पुणे: निगडी येथील मुख्य जलवाहिनी स्थलांतराचे काम आणि होळकर जलशुद्धीकरण केंद्रातील विद्युतविषयक देखभाल व दुरुस्तीची कामे हाती घेण्यात येणार असल्यामुळे गुरुवारी (दि. २३ जुलै) नगर रस्ता परिसरातील अनेक भागांचा पाणीपुरवठा पूर्णपणे बंद राहणार आहे. तसेच, शुक्रवारी (दि. २४ जुलै) या भागांना उशिरा आणि कमी दाबाने पाणीपुरवठा होणार असल्याची माहिती पुणे महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाने दिली.
बंडगार्डन पाणीपुरवठा विभागांतर्गत म्हस्केवस्ती, गणेशनगर (बोपखेल), कळस, विमानतळ परिसर, खराडी, विश्रांतवाडीचा काही भाग, संजय पार्क तसेच हरीगंगा जलटाकीवर अवलंबून असलेले अहिल्यानगर, सैनिकनगर, साप्रस, शांतीनगर, प्रतीकनगर, जाधवनगर आणि पंचशीलनगर या भागांचा पाणीपुरवठा गुरुवारी बंद राहणार आहे.
याशिवाय चतु:श्रृंगी पाणीपुरवठा विभागांतर्गत खडकी कॅन्टोन्मेंट बोर्ड परिसर, दारूगोळा कारखाना आणि मुळा रस्ता परिसरालाही या कामांचा फटका बसणार असून, त्या भागांमध्येही गुरुवारी पाणीपुरवठा होणार नाही.
महापालिकेने नागरिकांनी आवश्यक तेवढ्या पाण्याचा साठा करून ठेवावा आणि पाण्याचा काटकसरीने वापर करावा, असे आवाहन केले आहे. शुक्रवार, दि. २४ जुलै रोजी पाणीपुरवठा पूर्ववत सुरू होईल; मात्र तो उशिरा आणि कमी दाबाने होण्याची शक्यता असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.