

प्रा. अनिल धुमाळ
शिवनगर: सीमावर्ती जिल्हे कोल्हापूर, सांगली, सोलापूर, लातूर, पालघर, नागपूर किंवा मुख्य महामार्गांवरील पोलीस ठाणी आणि आरटीओ नाक्यांवर आपल्या 'अनुकूल' अधिकाऱ्यांची नियुक्ती करून घेण्यासाठी खुटक्याच्या खेळातील बडे आका कोट्यवधी रुपयांचा निधी आणि राजकीय प्रभावाचा वापर करतात.
हा विळखा इतका घट्ट असतो की, जेव्हा एखादा प्रामाणिक अधिकारी या 'सिंडिकेट'वर कारवाई करण्याचा प्रयत्न करतो, तेव्हा त्याची तत्काळ बदली केली जाते किंवा त्याच्यावर अंतर्गत दडपण आणले जाते. जोपर्यंत आंतरराज्यीय स्तरावर कठोर राजकीय इच्छाशक्ती आणि तपास यंत्रणांची प्रामाणिक नाकाबंदी होत नाही, तोपर्यंत हा कोट्यवधींचा छुपा खेळ असाच सुरू राहतो. एकूणच गुटखा आणि सुगंधित तंबाखूच्या वाढत्या छुप्या सुळसुळाटामुळे आजची तरुण पिढी अंमल आणि व्यसनाच्या गर्तेत वेगाने ओढली जात आहे. गुटखा केवळ खिशाला कात्री लावत नाही, तर माणसाचा सुखी संसार आणि आरोग्य एका क्षणात उद्ध्वस्त करतो.
आज ग्रामीण भागातील वाड्या-वस्त्यांवर पाहिले तर तरुण मुले सकाळीच टपऱ्यांवर थुंकताना दिसतात. ज्या हातांमध्ये काम असायला हवे, जे हात शेती आणि उद्योगात असायला हवेत, ते हात व्यसनाने थरथरत आहेत. व्यसनाधीनतेमुळे तरुणांमधील गुन्हेगारी प्रवृत्ती, चिडचीड आणि आत्महत्यांचे प्रमाण वाढले आहे. शासनाने जर आताच या तस्करांवर आणि छुप्या विक्रेत्यांवर कडक सामाजिक बहिष्कार किंवा कायदेशीर बडगा उगारला नाही, तर येत्या काही वर्षांत महाराष्ट्राला 'व्यसनी तरुणांचा प्रदेश' म्हणून ओळखला जाऊ लागल्यास नवल नाही.
गुटखा म्हणजे कॅन्सरचे थेट निमंत्रण
पूर्वी कॅन्सरचे रुग्ण वय वर्ष ४५ किंवा ५० नंतर आढळायचे. पण आता आमच्याकडे १८ ते २५ वयोगटातील तरुण येत आहेत, ज्यांच्या जिभेला किंवा गालाला आतून गंभीर जखमा झालेल्या असतात. गुटख्यामध्ये असणारे काचसदृश केमिकल तोंडाच्या आतील त्वचेला ओरखडे काढतात, जेणेकरून निकोटिन रक्तात वेगाने शोषले जावे. हे ओरखडे पुढे जाऊन कॅन्सरच्या गाठीत रूपांतरित होतात,असे मुर्टी येथील डॉ. संजय सावंत यांनी सांगितले.
आमची कष्टाची कमाई आणि पोरांचे आयुष्य दोन्ही उद्ध्वस्त
आम्ही शेतात रक्ताचं पाणी करून मुलांना शहरात शिकायला पाठवतो. पण कॉलेजच्या कट्ट्यांवर आणि मित्रांच्या संगतीत ही मुले कधी गुटख्याच्या आहारी जातात, हे समजतच नाही. सुरुवातीला फॅशन म्हणून खातात आणि नंतर त्याचे व्यसन लागते. जेव्हा मुलाच्या तोंडाला दुर्गंधी येते किंवा ते घरात पैसे चोरायला लागते, तेव्हा पालकांना समजते. तोपर्यंत खूप उशीर झालेला असतो. सरकारने बंदी घातली आहे तर मग गल्ली बोळातील टपऱ्यांवर हा विखारी माल येतोच कसा? आमच्या डोळ्यांदेखत आमची मुले बाद होताना पाहणे हे पालकांसाठी मरणयातना सहन करण्यासारखे आहे,अशी प्रतिक्रिया एका हतबल पालकाने व्यक्त केली.