शक्यता आहे.
बारामती, इंदापूर आणि दौंड तालुक्याला संधी मिळेल का?
बारामती, इंदापूर आणि दौंड या तालुक्यांत राष्ट्रवादी काँग््रेासला भरभरून मतदान झाले आहे. विशेष म्हणजे, दौंडमध्ये भाजपचे विद्यमान आमदार असतानाही 7 पैकी 6 गटांत राष्ट्रवादी काँग््रेासचे उमेदवार विजयी झाले आहेत. त्यामुळे दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांना राजकीय श्रद्धांजली म्हणून या भागातून निवडून आलेल्या सदस्याला अध्यक्षपद दिले जावे, अशी मागणी काही कार्यकर्त्यांकडून केली जात आहे.