ओतूर: ओतूर (ता.जुन्नर) हद्दीतील कल्याण- अहिल्यानगर महामार्गावरील अहिनवेवाडी फाट्यावर हमरस्त्यावर गेल्या दोन दिवसांपासून बिबट्याने धुमाकूळ घातला असून गुरुवारी (दि.१३) रात्री मुख्य महामार्गावर रात्री ११ वाजण्याच्या सुमारास याच बिबट्याने चार चाकी, दुचाकी अशा अनेक वाहनांचा पाठलाग करून पुन्हा हल्ला करण्याचा प्रयत्न केला असल्याचे निदर्शनास आले आहे.
या बिबट्याचा थरार सी सी टी व्ही कॅमेरात कैद झाली आहे. दि.१२ व १३ रोजी याच ठिकाणी दोन्ही दिवशी धुमाकुळ घालणारा बिबट्या हा एकच असून परिसरात या बिबट्याची मोठी दहशत पसरली आहे.
दरम्यान या महार्गावरून प्रवास करणाऱ्या प्रवाशांनी विशेष काळजी घेण्याचे आवाहन ओतूर वनविभागाच्या वतीने करण्यात आले आहे.तसेच वनविभागाने महामार्गावरील अहिनवेवाडी फाट्यानजीक तात्काळ पिंजरा लाऊन या बिबट्याचा बंदोबस्त करण्याची मागणी जोर धरू लागली आहे.
बुधवारी (दि१२) दुचाकीवरून जाणाऱ्या तरुणावर याच बिबट्याने हल्ला केल्याची घटना घडली होती,या घटनेत बिबट्याने चालत्या दुचाकीवर झेप घेऊन तरुणाला खाली पाडले होते दुचाकीस्वार तरुणाने मोठ्या चपळाईने बिबट्याची झेप हुकवल्याने हा तरुण थोडक्यात बचावला असून जखमी तरुण अद्यापही रुग्णालयात उपचार घेत आहे.बाळू सीताराम डोके (वय 34 रा कमलानगर आंबेगव्हाण) असे या जखमी दुचाकीस्वाराचे नाव आहे.
संभाव्य बिबट्या हल्ला रोखण्यासाठी वन विभागाने तात्काळ उपाययोजना करून या चवताळलेल्या बिबट्याचा बंदोबस्त करावा.