

खुटबाव : दौंड तालुक्यातील यवत येथे दर शुक्रवारी भरणारा जनावरांचा बाजार गेल्या दहा वर्षांपासून बंद होता. तो पुन्हा सुरू व्हावा अशी मागणी जनांवरांचे व्यापारी तसेच शेतकरी करीत होते. त्यानुसार शुक्रवार (दि. 7) पासून जनावरांचा बाजार सुरू झाला. या बाजारात 40 जनावरे विक्रीसाठी आली होती. बाजार सुरू झाल्याने शेतकरी तसेच व्यापारी यांनी समाधान व्यक्त केले.(Latest Pune News)
यवत येथे दर शुक्रवारी आठवडा बाजार भरतो. या बाजारा बरोबर मागील काळात जनावरांचा बाजार भरत होता. हा बाजार जिल्ह्यात प्रसिद्ध होता. मात्र, गेली दहा वर्षांपूर्वी हा बाजार बंद झाला. त्यामुळे येथील शेतकऱ्यांना जनावरे विकण्यासाठी किंवा खरेदी करण्यासाठी अहिल्यानगर जिल्ह्यातील काष्टी, राशीन, बारामती, चाकण, पुणे येथे जाण्याची वेळ येत होती. त्यामुळे यवत येथे पुन्हा जनावरांचा बाजार सुरू करण्याची मागणी होत होती. त्यानुसार पुन्हा बाजार सुरू झाल्यामुळे शेतकरी आणि व्यापारी यांनी समाधान व्यक्त केले.
यवत येथे शेळी, बकरी यांचा देखील मोठा बाजार भरतो. या दोन्ही बाजारांमुळे आर्थिक उलाढाल वाढण्यास मदत होणार आहे. या वेळी सरपंच समीर दोरगे, ग््राामपंचायत सदस्य सदानंद दोरगे, महादेव दोरगे, पशुवैद्यकीय व दुग्ध व्यवस्थापन सेवा संघाचे पुणे जिल्हाध्यक्ष डॉ. संतोष बडेकर, कृषी उत्पन्न बाजार समितीचे अधिकारी, व्यापारी व शेतकरी उपस्थित होते.
यवत येथे पुन्हा जनावरांचा बाजार सुरू झाला आहे. शेतकऱ्यांनी आणि व्यापाऱ्यांनी जनावरे बाजारात आणावीत. जनावरांच्या बाजाराला आवश्यक त्या सर्व सुविधा देण्यासाठी कटिबद्ध आहे.
समीर दोरगे, सरपंच, यवत.