सुनील जगताप
पुणे: निसर्गाची अनाकलनीय लय, जंगलातील रात्रीची ती गूढ शांतता आणि चंदेरी चांदण्यांत पाणवठ्यावर तहान भागविण्यासाठी येणाऱ्या वन्यजीवांचे दर्शन... निसर्गप्रेमींसाठी ही केवळ एक कल्पना नसून एक थरारक अनुभव असतो. हाच अनुभव यंदाच्या बुद्ध पौर्णिमेला प्रत्यक्षात अनुभवता येणार आहे.
पुणे वन्यजीव विभागामार्फत 30 एप्रिल रोजी जिल्ह्यातील विविध अभयारण्ये आणि वनपरिक्षेत्रांत ‘निसर्गानुभव’ (मचाण गणना) उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. वन्यजीव विभागाच्या पुणे कार्यालयाने नियोजन केल्याप्रमाणे रेहेकुरी, करमाळा, नान्नज, सुपे, भीमाशंकर आणि शिरूर यांसारख्या वनक्षेत्रांमधील एकूण 28 पाणवठ्यांवर मचाणांची सोय करण्यात आली आहे.
निसर्गप्रेमी, स्वयंसेवी संस्था आणि विद्यार्थ्यांना या उपक्रमात सहभागी करून घेण्यात येणार आहे. एका मचाणावर जास्तीत जास्त दोनच व्यक्तींना बसण्याची परवानगी असेल. ‘प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य’ या तत्त्वावर निवडीची प्रक्रिया पार पडणार आहे.
केवळ गणना न राहता, मानवाचे निसर्गाशी नाते अधिक घट्ट व्हावे आणि वन्यजीव संरक्षणाबद्दल जनजागृती व्हावी, हा यामागचा मुख्य उद्देश आहे. जिल्ह्यातील एकूण 28 मचाणे/पाणवठ्यांच्या ठिकाणी ही पाहणी करण्यात येणार आहे.
रेहेकुरी (काळवीट अभयारण्य) येथे तीन ठिकाणी, करमाळा येथे तीन ठिकाणी, नान्नज (माळढोक अभयारण्य) येथे तीन ठिकाणी, सुपे (मयूरेश्वर अभयारण्य) येथे तीन ठिकाणी, भीमाशंकर अभयारण्य 1 आणि 2 येथे 6 ठिकाणी, ताम्हिणी आणि शिरूर/निरगुडसर येथे प्रत्येक ठिकाणी 3, तर श्रीगोंदा येथे 4 ठिकाणी व्यवस्था करण्यात आली आहे, अशी माहिती विभागीय वन अधिकारी संदीप गवारे यांनी दिली.
2025 साली 1,428 प्राण्यांची नोंद
पुणे वन्यजीव विभागांतर्गत येणाऱ्या विविध वनपरिक्षेत्रांमधील प्राणिगणनेची अधिकृत आकडेवारी प्रसिद्ध करण्यात आली आहे. बुद्ध पौर्णिमेच्या लख्ख प्रकाशात मचाणावरून करण्यात आलेल्या या निरीक्षणादरम्यान एकूण 1,428 वन्यप्राण्यांचे दर्शन घडले आहे. विभागातील 9 प्रमुख वनपरिक्षेत्रांमध्ये ही गणना पार पडली. काळवीट आणि रानडुकरांच्या संख्येत मोठी वाढ पाहायला मिळत आहे.
दरवर्षीप्रमाणे यावर्षीही बुद्ध पौर्णिमेच्या दिवशी प्राणिगणना करण्यात येणार आहे. यामध्ये स्वयंसेवी संस्था, विद्यार्थी सहभागी होणार असून, किती जण उपक्रमात सहभागी होतील, ते त्याच दिवशी कळू शकेल. परंतु, वन विभागाकडून याबाबतची सर्व तयारी झालेली आहे.केशव वाबळे, उपवनसंरक्षक, वन्यजीव, वन विभाग