पुणे: पावसाने दिलेली ओढ आणि आगामी पावसाबाबतची अनिश्चितता लक्षात घेऊन उपलब्ध पाणीसाठ्याचे नियोजन करण्यासाठी जलसंपदा विभागाने पुणे, पिंपरी-चिंचवडसह औद्योगिक क्षेत्रांना पाणीकपातीच्या सूचना दिल्या आहेत. दि. १५ ऑक्टोबरपासून दरमहा १० टक्के पाणीकपात करण्याचे निर्देश असले, तरी पुणे महापालिकेने अद्याप अंतिम निर्णय घेतलेला नाही.
महापालिका आयुक्त नवल किशोर राम यांच्या अध्यक्षतेखाली सोमवारी होणाऱ्या बैठकीत यावर निर्णय होण्याची शक्यता आहे. त्यामुळे पुणेकरांना पाणीकपातीला सामोरे जावे लागणार का, हे बैठकीनंतरच स्पष्ट होईल. आचारसंहिता लागू असल्याने पाणीकपातीचा निर्णय राजकीय पातळीऐवजी प्रशासकीय स्तरावर होण्याची शक्यता आहे.
आठवड्यातून एक दिवस पाणीपुरवठा बंद ठेवण्याचा पर्याय चर्चेत असला, तरी त्याबाबत अधिकृत निर्णय झालेला नाही. पाणीकपात लागू झाल्यास नागरिकांना पाणीवापराचे काटेकोर नियोजन करावे लागेल, असे अतिरिक्त आयुक्त प्रजित नायर यांनी सांगितले. खडकवासला धरणसाखळीत सध्या २६.४२ अब्ज घनफूट (टीएमसी), म्हणजेच ९०.६४ टक्के पाणीसाठा आहे.
हा साठा ऑगस्ट २०२७ पर्यंत पुरविण्याच्या दृष्टीने जलसंपदा विभागाने पाणीवापर नियंत्रित करण्याची भूमिका घेतली आहे. अल निनोच्या संभाव्य प्रभावामुळे आगामी पावसाचा अंदाज अनिश्चित असल्याने पुढील वर्षी धरणे पुरेशा प्रमाणात भरतीलच, याची खात्री नाही. त्यामुळे उपलब्ध साठ्याचा जपून वापर करण्यावर भर दिला जात आहे.
गळती रोखणे, अनधिकृत पाणीवापरावर नियंत्रण ठेवण्याचे निर्देश
खडकवासला पाटबंधारे विभागाने पुणे महापालिकेला पत्र पाठवून पाणीकपातीच्या अंमलबजावणीच्या सूचना दिल्या आहेत. पिंपरी-चिंचवड महापालिकेसह चिंचवड, हिंजवडी आणि कुरकुंभ औद्योगिक क्षेत्रांनाही यासंदर्भात कळविण्यात आले आहे. गळती रोखणे, अनधिकृत पाणीवापरावर नियंत्रण ठेवणे आणि पिण्याव्यतिरिक्तच्या कामांसाठी प्रक्रिया केलेल्या सांडपाण्याचा वापर वाढविण्याचे निर्देशही देण्यात आले आहेत. उद्याने, रस्त्यांवरील दुभाजक, बांधकामे आणि औद्योगिक प्रक्रियांसाठी प्रक्रिया केलेले पाणी वापरल्यास स्वच्छ पाण्याची बचत होऊ शकते. सोमवारी होणाऱ्या बैठकीत कपातीचे स्वरूप, अंमलबजावणी आणि वेळापत्रक ठरणार असल्याने शहराचे लक्ष या निर्णयाकडे लागले आहे.