Pune Crime Pudhari
पुणे

Pune Crime: हत्येपूर्वी चारवेळा दृष्यम पाहिला; मग मृतदेह भट्टीत जाळला.. राख नदीत फेकली, शिक्षिकेच्या हत्येनं पुणे हादरलं

चारित्र्याच्या संशयातून पतीने पत्नीचा गळा आवळून खून केला; पुरावे नष्ट करण्यासाठी मृतदेह भट्टीत जाळून नदीत टाकला, पोलिसांनी उघडकीस आणली भीषण हत्या

पुढारी वृत्तसेवा

पुणे: चारित्र्याच्या संशयातून पतीने शिक्षक पत्नीचा गळा आवळून खून केला. त्यानंतर मृतदेह लोखंडी भट्टीत जाळून पुरावा नष्ट करणाऱ्या हेतूने राख नदीत टाकून दिली. दुसऱ्या दिवशी सकाळी लोखंडी भट्टी देखील नष्ट करून टाकली. मृतदेह जळताना कोणाला पत्ता लागणार नाही याची खबरदारी पतीने घेतली होती. मात्र अखेर वारजे पोलिसांनी दृष्य़म स्टाईल मर्डरमिस्ट्रीचा पर्दाफाश केला. एखाद्या चित्रपटातील कथेप्रमाणे आरोपी पतीने महिलेचा खून केल्याचे तपासात निष्पन्न झाल्यानंतर त्याला अटक करण्यात आली. त्यानेच आपली पत्नी बेपत्ता झाल्याची तक्रार पोलिसात दिली होती.

अंजली समीर जाधव (वय ३८ रा. श्री स्वामी समर्थ संकुल, एनडीए-वारजे रस्ता, शिवणे) असे खून झालेल्या महिलेचे नाव आहे. अंजली एका खासगी शाळेवर शिक्षिका म्हणून नोकरी करत होती. या प्रकरणी पती समीर पंजाबराव जाधव (वय ४२) याला अटक करण्यात आली. पत्नी अंजली ही २८ ऑक्टोबर रोजी वारजे परिसरातून बेपत्ता झाल्याची तक्रार आरोपी समीर याने वारजे माळवाडी पोलीस ठाण्यात दिली होती. 'या प्रकरणात कोणतेही धागेदोरे नसताना पोलिसांनी सखोल तपास करून खून प्रकरणाचा उलगडा केला आणि आरोपी पती समीर याला अटक केली', अशी माहिती परिमंडळ तीनचे पोलिस उपायुक्त संभाजी कदम यांनी पत्रकार परिषदेत दिली. आरोपी समीर हा फॅब्रिकेशनचे काम करतो. पत्नीचे एकाशी प्रेम प्रकरण सुरू असल्याचा संशय समीरला होता. त्याने व्हॉटस्‌ अप चॅटींगवरून पत्नीवर आरोप केले होते. या कारणावरून त्‍यांच्यात वादही झाले होते. त्यानंतर त्याने पत्नीचा खून करण्याचा कट रचला.

गोडाऊन घेतले भाड्याने, अगोदरच लोखंडी भट्टीही तयार

समीरला काही करून पत्नीचा काटा काढायचा होता. त्यासाठी त्याने पूर्वनियोजित तयारी केली. त्याने मुंबई-बंगळुरू बाह्यवळण मार्गावरील खेड शिवापूर परिसरातील गोगलवाडी फाटा शिंदेवाडी भागात एक गोडाऊन दरमहा अठरा हजार रुपये भाड्याने घेतले. दोघांना दोन मुले आहेत. दिवाळीच्या निमित्ताने ते त्यांच्या मुळगावी गेले होते. 26 ऑक्टोबर रोजी दुपारी बारा वाजता समीर पत्नी अंजलीला घेऊन मोटारीने फिरायला जाण्याच्या बहाण्याने बाहेर पडला. मरीआई घाटामध्ये दोघे फिरण्यासाठी गेले होते. तेथून परतत असताना शिंदेवाडी फाटा येथील एका हॉटेलमधून भेळ खायला घेतली.

यानंतर दोघे गोडाऊनमध्ये आले. त्यावेळी रात्रीचे आठ वाजले होते. चटईवर बसून भेळ खात असताना समीरने अंजलीचा गळा दाबला. ती मेल्याची खात्री केली. समीर याने अगोदरच गोडाऊनमध्ये लाकडे आणून ठेवली होती. तसेच लोखंडी भट्टी तयार केली होती. अंजलीचा मृतदेह समीरने त्या भट्टीत टाकला. लाकडे भरून त्यावर पेट्रोल टाकून आग लावली. दहाच्या सुमारास अंजलीचा मृतदेह जळून खाक झाला. भट्टी थंड होईपर्यंत समीर तेथेच बसून होता. पहाटेच्यावेळी त्याने अंजलीची राख जवळच्या नदीत फेकून दिली. भट्टीत वापरलेल्या विटा फोडून टाकल्या, तर दुसऱ्या दिवशी तयार केलेली भट्टी (लोखंडी बॉक्स) स्क्रॅप करून टाकला.

असे फुटले समीरचे बिंग..

अंजलीचा खून करण्यापूर्वी समीरने चारवेळा दृष्यम चित्रपट पाहिला होता. पोलिसांपासून बचाव करण्याची त्याने पुरेपूर खबरदारी घेतली होती. अंजलीची विल्हेवाट लावल्यानंतर दोन दिवसानी समीर वारजे पोलिस ठाण्यात दाखल झाला. त्याने आपली पत्नी मैत्रीणीकडे जाते असे सांगून शिंदेवाडी येथून बेपत्ता झाल्याचे पोलिसांना सांगितले. राजगड पोलिस ठाण्याच्या हद्दीतील हा प्रकार असल्याने तो तिकडे वर्ग करण्यात आला; परंतु वरिष्ठ पोलिस निरीक्षक विश्वजित काईंगडे यांना समीरच्या हालचाली संशयित वाटू लागल्या होत्या. त्यामुळे त्यांनी जरी तक्रार राजगडकडे गेलेली असली, तरी तपास सुरू ठेवण्याचे ठरविले होते. दुसरीकडे समीर सतत पोलिस ठाण्यात येऊन पत्नीचा शोध कधी घेणार, याची चौकशी करत होता.

काईंगडे आणि त्यांचे पथक कामाला लागले होते. त्यानी समीरच्या बाबत तांत्रिक विश्लेषण आणि सीसीटीव्ही फुटेजची पाहणी केली. तसेच त्याने दिलेल्या माहितीत विसंगती आढळून आली, तर दोघे बाहेर पडतानाचे सीसीटीव्ही फुटेज देखील पोलिसांना मिळाले. याचवेळी पोलिसांना आणखी एक गोष्ट हाती लागली ती समीरच्या मैत्रिणीची, मैत्रिणीला ताब्यात घेऊन पोलिसांनी दोघांना खाक्या दाखवला. त्यावेळी समीर याने आपणच पत्नीचा खून केल्याची कबुली दिली. चारित्र्याच्या संशयातून त्याने पत्नीचा खून केल्याचे पोलिसांना सांगितले आहे. पोलीस उपायुक्त संभाजी कदम यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलिस निरीक्षक विश्वजीत काईंगडे, गुन्हे निरीक्षक प्रकाश धेडे, नीलेश बडाख, उपनिरीक्षक संजय नरळे, नितीन गायकवाड, कर्मचारी गणेश कर्चे, सुनील मुठे, योगेश वाघ, शरद पोळ, शिरीष गावडे यांनी ही कामगिरी केली.

पतीने पत्नीचा खून केल्यानंतर पुरावा नष्ट करण्याच्या हेतूने मृतदेह लोखंडी भट्टीत (बॉक्स) जाळून टाकला. त्यानंतर ती भट्टी देखील नष्ट करून टाकली. मिसिंगच्या तक्रारीवरून वारजे माळवाडी पोलिसांनी या गुन्ह्याचा छडा लावला आहे. आरोपी पतीला अटक करण्यात आली असून, पुढील तपास सुरू आहे.
संभाजी कदम, पोलिस उपायुक्त

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT