PMC Election Pudhari
पुणे

PMC Election: प्रभाग 13 मध्ये जागावाटपाचा तिढा! उमेदवारीवरून महाविकास आघाडीत रस्सीखेच तीव्र

संमिश्र लोकवस्ती, विविध राखीव गट आणि अनेक दावेदार; बंडखोरी रोखणे आघाडीसमोर मोठे आव्हान

पुढारी वृत्तसेवा

ऐकीकडे झोपडपट्टी आणि दुसरीकडे उच्चभ्रू वस्ती, अशा संमिश्र लोकवस्ती असलेल्या प्रभाग क्रमांक 13 मध्ये सद्य:स्थितीला महाविकास आघाडीचे प्राबल्य राहील, असे चित्र आहे. त्यामुळे या प्रभागात महायुतीचा कस लागणार आहे. जागावाटप आणि उमेदवारीसाठी रस्सीखेच होणार असून, आघाडीपुढे बंडखोरी रोखण्याचे आव्हान असणार आहे. या प्रभागात ‌‘अ‌’ गट अनूसुचित जाती, ‌‘ब‌’ गट नागरिकांचा मागास प्रवर्ग (महिला), ‌‘क‌’ गट सर्वसाधारण (महिला) आणि ‌‘ड‌’ गट सर्वसाधारण प्रवर्गासाठी राखीव आहे.

आयात उमेदवाराला मिळू शकते संधी

प्रभागरचनेत आमूलाग्र बदल झाल्याने अपक्षांची संख्या कमी होऊ शकते, प्रभागातील ताडीवाला भागातील वंचित आणि बसपा मतदारांकडे दुर्लक्ष करता येणार नाही. त्यांच्याकडून आयात उमेदवाराला निवडणुकीच्या रिंगणात संधी मिळू शकते. पवारांच्या राष्ट्रवादीसमवेत असलेले ढोले पाटील आणि मनसेचे नेते वागसकर कुटुंबीयांची या प्रभागात काय भूमिका राहणार? हे पाहणे गरजेचे आहे.

निवारवाड्याचे एक टोक ते दुसरीकडे लष्कर भागातील इस्कॉन मंदिर आणि रेल्वेमार्ग, त्यापुढे मुळा-मुठा संगम आणि पुढे थेट नदी ओलांडून येरवड्यातील जय जवाननगर, अशी या प्रभागाची भौगोलिकदृष्ट्या रचना आहे. या प्रभागाची लोकसंख्या 88 हजार 569 इतकी आहे. पुणे स्टेशनचा बहुतांश परिसर या प्रभागात येत असून मंगळवार पेठ, ताडीवाला रोड, जुना बाजार, जय जवाननगर असा सर्व परिसर झोपडपट्टीव्याप्त परिसर आहे. तर बोट क्लब रोड, ढोले पाटील, आगरकरनगर, साधू वासवानी, आतुर पार्क, मंगलदास रोड, असा उच्चभ्रू भाग या प्रभागात आहे. 70 टक्के मध्यम आणि झोपडपट्टीचा भाग येतो, त्यामुळे तुलनेने दलित, मुस्लिम मतदार मोठ्या संख्येने आहेत. या प्रभागाने नदी-नाले, मुख्य रस्ते, पुलाच्या सीमा ओलांडल्या आहेत. त्यामुळे उमेदवारांची प्रचारात दमछाक होणार आहे.

राजकीयदृष्ट्या या प्रभागाची राजकीय गणिते बघितल्यास पुणे स्टेशन परिसर, ताडीवाला या भागात आत्तापर्यंत काँग्रेसचे वर्चस्व राहिले आहे. तर, नदीपलिकडील म्हणजेच जय जवाननगर परिसरात शिवसेना ठाकरे गटाचे वर्चस्व राहिले आहे. आता हे दोन्ही भाग एकत्र आल्याने या प्रभागावर महाविकास आघाडीचे वर्चस्व राहणार असल्याचे स्पष्ट आहे.

काँग्रेसकडून 2017 ला नगरसेवक म्हणून निवडून आलेले शहराध्यक्ष अरविंद शिंदे, लता राजगुरू, चाँदबी नदाफ, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदीप गायकवाड, शिवसेना ठाकरे गटाचे संजय भोसले आणि श्वेता चव्हाण हे पुन्हा निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याच्या तयारीत आहेत. राजकीय समीकरणे लक्षात घेऊन भोसले यांच्या पत्नी अश्विनी भोसले यांनाही निवडणुकीत उतरवू शकतात. महापालिका निवडणुकीत महाविकास आघाडी एकत्र लढल्यास काँग्रेसचे वरीलपैकी तीनही माजी नगरसेवक आणि शिवसेनेचे दोन माजी नगरसेवक हे उमेदवारीचे थेट दावेदार असणार आहेत. याशिवाय राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून माजी आमदार जयदेव गायकवाड यांचे चिरंजीव मयूर गायकवाड, आनंद सवाणे, नितीन राकडे हे प्रमुख इच्छुक आहेत. याशिवाय काँग्रेसकडून अनुसूचित जातीचे शहराध्यक्ष सुजित यादव, शिक्षण मंडळ माजी उपाध्यक्ष नुरुद्दीन सोमजी, विकार मुख्तार शेख हे देखील इच्छुक आहेत. त्यामुळे महाविकास आघाडीत जागावाटप हाच मोठा गहण प्रश्न असणार असून, त्यामुळे महाविकास आघाडीला आणि त्यात प्रामुख्याने काँग्रेसला बंडखोरीचा सामना करावा लागण्याची शक्यता आहे.

भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांची निवडणुकीत महायुती होणार क़ा? यावर काही राजकीय गणिते अवलंबून आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसकूडन (अजित पवार गट) माजी नगरसेवक प्रदीप गायकवाड, आशा कांबळे, तक्षशीला गायकवाड, दीक्षा गायकवाड हे इच्छुक आहेत. आघाडीच्या तुलनेत भाजप आणि शिवसेनेकडे तुल्यबळ उमेदवारांची कमतरता आहे. भाजपकडून रामचंद्र देवर, जयप्रकाश पुरोहित, सनी मेमाणे, स्वाती धनगर यांची नावे चर्चेत आहेत. तर आरपीआयकडून श्याम गायकवाड, शैलेंद्र चव्हाण, नीलम चव्हाण हे इच्छुक आहेत. तर शिवसेनेचे चेहरे कोण, हे अद्याप अस्पष्टच आहे. वंचितकडून ॲड. गजानन चौधरी आणि आजाद समाज पक्षाकडून भीमराव कांबळे हे इच्छुक आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT