Jejuri Somvati Yatra 2026: जेजुरी सोमवती यात्रेला ३ लाखांहून अधिक भाविकांची गर्दी; भक्तिभावात न्हालं गड

खंडोबा देवाच्या सोमवती यात्रेनिमित्त कऱ्हास्नान, पालखी सोहळा आणि भंडाऱ्याच्या उधळणीने जेजुरीनगरी भक्तिमय झाली
Jejuri Somvati Yatra
Jejuri Somvati YatraPudhari
Published on
Updated on

जेजुरी: अवघ्या महाराष्ट्राचे कुलदैवत आणि बहुजन समाजाचा लोकदेव असलेल्या खंडोबा देवाच्या सोमवती यात्रेनिमित्त जेजुरीनगरीत सोमवारी (दि. १५) ३ लाखांहून अधिक भाविकांची गर्दी झाली होती. दीड वर्षानंतर आलेल्या सोमवती यात्रेनिमित्त देवदर्शन, कऱ्हास्नान आणि कुलधर्म-कुलाचारासाठी राज्यभरातून भाविक मोठ्या संख्येने दाखल झाले होते.

Jejuri Somvati Yatra
Nira Farmer Crisis: निरा परिसरात पावसाची दडी; खरिपाच्या पेरण्या रखडल्या, शेतकरी चिंतेत

पहाटे दोन वाजता देवाचे मानकरी पेशवे इनामदार तसेच खोमणे आणि माळवदकर पाटील यांच्या इशाऱ्यानंतर पालखी सोहळ्याला प्रारंभ झाला. या वेळी देवसंस्थानच्या वतीने बंदुकीच्या फैरी आणि हवाई फटाक्यांच्या आतषबाजीत सोहळ्याला सलामी देण्यात आली. पालखीसमोर निशाण, छत्रचामरे, अब्दागिरी तसेच घडशी समाजबांधवांच्या सनईवादनाने वातावरण भक्तिमय झाले होते.

Jejuri Somvati Yatra
Saswad CCTV Security System Demand: सासवडमध्ये सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची मागणी; सुरक्षा आणि गुन्हे नियंत्रणासाठी नागरिक आग्रही

मंदिर प्रदक्षिणेनंतर श्री खंडोबा व म्हाळसादेवी यांच्या उत्सवमूर्ती पालखीत विराजमान करण्यात आल्या. पालखी गडावरून मार्गस्थ होताच लाखो भाविकांनी 'सदानंदाचा येळकोट', 'येळकोट येळकोट जय मल्हार'च्या जयघोषात भंडाऱ्याची उधळण केली. त्यामुळे संपूर्ण गड परिसर पिवळ्या धमक भंडाऱ्याने न्हाऊन निघाला. जेजुरी गडावरून निघालेला पालखी सोहळा बानूबाई मंदिर, नंदी चौक, मल्हार गौतमेश्वर छत्री मंदिरमार्गे कऱ्हा नदीकाठी पोहचला. सुमारे पाच किलोमीटरचे अंतर खांद्यावर पालखी वाहत मानकऱ्यांनी पूर्ण केले.

Jejuri Somvati Yatra
Pune Center Head Recruitment 2026: केंद्रप्रमुख भरतीला गती; पुणे जिल्ह्यात १५१ नव्या पदांना मंजुरी

सकाळी ७ वाजता रंभाई शिंपीण कट्ट्यावर उत्सवमूर्तींसमोर रुद्रावर्तन आणि मंत्रघोष करण्यात आला. त्यानंतर मानकरी व भाविकांच्या उपस्थितीत उत्सवमूर्तींना दही, दूध आणि कऱ्हास्नान घालण्यात आले. या वेळी सुमारे एक लाख भाविकांनी कऱ्हास्नानाची पर्वणी साधली. परतीच्या प्रवासात पालखी सोहळा धालेवाडी, दवणेमळामार्गे जानाई मंदिरात विसावला. त्यानंतर सकाळी अकरा वाजता मानवी साखळीच्या माध्यमातून पालखी पुन्हा गडावर दाखल झाली.

Jejuri Somvati Yatra
Hadapsar Traffic Congestion: हडपसर माळवाडी रस्त्यावर वाहतूक कोंडी; शाळेच्या पहिल्या दिवशी विद्यार्थ्यांचे हाल

रोजमुरा वाटपानंतर सोहळ्याची सांगता झाली. सोमवती यात्रेनिमित्त श्री खंडोबा मंदिर व गड परिसरात आकर्षक विद्युतरोषणाई आणि फुलांची सजावट करण्यात आली होती. श्री खंडोबा पालखी सोहळा खांदेकरी, मानकरी, ग्रामस्थ मंडळ, श्री मार्तंड देवसंस्थान, जेजुरी पोलिस स्टेशन, जेजुरी नगरपरिषद आणि ग्रामस्थांच्या नियोजनामुळे सोहळा उत्साहात व शिस्तबद्ध वातावरणात पार पडला.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news