Voter List Pudhari
पुणे

Pune Ward Voter List Transfer: मतदार यादीत मोठा घोटाळा? 300 नागरिकांची नावे विनासंमती हलवली!

प्रभाग 34 ते 35 ‘स्थलांतर’; नागरिकांमध्ये संताप, निवडणूक प्रक्रियेच्या पारदर्शकतेवर प्रश्नचिन्ह

पुढारी वृत्तसेवा

खडकवासला/ पुणे: सिंहगड रस्ता क्षेत्रीय कार्यालयात प्रभाग 34 (वडगाव-नऱ्हे) परिसरातील सुमारे 300 हून अधिक मतदारांची नावे विनासंमती प्रभाग 35 (सनसिटी-माणिक बाग) मध्ये स्थलांतरित करण्यासाठी अर्ज दाखल झाल्याची गंभीर घटना उघडकीस आली आहे. महापालिकेच्या आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ही घडामोड लक्षवेधी ठरत आहे.

मतदार नोंदणी रचनेविषयी माहिती घेताना गुरुवारी सकाळी काही नागरिकांनी या अनियमिततेचा मुद्दा उपस्थित केला. प्रारूप मतदार याद्यांमधील दुरुस्ती व बदल सुचवण्याची अंतिम तारीख 3 डिसेंबर होती. मात्र, या अंतिम दिवशी प्रभाग 34 मधील मोठ्या प्रमाणावर नागरिकांची नावे प्रभाग 35 मध्ये हलविण्यासाठी ‌‘नमुना ब‌’ अंतर्गत तक्रार अर्ज दाखल करण्यात आले.नियमांनुसार, नमुना ‌‘अ‌’ अंतर्गत मतदाराने स्वतः येऊन हरकत नोंदवणे आवश्यक असते; तर नमुना ‌‘ब‌’ अंतर्गत लोकप्रतिनिधी किंवा सामाजिक कार्यकर्त्यांमार्फत सामूहिक हरकत नोंदवता येते. परंतु, त्यासाठी संबंधित प्रत्येक मतदाराचे ओळखपत्र, वीजबिल, आधार कार्ड, गॅस कार्ड इत्यादींपैकी किमान एक पुरावा जोडणे बंधनकारक आहे.

स्थानिक नागरिकांच्या मते, प्रभाग 34 मधील काही सामाजिक कार्यकर्त्यांनी मतदारांच्या परवानगीशिवाय फक्त मतदान ओळखपत्रांच्या प्रती ई-सेवा केंद्रातून मिळवून त्यांचा आधार घेत सामूहिक अर्ज दाखल केले. अनेक मतदारांनी याबाबत आश्चर्य आणि रोष व्यक्त करत सांगितले की, त्यांच्या माहितीशिवाय त्यांची नावे बदलण्यासाठी हरकत दाखल झाल्याचे त्यांना नंतर कळाले. मतदार यादी तयार करण्याचे काम पाहणारे आरोग्य निरीक्षक विनय थोपटे यांनी सांगितले की, ‌‘नमुना ‌‘ब‌’ अंतर्गत अर्ज साधारणपणे सामाजिक कार्यकर्त्यांकडून येतात. मात्र, नागरिक स्वतः हरकत नोंदवण्यासाठी आले तर संबंधित प्रक्रिया त्वरित थांबवण्यात येते.‌

’ सिंहगड रोड क्षेत्रीय कार्यालयाच्या क्षेत्रात प्रभाग- 28 जनता वसाहत, हिंगणे खुर्द , प्रभाग- 33 शिवणे, खडकवासला, धायरी, पार्ट, प्रभाग- 34 नऱ्हे, वडगाव बुद्रुक, धायरी, प्रभाग- 35 सनसिटी, माणिकबाग असे चार प्रभाग येत आहेत. यामध्ये अनेक मतदारांची नावे दुसऱ्या प्रभागात गेली आहेत.महापालिकेच्या वतीने 3 डिसेंबरपर्यंत मतदार याद्यांवरील हरकती नोंदविण्यास मुदत दिली होती, यामध्ये तब्बल 7770 च्या आसपास हरकती प्राप्त झाल्या आहेत. या क्षेत्रीय कार्यालयात हरकतींचा पाऊस पडल्याचे समोर आले आहे.

आवश्यक कारवाई करावी

या प्रकरणामुळे प्रभाग 34 आणि 35 मधील नागरिकांमध्ये संभम व नाराजी पसरली असून, निवडणूक प्रक्रियेतील पारदर्शकतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. महापालिका प्रशासनाने या सामूहिक अर्जांची छाननी करून आवश्यक कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.

आक्षेपाची बारीकसारीक तपासणी केली जाईल

या मोठ्या संख्येने आलेल्या हरकतींवर बोलताना सिंहगड रोड क्षेत्रीय कार्यालयाचे सहाय्यक आयुक्त विजय वाघमोडे यांनी सांगितले की, मतदार यादी पुनरीक्षण प्रक्रियेदरम्यान प्राप्त झालेल्या सर्व हरकतींची छाननी तातडीने सुरू केली आहे. नियमानुसार, प्रत्येक आक्षेपाची बारीकसारीक तपासणी केली जाईल.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT