पुणे: दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवर सलग दोन आठवडे स्थगित ठेवण्यात आलेली पुणे शहरातील साप्ताहिक पाणीकपात आता पुन्हा सुरू होणार आहे. येत्या गुरुवारपासून (दि.२०) महापालिकेकडून नियमित पाणीकपातीचे वेळापत्रक लागू केले जाणार आहे.
त्यामुळे गुरुवारी संपूर्ण शहराचा पाणीपुरवठा बंद राहणार असून, शुक्रवारीही अनेक भागांत कमी दाबाने आणि उशिराने पाणी मिळण्याची शक्यता आहे. दिवाळीच्या काळात मिळालेला दिलासा संपल्याने पुणेकरांना पुन्हा पाणीकपातीचा सामना करावा लागणार आहे.
शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या जलस्रोतांमधील उपलब्ध पाणीसाठा आणि आगामी काळातील संभाव्य कमी पर्जन्यमानाचा विचार करून महापालिकेने पाणीकपातीचे नियोजन केले आहे. त्यानुसार १५ ऑक्टोबरपासून दर गुरुवारी संपूर्ण शहराचा पाणीपुरवठा बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला होता.
मात्र, दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांची गैरसोय होऊ नये, यासाठी ५ आणि १२ नोव्हेंबर रोजीची नियोजित पाणीकपात रद्द करण्यात आली होती. त्यामुळे सलग दोन आठवडे पुणेकरांना दिलासा मिळाला होता. सणासुदीच्या काळातील ही सवलत आता संपुष्टात आली आहे. गुरुवारपासून पुन्हा नियमित पाणीकपात लागू होणार आहे. यासंदर्भात महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाने मंगळवारी परिपत्रक जारी केले आहे.
उपलब्ध पाणीसाठ्याचा काटकसरीने वापर व्हावा आणि भविष्यातील पाणीपुरवठ्याचे नियोजन सुरळीत करता यावे, हा या निर्णयामागील उद्देश असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे. नागरिकांनी पाण्याचा जपून वापर करावा आणि आवश्यक तेवढाच पाणीसाठा करून ठेवावा, असे आवाहनही करण्यात आले आहे.