Water Supply Pudhari
पुणे

Pune Water Crisis: पुण्यात पाणीकपातीचा फटका; टँकरवर अवलंबून सोसायट्यांचे अर्थकारण कोलमडले

महिन्याला ६० हजारांपासून लाखोंपर्यंत खर्च; पाणीबचतीसाठी सोसायट्यांकडून कडक नियम, दंडाचीही तरतूद

पुढारी वृत्तसेवा

पुणे: पाण्याच्या टँकरसाठी महिन्याला साठ हजार रुपये मोजावे लागतात. पाण्यावरील खर्च परवडत नसल्याने सोसायटीत तीन दिवसांआड पाणी सोडण्याचा निर्णय घेण्यात आला. महापालिकेचा कर तसेच पाणीपट्टी भरूनही पाणी मिळत नाही. मात्र, आत्ता पाणीकपात सुरू झाली आहे. टँकरद्वारे होणारा पाणीपुरवठा कमी झाला असून, त्यात टँकरचालकांनीही मनमानी पद्धतीने दरवाढ केली आहे. पाण्याच्या तुटवड्यापूर्वी कर भरूनही महापालिका पाणी देत नव्हती, आता तर पाणीटंचाईची स्थिती आहे, अशा परिस्थितीत महापालिका टँकरने पाणीपुरवठा खरोखर करेल का? असा प्रश्न केशवनगर येथील व्यंकटेश ग्राफीटी ग्लोव्हर सी विंगच्या रहिवासी पूनम गुजरे यांनी व्यक्त केला.

शहरात मान्सून दाखल झाला असला, तरी अद्याप तो सक्रिय नसल्याने पुणेकरांवरील पाणीसंकट कायम आहे. महापालिकेकडून दिवसाआड पाणीपुरवठा होत असल्याने अनेक गृहनिर्माण सोसायट्यांचा संपूर्ण कारभार टँकरच्या भरवशावर सुरू आहे. त्यात केशवनगरमध्ये बिकट परिस्थिती निर्माण झाली आहे. पिण्याच्या पाण्याचा एका टँकरसाठी २ हजार रुपये मोजावे लागतात. तब्बल ६० सदनिकांच्या सोसायटीला महिन्याला ३० हजार रुपये पिण्याच्या पाण्यावर खर्च करावा लागत आहे, तर, वापरायच्या पाण्यासाठी एका टँकरला १ हजार ५०० रुपये मोजावे लागत आहेत. त्यासाठीही महिन्याला ३० हजार मोजावे लागतात. महापालिकेचा कर तसेच पाणीपट्टी भरूनही पाणी मिळत नाही. पूर्वीही पाण्याचा प्रश्न होता; मात्र आत्ता परिस्थिती अधिक गंभीर झाली आहे. परिसरातील बहुतांश सोसायट्यांमध्ये महापालिकेचे पाणी अपुरे पडत असल्याने सोसायट्यांना टँकर मागवावे लागत आहेत. टँकरशिवाय पर्याय नसल्याने टँकरचालक सांगतील त्या दराने पाणी घ्यावे लागते. काही ठिकाणी तर अवाच्या सवा दर आकारले जात आहेत, असेही गुजरे यांनी सांगितले.

पाण्याच्या उपलब्धतेनुसार कामांचे नियोजन

महापालिकेकडे टोकन यंत्रणा उपलब्ध असली तरी त्याचा वापर करण्याबाबत अनेक सोसायट्या साशंक आहेत. महापालिकेकडून वेळेवर पाणी मिळाले नाही आणि खासगी टँकरवाल्यांनीही पाठ फिरवली, तर रहिवाशांना मोठ्या संकटाला सामोरे जावे लागेल. त्यामुळे बहुतांश सोसायट्या कोणताही वाद न घालता टँकरवाल्यांच्या अटी मान्य करीत आहेत. पाण्याचा प्रत्येक थेंब जपण्यासाठी आता सोसायट्यांनी वेगवेगळे उपाय सुरू केले आहेत. काही सोसायट्यांमध्ये एक दिवसाआड, तर काही ठिकाणी तीन दिवसांनी नळांना पाणी येत आहे. त्यामुळे घरगुती वापर, स्वच्छता आणि इतर कामांचे नियोजनही पाण्याच्या उपलब्धतेनुसार करावे लागत आहे.

महापालिकेने सुरू केलेल्या पाणीकपातीचा थेट फटका पुण्यातील गृहनिर्माण सोसायट्यांना बसला असून, त्यांचे अर्थसंकल्प पूर्णपणे कोलमडले आहे. पाण्याच्या या संकटावर मात करण्यासाठी रेनवॉटर हार्वेस्टिंग आणि पाणीबचतीचे उपाय करूनही त्यांचा फारसा फायदा झालेला नाही. त्यामुळे आज मितीला सोसायट्यांना 1200 ते 3000 रुपये मोजून टँकर मागवावे लागत आहेत. मोठ्या सोसायट्यांमध्ये 5 ते 10 टँकर, तर छोट्या सोसायट्यांमध्ये रोज दोन ते तीन टँकर मागवावे लागत आहेत. परिणामी, सोसायट्यांचे आर्थिक गणित विस्कळीत झाले असून, खर्चाचा भार रहिवाशांवर पडत आहे.

याच पार्श्वभूमीवर पुणे महापालिकेसह स्थानिक स्वराज्य संस्थांनी मोफत किंवा अनुदानित दरात पाण्याचे टँकर उपलब्ध करून द्यावेत, अशी मागणी पुणे जिल्हा सहकारी गृहनिर्माण संस्था महासंघ आणि अपार्टमेंटस् महासंघाचे अध्यक्ष सुहास पटवर्धन यांनी केली आहे. पुणे जिल्ह्यात सुमारे २६ हजार ५०० नोंदणीकृत गृहनिर्माण संस्था, जवळपास ४० हजार अपार्टमेंट्स आहेत. यातील बऱ्याच सोसायट्या सध्या टँकरच्या पाण्यावर अवलंबून आहेत. गेल्या दीड-दोन महिन्यांपासून अनेक भागांत टँकरची मागणी वाढली आहे. त्यामुळे काही सोसायट्यांचा मासिक खर्च लाखो रुपयांपर्यंत पोहोचला आहे. अनेक सोसायट्यांचे वार्षिक अर्थसंकल्प कोलमडले असून, रहिवाशांकडून अतिरिक्त निधी गोळा करण्याची वेळ पदाधिकाऱ्यांवर आली आहे.

याविषयी महासंघाचे अध्यक्ष सुहास पटवर्धन म्हणाले, नागरिकांकडून पाणीपट्टी आणि विविध करांची वसुली केली जाते. त्यामुळे नियमित आणि सुरक्षित पाणीपुरवठा करणे ही महापालिका आणि स्थानिक स्वराज्य संस्थांची जबाबदारी आहे. मात्र, प्रत्यक्षात अनेक भागांमध्ये पाणीपुरवठा अपुरा पडत असल्याने सोसायट्यांना लाखो रुपयांचा खर्च करून पाणी विकत घ्यावे लागत आहे. त्यामुळेच महापालिकेने आणि स्थानिक स्वराज्य संस्थांनी मोफत किंवा अनुदानित स्वरूपात टँकरद्वारे पाणीपुरवठा उपलब्ध करून द्यावा, अशी आमची मागणी आहे. पाणीप्रश्नावर कायमस्वरूपी तोडगा निघावा, यासाठी महासंघाने आणि काही गृहनिर्माण संस्थांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. या याचिकेच्या पार्श्वभूमीवर न्यायालयाने विभागीय आयुक्तांना नियमित आढावा घेण्याचे निर्देश दिले असून, पाणीपुरवठा होत नसलेल्या भागांमध्ये आवश्यक उपाययोजना करण्यास सांगितले आहे. त्यानुसार अनेक ठिकाणी आढावा घेतला जात असला तरी पाण्याचा प्रश्न अद्याप सुटलेला नाही.

पाण्याच्या गुणवत्तेवरही प्रश्नचिन्ह

पाणीटंचाईमुळे टँकरची संख्या वाढली असली तरी त्यातून पुरविल्या जाणाऱ्या पाण्याच्या गुणवत्तेबाबत नागरिकांमध्ये चिंता आहे. अनेकदा टँकरचे पाणी नेमके कुठून आणले जाते, ते पिण्यायोग्य आहे की नाही, याबाबत स्पष्ट माहिती उपलब्ध नसते. त्यामुळे टँकरच्या स्रोतांवर, पाण्याच्या गुणवत्तेवर आणि पुरवठा साखळीवर प्रशासनाने अधिक प्रभावी नियंत्रण ठेवावे, अशी मागणी महासंघाने केली आहे.

पाणीबचतीसाठी जनजागृती

पाणीटंचाईच्या संकटातून मार्ग काढण्यासाठी अनेक सोसायट्यांनी रेन वॉटर हार्वेस्टिंग, सांडपाण्याचे शुद्धीकरण आणि पुनर्वापर, गळती शोधून दुरुस्ती करणे आणि नागरिकांमध्ये पाणीबचतीबाबत जनजागृती करणे, यावर भर दिला जात आहे. काही ठिकाणी पाणीवापराचे नियोजन, वाहन धुण्यासाठी वेळेचे निर्बंध आणि सूचना फलकांद्वारे जनजागृती केली जात आहे.

टँकरची माहिती एका क्लिकवर

जिल्हा प्रशासनाच्या माध्यमातून टँकर ट्रॅकिंग व्यवस्था सुरू केली आहे. या प्रणालीद्वारे सोसायट्या त्यांच्या परिसरात येणाऱ्या टँकरचा क्रमांक, पाणी कुठून भरले आहे, टँकरचा मालक कोण आहे, तसेच पाणी पिण्यायोग्य आहे की नाही, यासारखी माहिती सोसायट्यांमधील नागरिक नोंदवू शकतात. यामुळे टँकरपुरवठ्यात पारदर्शकता वाढण्यास मदत होत असून, पाण्याच्या गुणवत्तेवर देखरेख ठेवणे शक्य होत आहे, असेही सुहास पटवर्धन यांनी सांगितले.

पाणीबचतीकडे वळल्या गृहरचना संस्था

पाणीकपातीला तोंड देण्यासाठी शहरातील अनेक सहकारी गृहरचना संस्थांनी कंबर कसली असून, पालिकेकडून सम व विषय तारखांना होणारा पाणीपुरवठा लक्षात घेऊन सर्व सभासदांना समान पुरवठा करण्यासाठी त्यांनी नियम व निर्बंध लागू केले आहेत.

सोसायटातील पाणीपुरवठा सुरळित ठेवण्यासाठी साठवण टाक्यांमध्ये संकलित होणाऱ्या पाण्याचे सकाळी दोन-अडीच तास, तर सायंकाळी फक्त अर्धा-पाऊण तास पंपिंग करण्याचा निर्णय काहींनी घेतला आहे. त्यामुळे घराघरात पाणीपुरवठा करणाऱ्या ओव्हरहेड टाक्या रिकाम्या झाल्यास थेट दुसऱ्या दिवशी पंपिंग केले जाईल, अशा सूचना दिल्या आहेत.

वाहने धुणे, बाल्कनी धुणे यास मज्जाव केला असून, वाहने व बाल्कनीची फरशी ओल्या फडक्याने पुसावी, अशी ताकीद दिली आहे. पाणी वाचविण्यासाठी टॉयलेटमधील फ्लशचा वारंवार वापर करण्याचे टाळावे. नळगळती तत्काळ दुरुस्त करावी. तसेच प्रत्येक नळाला पाणीबचत करणारे फिल्टर्स लावून घ्यावेत, गरज पडल्यास त्यासाठी सोसायटीच्या प्लंबरची मदत घ्यावी. कपडे धुणे, भांडी घासणे या गोष्टींसाठी थेट नळाचा वापर करण्याऐवजी बादलीत पाणी घेऊन ही कामे करावीत. गॅलरी वा टेरेसवरील झाडांना बादलीने मोजकेच पाणी द्यावे, त्यासाठी पाईपचा वापर करू नये. लिफ्ट धुणे, जिने धुणे ही कामेही आठवड्यातून फक्त एकदाच करण्याचा निर्णय घेतला आहे.

टँकरमुळे पडणारा आर्थिक बोजा विचारात घेऊन गरजेच्या वेळीच ते मागविण्याचा निर्णय व्यवस्थापन मंडळ घेईल. तसेच त्यासाठीचा खर्च सभासदांकडून सम प्रमाणात वसूल केला जाईल, अशा सूचनाही सभासदांना देण्यात आल्या आहेत, अशी माहिती कोथरूडच्या सक्सेस स्क्वेअर सोसायटीचे अध्यक्ष नागेश नलावडे यांनी दिली.

दंड व कारवाईही करणार...

सोसायटीने लागू केलेल्या नियमांचे उल्लंघन केल्यास संबंधित सभासदांना दंड करण्याचा इशाराही कोथरूडमधील काही सोसायट्यांनी दिला आहे. सोसायटीचे नियम मोडणाऱ्यास पहिल्या चुकीसाठी दोनशे रुपये, तर नंतरच्या चुकीसाठी पाचशे रुपये दंड आकारण्यात येईल. सतत पाण्याचा अपव्यय करणाऱ्या सभासदाचा पाणीपुरवठाच दिवसभरासाठी बंद करण्याची तंबीही देण्यात आली असल्याचे कोथरूडमधील पिनाक सोसायटीचे सचिव अतुल जोशी यांनी सांगितले.

नळ बंद केलेत ना?

सभासदांनी सतत दक्ष राहावे म्हणून कोथरूडमधील काही सोसायट्यांनी लिफ्टच्या दारांवर घरातील नळ बंद केलेत ना? असे प्रश्न विचारणारे स्टिकर्सही लावले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT