पुणे: पुण्यात यंदा चांगला पाऊस झाला, धरणांत पाणीसाठाही उपलब्ध आहे; तरी सुद्धा शहरातील अनेक भागांत नागरिकांना पिण्याच्या आणि वापराच्या पाण्यासाठी टँकरवर अवलंबून राहावे लागत आहे. महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाच्या यंदा ३० ऑगस्ट अखेरच्या आकडेवारीनुसार, चालू आर्थिक वर्षात आतापर्यंत २ लाख ३० हजार ४८८ टँकर फेऱ्या झाल्या आहेत. यामध्ये महापालिकेच्या टँकरच्या १० हजार ७२६, ठेकेदारांच्या टँकरच्या १ लाख ८९ हजार ४८४, तर चलन पद्धतीने पाणीपुरवठा करणाऱ्या टँकरच्या ३० हजार २७८ फेऱ्यांचा समावेश आहे. या आकडेवारीत ठेकेदारांच्या टँकरचा वाटा सर्वाधिक असून, एकूण फेऱ्यांपैकी ८२ टक्के फेऱ्या ठेकेदारांच्या टँकरने केल्या आहेत.
यंदा धरणे शंभर टक्के भरल्यामुळे महापालिकेने पाणीकपातीचा निर्णय मागे घेतला. शहरात नळाद्वारे व विविध भागांत टाक्या बांधून पाणी पुरवठा केला जातो. मात्र, काही भागांत नळजोड असतानाही टँकरने पाणी घ्यावे लागत आहे. महापालिकेच्या मागील तीन आर्थिक वर्षांच्या आकडेवारीचा आढावा घेतल्यास टँकर फेऱ्यांची संख्या सातत्याने मोठ्या प्रमाणात राहिल्याचे दिसते. २०२३-२४ मध्ये एकूण ४ लाख ३४८ टँकर फेऱ्या झाल्या होत्या. २०२४-२५ मध्ये हा आकडा ४ लाख ८९ हजार २०२ वर पोहोचला, तर २०२५-२६ मध्ये वर्षभरात ५ लाख १७ हजार ४२२ टँकर फेऱ्यांची नोंद झाली. २०२३-२४ च्या तुलनेत २०२५-२६ मध्ये टँकर फेऱ्यांमध्ये १ लाख १७ हजार ७४ इतकी वाढ झाली आहे. म्हणजेच दोन वर्षांत वाढीचे प्रमाण २९.२४ टक्के आहे.
विशेष म्हणजे, २०२५-२६ या वर्षात झालेल्या ५ लाख १७ हजार ४२२ फेऱ्यांच्या तुलनेत चालू वर्षाच्या ऑगस्टअखेरच २ लाख ३० हजार ४८८ फेऱ्या झाल्या आहेत. हा आकडा गतवर्षाच्या एकूण फेऱ्यांच्या ४४.५ टक्के आहे. चालू वर्षाला अद्याप सात महिने बाकी असल्याने पुढील काळात टँकरची गरज किती राहणार, याकडे लक्ष लागले आहे. टँकर फेऱ्यांच्या आकडेवारीवरून टँकर पुरवठ्यात ठेकेदारांचे वर्चस्व स्पष्टपणे दिसते. २०२३-२४ मध्ये ठेकेदारांच्या टँकरच्या ३ लाख ४५ हजार ८४६ फेऱ्या झाल्या होत्या. २०२४-२५ मध्ये हा आकडा ३ लाख ९९ हजार ४६ झाला, तर २०२५-२६ मध्ये तो ४ लाख ३४ हजार ८०४ वर पोहोचला. म्हणजेच २०२३-२४ च्या तुलनेत २०२५-२६ मध्ये ठेकेदारांच्या टँकर फेऱ्यांमध्ये ८८ हजार ९५८ इतकी वाढ झाली आहे.
दुसरीकडे, महापालिकेच्या स्वतःच्या टँकरच्या फेऱ्या २०२३-२४ मध्ये २७१८४, २०२४-२५ मध्ये ३५०८० आणि २०२५-२६ मध्ये ३२९७३ होत्या. तर, चलन पद्धतीने पाणीपुरवठा करणाऱ्या टँकरच्या फेऱ्या अनुक्रमे २७३१८, ५५ हजार ७६ आणि ४९६४५ इतक्या नोंदवण्यात आल्या. या आकडेवारीमुळे शहरातील टँकरची गरज नेमकी कोणत्या भागांत आणि कोणत्या कारणांमुळे कायम आहे, हे पाहण्याची गरज निर्माण झाली आहे. पाऊस आणि धरणांतील पाणीसाठा उपलब्ध असतानाही नागरिकांना टँकर मागवावे लागत असतील, तर नियमित नळ पाणीपुरवठा सर्व भागांत पुरेशा प्रमाणात पोहोचतो का, हा महत्त्वाचा प्रश्न आहे.
टँकरच्या वाढत्या फेऱ्या म्हणजे केवळ पाण्याची मागणी नव्हे, तर शहरातील पाणीवितरण व्यवस्थेची स्थिती तपासण्याची संधीही आहे. टँकरची गरज असलेल्या भागांची माहिती, त्या भागांतील नियमित पाणीपुरवठ्याची स्थिती आणि टँकरवरील खर्च यांची सांगड घालून महापालिकेने ठोस उपाययोजना करणे आवश्यक आहे. अन्यथा पावसाळा संपल्यानंतरही टँकरवरील अवलंबित्व कायम राहण्याची शक्यता नाकारता येत नाही.
टँकर फेऱ्यांचे वर्गीकरण
आर्थिक वर्ष - महापालिका - ठेकेदार - चलन - एकूण
२०२३-२४ - २७,१८४ - ३,४५,८४६ - २७,३१८ - ४,००,३४८
२०२४-२५ - ३५,०८० - ३,९९,०४६ - ५५,०७६ - ४,८९,२०२
२०२५-२६ - ३२,९७३ - ४,३४,८०४- ४९,६४५ - ५,१७,४२२
२०२६-२७ (३० ऑगस्टपर्यंत) - १०,७२६ - १,८९,४८४ - ३०,२७८ - २,३०,४८८
समाविष्ट गावांच्या पाणीपुरवठ्याची मदार टँकरवरच
महापालिकेच्या हद्दीत २०१७ मध्ये ११, तर २०२१ मध्ये २३ गावांचा समावेश झाला. या गावांना महापालिकेमार्फत पाणीपुरवठा केला जात आहे. मात्र, हा पाणीपुरवठा नागरिकांच्या घशाची कोरड देखील पूर्ण करू शकत नाही. त्यामुळे समाविष्ट गावातील नागरिकांना टँकरने पाणी विकत घ्यावे लागत आहे.
टँकरच्या पाण्याचा आर्थिक बोजा
पाणीटंचाईच्या काळात टँकरवर अवलंबून राहणाऱ्या सोसायट्यांनाही मोठा आर्थिक फटका बसतो. महापालिकेच्या दराने ७०० रुपयांचा टँकर उपलब्ध होत असताना खासगी टँकरसाठी वाहतूक व इतर खर्चासह २,५०० ते ३,००० रुपये मोजावे लागत असल्याचे चित्र आहे. त्यामुळे टँकरवरची अवलंबित्वाची गरज कमी करण्यासाठी स्थानिक जलस्रोतांचा वापर वाढवणे हा दीर्घकालीन उपाय ठरू शकतो.
पुण्यात ज्या ठिकाणी टँकरची मागणी आहे तेथे, आम्ही टँकरद्वारे पाणी देत आहोत. महापालिकेचा टँकर ७०० रुपयांना उपलब्ध आहे. समाविष्ट गावांत नागरिकांच्या मागणीनुसार टँकरने पाणीपुरवठा केला जात आहे.नंदकिशोर जगताप, पाणीपुरवठा विभागाचे प्रमुख, महापालिका