Pune Third Eye Pudhari
पुणे

Pune Ward Civic Problems: वॉर्डावॉर्डांत समस्या ‘जैसे थे’; प्रशासनही बेफिकीर

कचरा, तुटलेले चेंबर्स, अपूर्ण रस्तेकामांमुळे पुणेकर त्रस्त

पुढारी वृत्तसेवा

शहरातील वॉर्डावॉर्डांत कचऱ्याचे ढीग, पदपथांवर अतिक्रमणे आणि ठिकठिकाणी तुंबलेले नाले दिसत आहेत. अनेक भागांतील रस्त्यांवर ड्रेनेजलाइनचे तुटलेली, उखडलेले चेंबर दिसत आहेत, त्यांची दुरुस्ती होत नाही. नागरिक वारंवार महापालिका प्रशासनाला फोन करून मेल करून या तक्रारी कळवतात. मात्र, खूप पाठपुरावा केल्यावर वॉर्डातील घराजवळची समस्या सुटते, मात्र सार्वजनिक स्थळावरच्या समस्या सोडविण्यात अधिकारी रस दाखवत नाहीत. त्या ठिकाणीच उलट नागरिकांना धोके आहेत.

या मुलांकडे कुणी लक्ष देईल का?

अनेक ठिकाणी सार्वजनिक कार्यक्रमस्थळी गरिबांची मुले अंगाला रंग फासून राष्ट्रपुरुषांच्या वेशात उभी राहतात. समोर क्यूआर कोड ठेवलेला असतो. किमान 1 रुपया तरी द्या, अशी पाटी समोर लिहून ही मुले तासन्‌‍ तास उन्हात दिवसभर उपाशी उभी राहतात. शेकडो लोकांमधून एखादाच 1 रुपया त्यांच्या भांड्यात टाकतो. या मुलांना महापालिकेने दत्तक घेऊन त्यांच्या शिक्षणाची व दोनवेळच्या जेवणाची व्यवस्था केली पाहिजे, त्यासाठी दानशूर आस्थापनांची मदत घेतली पाहिजे.

इथे आहे धोका! येरवडा प्रभाग क्र. 6 येथील शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे चौकातील चंद्रमा हॉटेलजवळील पदपथावर चौकोनी लोखंडी चेंबर झाकणाच्या स्टील पट्‌‍ट्या निघाल्या आहेत. या ठिकाणी ओपन जिम असल्यामुळे नागरिक सकाळी फिरायला जाताना येथे पडू शकतात. तसेच शास्त्रीनगर पोलिस ठाणे येथे चेंबर खचला आहे, त्याची दुरुस्ती करण्यात यावी.
गणेश घायमुक्ते, येरवडा
हा कचरा काढा हो... महालक्ष्मी मंदिर, सारसबागेसमोर पालिकेने अनधिकृत फ्लेक्स काढून तो कचरा तेथेच टाकून दिलेला आहे. असे दृश्य जागोजागी पाहावयास मिळते. तेथे साफसफाई कोण करणार?
रत्नाकर चांदेकर, सदाशिव पेठ
हे काम पूर्ण कधी होणार... शंकरशेठ रोड, स्वारगेट येथे एक महिन्यापेक्षा जास्त काळ रस्त्याचे काम सुरू आहे, मात्र काम पूर्ण होण्याची कोणतीही ठोस प्रगती किंवा वेळापत्रक दिसत नाही. या परिसरातील कार्यालये, दुकाने तसेच रोज ये-जा करणाऱ्या नागरिकांना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे. धूळ, वाहतूक कोंडी, रस्ते अडथळे आणि असुरक्षित परिस्थितीमुळे दैनंदिन जीवन विस्कळीत झाले आहे. जर संबंधित ठेकेदाराला ठरलेल्या कालावधीत काम पूर्ण करण्याची क्षमता नव्हती, तर पुणे महानगरपालिकेने अशा कामाला परवानगी का दिली? या प्रकल्पावर कोणतेही प्रभावी निरीक्षण नाही, जबाबदारी निश्चित केलेली नाही आणि विलंबासाठी कोणतीही दंडात्मक कारवाई दिसून येत नाही.
एक त्रस्त नागरिक, पुणेटिळक रस्त्यावर
जागोजागी समस्या... टिळक रस्ता भागात जागोजागी समस्या आहेत. येथील मराठा चेंबर्स ऑफ कॉमर्ससमोरील पदपथावरील एका चेंबरचे झाकण नाहीसे झालेले आहे. एखादा पादचारी पडू शकतो. ताबडतोब नवीन झाकण बसवणे गरजेचे आहे. तसेच, पदपथावर खोदाई केल्याने उखडलेले सिमेंट ब्लॉक अस्ताव्यस्त पडलेले आहेत. त्यामुळे पादचारी पडून जखमी होण्याचा धोका आहे.
जागरूक नागरिक
ही कामे कुणी केली ते सांगा? पर्वती भागातील पाटील प्लाझासमोरील पदपथांवरील सिमेंटचे गट्टू काही दिवसांपूर्वी पालिकेच्या कंत्राटदाराने विनाकारण काढले अन्‌‍ पुन्हा बसविले. मात्र ते गट्टू काही दिवसांतच उखडल्याने पादचारी तेथे अडखळून पडत आहेत. ही कामे कुणी केली ते महापलिका सांगण्याचे धाडस करेल काय?
मनोज पाटील, पर्वती
हे कचऱ्याचे डोंगर बरे दिसतात का? पर्वतीकडून स्वारगेटकडे जाताना वीर बाजी पासलकर चौकात कचऱ्याचे असे ढीग रचून ठेवले आहेत. यात खराब झालेले कपडे असून, त्याचे आगारच करून ठेवले आहे. महापालिकेच्या अतिक्रमण विभागाने या भागातील अतिक्रमित टपऱ्यांवर काही दिवसांपूर्वी कारवाई केली. मात्र, त्यांना हे अतिक्रमण का दिसले नाही?
गिरिराज देशपांडे, पुणे

नागरिकांनी विचारलेले प्रश्न...

  • सध्याच्या सायकल ट्रॅक बाबतही गंभीर प्रश्न निर्माण होत आहेत. या मार्गावर प्रत्यक्षात किती सायकलस्वार वापर करतात किंवा भविष्यात करतील? यासाठी कोणताही वाहतूक अभ्यास किंवा व्यवहार्यता अभ्यास करण्यात आला आहे का? इतक्या वर्दळीच्या, व्यापारी आणि वाहतूक-केंद्रित रस्त्यावर असा सायकल ट्रॅक प्रत्यक्षात किती उपयुक्त आहे?

  • सार्वजनिक निधीचा वापर उपयुक्त, योग्य नियोजन केलेल्या पायाभूत सुविधांसाठी व्हायला हवा,

  • अर्धवट व चुकीच्या अंमलबजावणीच्या प्रकल्पांसाठी नव्हे,

  • जे नागरिकांचे आणि व्यावसायिकांचे नुकसान करतात.

  • पारदर्शकता नसेल तर असे वाटते की हे प्रकल्प सार्वजनिक हितापेक्षा ठेकेदार आणि स्थानिक प्रतिनिधींच्याच फायद्यासाठी राबवले जात आहेत.

नागरिकांच्या मागण्या

  • काम पूर्ण होण्याची अंतिम तारीख जाहीर करा.

  • विलंबासाठी जबाबदारी निश्चित करून कारवाई करावी.

  • प्रकल्पाचा खर्च व उद्देश सार्वजनिकरीत्या जाहीर करावे.

  • कार्यालये, दुकाने व प्रवाशांचा त्रास कमी करण्यासाठी तत्काळ उपाययोजना कराव्यात.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT