पुणे: खडकवासला धरणसाखळीतील घटत्या पाणीसाठ्याच्या पार्श्वभूमीवर महापालिकेने सोमवारपासून शहरात सम-विषम तारखेनुसार दिवसाआड पाणीपुरवठ्याची अंमलबजावणी सुरू केली. सोमवारी विषम तारखेला पाणीपुरवठा होणाऱ्या काही भागांत कमी दाबाने, तर काही ठिकाणी अपुरा पुरवठा झाल्याची तक्रार नागरिकांनी दैनिक 'पुढारी'कडे केली. याबाबत संबंधित उपअभियंत्यांना फोन केले असता काहींचे फोन लागले नाही, तर काहींचे फोन डायव्हर्ट होते. पहिल्याच दिवशी ही अवस्था असल्याने येणाऱ्या काळात प्रशासनाची पाणीपुरवठा करताना दमछाक होणार आहे.
अल निनोच्या प्रभावामुळे मान्सूनच्या आगमनास विलंब होत असून, अपेक्षित प्रमाणात पाऊस न झाल्याने शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांमधील उपलब्ध साठ्याचा काटकसरीने वापर करण्याच्या सूचना राज्य सरकारने दिल्या आहेत. त्यानुसार महापालिकेने सम-विषम पद्धतीने पाणीपुरवठा करण्यास सुरुवात केली आहे. नव्या नियोजनानुसार सोमवारी विषम तारखांच्या भागांना पाणीपुरवठा करण्यात आला.
मंगळवारी सम तारखांच्या भागांना पाणी सोडण्यात येणार आहे. मात्र, पहिल्या दिवशी काही भागांत पाण्याच्या अडचणी आल्या. जनता वसाहत, दांडेकर पूल, फरशी पूल, दत्तवाडी, पानमळा, राजाराम पूल परिसर, नवश्या मारुती मंदिर, आंबेडकर वसाहत परिसरात काही ठिकाणी पाणी आले. मात्र, ते कमी दाबाने आल्याच्या तक्रारी नागरिकांनी केल्या. तसेच, काही काळ पाणीपुरवठा बंद होता, असेही काहींंनी सांगितले. तसेच, हिंगणे, सिंहगड रस्त्याच्या काही भागांत देखील कमी दाबाने पाणीपुरवठा झाला.
उपनगरातील कर्वेनगरमधील काही भाग वगळता उर्वरित कर्वेनगर, वारजे माळवाडी, शिवणे, उत्तमनगर, कोंढवे धावडे आदी भागांत सम तारखेस पाणीपुरवठा होणार आहे. कर्वेनगरमधील श्रमिक वसाहत, वडारवस्ती, एस. बी. आय. कॉलनी या तीन ठिकाणी दुपारच्या ठरावीक वेळेत पाणी आले असून, याच भागातील शेजारील लेनमध्ये पाणी आले नसल्याने नागरिकांमध्ये संभ्रम निर्माण झाला असून, किमान होणारा तरी पाणीपुरवठा पुरेशा प्रमाणात करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.
दरम्यान, याबाबत महापालिकेच्या अधिकाऱ्यांना विचारले असता पहिल्या दिवशी किरकोळ तक्रारी आल्या, असे सांगत वितरण प्रक्रिया सुरळीत पार पाडली. मात्र, नागरिकांना नव्या वेळापत्रकाची सवय होण्यासाठी काही दिवसांचा कालावधी लागू शकतो. त्यामुळे वितरण व्यवस्थेतील त्रुटी किंवा स्थानिक पातळीवरील अडचणी पुढील टप्प्यात समोर येऊ शकतात.
पाणीपुरवठा विभागातील काही कनिष्ठ अभियंते आणि उपअभियंत्यांच्या अलीकडेच बदल्या झाल्या असल्या, तरी नव्या पाणीपुरवठा व्यवस्थेच्या अंमलबजावणीदरम्यान त्यांच्यावर अतिरिक्त जबाबदारी सोपविण्यात आली आहे. संबंधित विभागांच्या जलवितरण यंत्रणेची माहिती असल्याने संभाव्य तांत्रिक समस्यांवर तातडीने उपाययोजना करता येतील, असे पाणीपुरवठा विभागाचे नंदकुमार जगताप यांनी सांगितले.
सम-विषम पद्धतीच्या पाणीपुरवठ्याची अंमलबजावणी नियोजनानुसार सुरू झाली आहे. पहिल्या दिवशी विशेष तक्रारी प्राप्त झालेल्या नाहीत. मात्र, पुढील काही दिवसांतील परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवण्यात येत असून, आवश्यक त्या सर्व उपाययोजना सज्ज ठेवण्यात आल्या आहेत.पवनीत कौर, अतिरिक्त आयुक्त
आज विषम तारखेला आमच्या भागाला पाणीपुरवठा होणार होता. आमच्याकडे पाणी आले. मात्र, काही भागांत कमी दाबाने पाणी आल्याच्या तक्रारी आल्या, तर काही ठिकाणी दोन ते तीन तास पाणी बंद असल्याने नागरिकांना अडचणी आल्या.नितीन कदम, सामाजिक कार्यकर्ते
पर्जन्यमानावरच पुढील रणनीती
हवामान विभागाने २० जूननंतर पावसाला गती मिळण्याचा अंदाज वर्तविला असला तरी प्रत्यक्ष पर्जन्यमानावरच शहराच्या पाणीपुरवठ्याचे पुढील नियोजन अवलंबून राहणार आहे. पावसाला आणखी विलंब झाल्यास किंवा अपेक्षित प्रमाणात पाऊस न झाल्यास पाणीटंचाईची परिस्थिती अधिक गंभीर होऊ शकते. अशा वेळी दिवसाआड पाणीपुरवठ्याची व्यवस्था अधिक काळ सुरू ठेवण्याची वेळ येऊ शकते, अशी शक्यता महापालिकेतील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी व्यक्त केली आहे. त्यामुळे आगामी काही आठवडे पुण्याच्या जलव्यवस्थापनासाठी अत्यंत महत्त्वाचे मानले जात आहेत.
कर्वेनगर भागातील श्रमिक वसाहत या ठिकाणी पाणीपुरवठा दुपारी वेळेत झाला आहे. पाणी कमी दाबाने आले असून, हा पाणीपुरवठा पुरेशा प्रमाणात व्हावा.अशोक कदम, स्थानिक नागरिक
आज सकाळी पाणी आले नव्हते, त्यामुळे आमच्या अपार्टमेंटमध्ये पाण्याचा एक टँकर मागवला होता.डॉ. मिहिर हजारनीस, सेक्रेटरी, प्रोफाईल ईडन अपार्टमेंट
आमच्याकडे आज पाणी आले आहे. मात्र, उद्या पाणी येणार नसल्याने परिस्थिती अवघड होणार आहे. पाणी किती साठा करून ठेवायचा, याला देखील काही मर्यादा आहेत.मंदा लोहार, गणेशनगर