पुणे: शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणक्षेत्रात पावसाने पुन्हा उघडीप दिल्याने पुणेकरांना पुन्हा एकदा एक दिवसाआड पाणीपुरवठ्याला सामोरे जावे लागणार आहे. महापालिकेने १५ जुलैपासून शहरात पुन्हा एकदिवसाआड पाणीपुरवठा करण्याचा निर्णय घेतला असून, पुढील काही दिवसांतील पावसाच्या स्थितीचा आढावा घेऊन पुढील निर्णय घेतला जाईल, अशी माहिती महापालिका आयुक्त नवल किशोर राम यांनी दिली.
यंदाच्या जून महिन्यात पावसाने अपेक्षित हजेरी लावली नव्हती. त्यामुळे शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या खडकवासला धरणसाखळीतील पाणीसाठ्यात घट झाली होती. जलसंपदा विभागाच्या सूचनेनुसार महापालिकेने जून महिन्यात शहरात एकदिवसाआड पाणीपुरवठा सुरू केला होता. दरम्यान, जुलैच्या पहिल्या आठवड्यात झालेल्या जोरदार पावसामुळे धरणांतील पाणीसाठ्यात लक्षणीय वाढ झाली. ६ जुलै रोजी मुळशी तालुका आणि पिंपरी-चिंचवड परिसरात झालेल्या मुसळधार पावसामुळे आळंदी येथील इंद्रायणी नदीला पूर आला. आषाढी वारीच्या पार्श्वभूमीवर वारकऱ्यांना पुण्यातच मुक्काम करण्याच्या सूचना प्रशासनाने दिल्या होत्या.
त्यामुळे वारीदरम्यान नागरिकांना आणि वारकऱ्यांना कोणतीही अडचण निर्माण होऊ नये, यासाठी ७ जुलैपासून शहरात नियमित पाणीपुरवठा सुरू करण्यात आला होता. पालखी सोहळा पुण्यातून मार्गस्थ होईपर्यंत, म्हणजे १२ जुलैपर्यंत ही व्यवस्था कायम ठेवण्यात आली. जुलैच्या पहिल्या आठ दिवसांत झालेल्या पावसामुळे धरणसाखळीत १६ टीएमसीहून अधिक पाण्याची भर पडली. खडकवासला धरण सुमारे ८५ टक्के भरल्यानंतर सुमारे दीड टीएमसी पाणी नदीपात्रात सोडण्यात आले. त्यामुळे पाणीकपात मागे घेण्याबाबत चर्चा सुरू झाली होती. महापौरांनीही यासंदर्भातील निर्णय पक्षनेत्यांच्या बैठकीत घेतला जाईल, असे स्पष्ट केले होते. मात्र, त्यानंतर पावसाने पुन्हा उघडीप दिल्याने धरणे पूर्णक्षमतेने भरण्याबाबतची चिंता कायम आहे.
जलसंपदा विभाग आणि हवामान विभागाकडूनही पाऊस लांबण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर खबरदारीचा उपाय म्हणून १५ जुलैपासून शहरात पुन्हा एकदिवसाआड पाणीपुरवठा सुरू करण्यात येणार असल्याचे आयुक्त नवल किशोर राम यांनी स्पष्ट केले. तसेच, पुढील काही दिवसांत पावसाचे प्रमाण वाढल्यास परिस्थितीचा आढावा घेऊन पुढील निर्णय घेतला जाईल, असेही राम यांनी सांगितले.
वारीमुळे रद्द केली होती पाणीकपात
महापालिकेने यापूर्वी शहरात दिवसाआड पाणीपुरवठा लागू करण्याचा निर्णय जाहीर केला होता. मात्र, आषाढी वारीसाठी लाखो वारकरी पुण्यात दाखल होणार असल्याने त्यांना पाण्याची कोणतीही अडचण निर्माण होऊ नये तसेच शहरातील नागरिकांनाही गैरसोय होऊ नये, या उद्देशाने हा निर्णय तात्पुरता स्थगित करण्यात आला होता. त्या काळात महापालिकेने वारकऱ्यांच्या मुक्कामाच्या ठिकाणी अतिरिक्त पाणीपुरवठ्याची व्यवस्था केली होती. शहरातील महापालिका शाळा, निवासस्थाने, तात्पुरते निवारा केंद्र आणि प्रमुख पालखी मार्गांवर पाण्याचा पुरवठा सुरळीत राहावा, यासाठी प्रशासनाने विशेष नियोजन केले होते. वारी पुढे मार्गस्थ झाल्याने आता पुन्हा पाणीकपातीचा निर्णय घेण्याच्या विचारात प्रशासन आहे.