Khadakwasla Dam Pudhari File Photo
पुणे

Pune Water Shortage: पुणेकरांवर पाणीकपातीचे संकट; धरणांतील पाणीसाठा वर्षभरात ६ टीएमसीने घटला

जानेवारी-फेब्रुवारीत आठवड्यातून तीन दिवस, तर एप्रिलमध्ये दहा दिवसांनी पाणीपुरवठ्याची शक्यता; प्रशांत जगताप यांचा सत्ताधाऱ्यांना सवाल

पुढारी वृत्तसेवा

पुणे: पुण्याला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांमधील पाणीसाठा गेल्या वर्षीच्या तुलनेत तब्बल ६ टीएमसीने घटल्याने पुणेकरांवर तीव्र पाणीकपातीचे संकट ओढवले आहे. या गंभीर प्रश्नावर जलसंपदामंत्री, मुख्यमंत्री, खासदार, सात आमदार आणि महापौर मौन बाळगून गप्प असल्याचा आरोप करत, या पाणीटंचाईची जबाबदारी नेमकी कोणाची? असा संतप्त सवाल काँग्रेसचे प्रशांत जगताप यांनी पत्रकार परिषदेत केला.

जगताप म्हणाले, सध्या धरणांमध्ये २१.२५ टीएमसी पाणीसाठा शिल्लक असून, गेल्या वर्षी हाच साठा २७.६० टीएमसी इतका होता. उपलब्ध साठा लक्षात घेता, जानेवारी-फेब्रुवारीमध्ये आठवड्यातून तीन दिवस, तर एप्रिलमध्ये दर दहा दिवसांनी पाणीपुरवठा होण्याची शक्यता जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यांनी वर्तवली आहे. खरीप हंगामासाठी हे पाणी सोडण्यात आले असून, त्यासाठी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री कार्यालयातून आदेश मिळाल्याची कबुली संबंधित अधिकाऱ्यांनी दिली आहे.

सध्याच्या दुष्काळसदृश परिस्थितीत पिण्याच्या पाण्याला आणि जनावरांना प्राधान्य देण्याची घोषणा मुख्यमंत्र्यांनी केली असतानाही शेतीसाठी मोठ्या प्रमाणात पाणी सोडल्याने नाराजी व्यक्त होत आहे. आगामी काळात शहरात १० ते १२ लाख स्थलांतरित नागरिक येण्याची शक्यता असून, जिल्ह्यातील साडेतीन तालुक्यांनाही याचा फटका बसणार आहे. शेतकऱ्यांना पाणी देण्यास विरोध नसला, तरी प्रथम प्राधान्य पुणेकरांच्या पिण्याच्या पाण्याला द्यावे, अशी मागणी असून, गंभीर प्रश्नावर सत्ताधारी लोकप्रतिनिधी जबाबदारी घेणार का? असा प्रश्न उपस्थित करीत शहराचे खासदार, आमदार आणि महापौर यांनी पुणेकरांना उत्तरे द्यावीत, अशी मागणी ही जगताप यांनी या वेळी केली.

आयुक्तांना लक्ष्य करण्यासाठीच आंदोलन

कालचे सभागृहातील आंदोलन हे केवळ आयुक्तांना लक्ष्य करण्यासाठी करण्यात आले होते. आयुक्त प्रामाणिकपणे काम करत असून, त्यांनी अनेक चुकीचे प्रस्ताव नाकारल्याच्या रागातून हे आंदोलन करण्यात आले. अतिक्रमणाविरोधातील कारवाई पुढेही सुरूच राहील, ज्यांची कामे चुकीची आहेत त्यांनाच या कारवाईची भीती वाटत आहे. प्रशासनाच्या कारवाईदरम्यान सरकारी कामात अडथळा आणणाऱ्या लोकप्रतिनिधींविरोधात राज्य शासनाकडे तक्रार केली जाणार असून, याप्रकरणी न्यायालयात याचिकाही दाखल करणार असल्याचे प्रशांत जगताप यांनी या वेळी सांगितले.

रोहित पवारांना जाणीवपूर्वक टार्गेट केले जाते

अपघात प्रकरणाच्या चौकशीत सुरू असलेला हलगर्जीपणा आणि रोहित पवारांवर होत असलेली विनाकारण टीका चिंताजनक आहे. रोहित पवार हे नेहमी पुराव्याशिवाय कोणतीही भूमिका घेत नाहीत. गेल्या दहा वर्षांतील त्यांच्या जनहिताच्या कामाचा आणि पारदर्शक अनुभवाचा इतिहास साक्षी आहे. त्यांना जाणीवपूर्वक टार्गेट केले जात असून, या प्रकरणात त्यांनी घेतलेली भूमिका सर्वथा योग्यच असल्याचे जगताप यांनी या वेळी सांगितले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT