Ward 12 Shivajinagar PMC Politics Pudhari
पुणे

Ward 12 Shivajinagar PMC Politics: छत्रपती शिवाजीनगर-मॉडेल कॉलनी प्रभागात भाजपचा पेच! इच्छुकांमुळे पक्षश्रेष्ठींचा कस लागणार.

'एकास सोळा' इच्छुकांमुळे बंडखोरीची शक्यता; महायुतीच्या गैरव्यवहार प्रकरणांमुळे महाविकास आघाडीला मिळणार बळ? प्रभाग १२ मध्ये बदलत्या मतदारांचा कल निर्णायक ठरणार.

पुढारी वृत्तसेवा

प्रभाग क्रमांक : 12 छत्रपती शिवाजीनगर-मॉडेल कॉलनी

महापालिकेच्या 2017 मध्ये झालेल्या पंचवार्षिक निवडणुकीत या प्रभागात भाजपचे वर्चस्व राहिले आहे. त्यामुळे आगामी निवडणुकीसाठी भाजपच्या इच्छुकांची संख्या मोठी असून, उमेदवारी देताना पक्षश्रेष्ठींचा कस लागणार आहे. तर महायुतीमधील घटक पक्षांना युती होण्याची अपेक्षा असून, युती न झाल्यास भाजप व राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवारांमध्येच प्रमुख सामना रंगण्याची शक्यता आहे. तर महायुतीमधील नेत्यांच्या भ्रष्टाचाराच्या प्रकरणांमुळे महाविकास आघाडीतील इच्छुकांचे मनोबल वाढल्याचे चित्र आहे.

शिवाजीनगर गावठाण, जुना तोफखाना, मॉडेल कॉलनी, डेक्कन जिमखाना, प्रभात रस्ता, वडारवाडी, घोले रस्ता, पोलिस वसाहत, हनुमाननगर, भांडारकर रस्ता आदी परिसराचा या प्रभागात समोवश आहे. नव्या प्रभागरचनेत प्रभात रस्ता परिसरातील काही भाग या प्रभागातून वगळला आहे. तसेच भैय्यावाडी, खैरेवाडीसह शिवाजीनगर रेल्वे स्टेशनलगतचा परिसर या प्रभाला जोडला आहे. उर्वरित प्रभाग पूर्वीसारखाच आहे. 2017 पूर्वी राष्ट्रवादी काँग्रेस आणि कॉंग्रेसचा बालेकिल्ला असलेल्या या प्रभागामध्ये भाजपने जम बसविला आहे. यामुळे भाजपात मोठ्या प्रमाणात इनकमिंगही झाली आहे. महापालिकेच्या 2017 मधील निवडणुकीत या प्रभागातून भाजपचे उमेदवार सिध्दार्थ शिरोळे, नीलिमा खाडे, जोत्स्ना एकबोटे, स्वाती लोखंडे हे विजयी झाले होते. या वेळी या प्रभागात अनुसूचित जाती (महिला) प्रवर्ग, नागरिकांचा मागास प्रवर्ग, सर्वसाधारण (महिला) प्रवर्ग आणि सर्वसाधारण प्रवर्ग असे आरक्षण आहे.

आगामी निवडणुकीत या प्रभागात विरोधकांकडून नवीन चेहऱ्यांना संधी मिळण्याची शक्यता आहे. महायुती न झाल्यास भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये (अजित पवार गट) लढत होण्याची शक्यता आहे. प्रामुख्याने सोसायटी वर्ग जास्त असल्याने त्याचा फायदा भाजपला होण्याची शक्यता आहे. सध्या तरी महायुती एकत्र लढणार असल्याचे चित्र असल्याने दोन्ही पक्षांतील इच्छुकांनी एकत्र येत विविध सामाजिक कार्यक्रम राबविण्यास सुरवात केली आहे. गेल्या पंचवार्षिकमध्ये माजी नगरसेवकांनी प्रभागात विविध विकासकामे केली असली, तरी काही समस्या सोडविण्यात त्यांना अपयशही आल्यामुळे मतदारांचा कल कुणाकडे वळणार? हे देखील महत्त्वाचे ठरणार आहे.

इतर पक्षांच्या तुलनेत भाजपमध्ये इच्छुकांची संख्या सर्वाधिक 16 इतकी आहे. या वेळेस माजी नगरसेविका एकबोटे यांच्या जागी त्यांची मुलगी निवेदिता एकबोटे तर खाडे यांच्या जागी त्याचा मुलगा अपूर्व खाडे इच्छुक आहे. माजी नगरसेवक सिध्दार्थ शिरोळे आमदार झाल्याने त्यांच्या जागी नवीन चेहऱ्याला संधी मिळणार आहे. एकंदरीतच भाजपमध्ये इच्छुकांची संख्या मोठी आहे. त्यातच गत विधानसभा निवडणुकीत काँग्रेसमधून भाजपमध्ये गेलेले माजी उपमहापौर मुकारी अलगुडे हेही इच्छुक आहेत. त्यामुळे या प्रभागातील उमेदवारी देताना भाजप नेत्यांचा कस लागणार आहे. परिणामी उमेदवारी न मिळाल्यास बंडखोरी होण्याची शक्यताही नाकारता येत नाही.

या प्रभागात राष्ट्रवादी काँग्रेसचेही प्राबल्य आहे. मात्र, राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन गट झाल्याने त्यांची ताकद विभागली आहे. भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या (अजित पवार) तुलनेत अन्य पक्षांचे प्राबल्य कमी झाले आहे. हा प्रभाग भाजपच्या बाजूने झुकणार असला, तरी महायुतीतील घटक पक्षांच्या गैरव्यवहाराची प्रकरणे समोर येत असून, आगामी निवडणुकीत हा मुद्दा त्यांना अडचणीचा ठरू शकतो. कारण, या प्रभागात सुशिक्षित मतदार जास्त असून त्यांच्याकडून याबाबतचा विचार होऊ शकतो. त्यामुळे महाविकास आघाडीतील इच्छुकांचे मनोबल वाढून इच्छुकांची संख्याही वाढत असल्याचे चित्र आहे. एकंदरीतच आरक्षण, उमेदवारी, बंडखोरी, पक्षांतर्गत राजकारण, नागरिकांचा बदलता कल या सर्व गोष्टींचा विचार करता या प्रभागातील निवडणूक रंगतदार होणार आहे.

झोपडपट्ट्यांतील मते कोणाच्या पारड्यात?

कामगार पुतळा आणि राजीव गांधी वसाहतीचे पुनर्वसन झाले आहे. या भागात जवळपास पाच हजार मतदार होते. पुनर्वसनानंतर सुमारे एक हजार मतदारांनी दुसऱ्या मतदारसंघात नावनोंदणी केली. मात्र, बहुतांश मतदारांची नावे या प्रभागात कायम आहेत. त्यांच्यामध्ये प्रभागाबाहेरील पुनर्वसनामुळे सत्ताधाऱ्यांविरोधात रोष आहे. त्यामुळे सत्ताधाऱ्यांकडून त्यांची विस्कटलेली घडी बसविण्याचा प्रयत्न होऊ शकतो, तर विरोधकांकडून हा मुद्दा प्रचारात घेऊन या मतदारांना आपल्याकडे खेचण्याचा प्रयत्न होण्याची शक्यता आहे.

युती आणि आघाडीमुळे ‌‘वेट ॲण्ड वॉच‌’

भाजपतील इच्छुकांनी ‌‘एकला चलो रे‌’, तसेच युती झाल्यास सर्व जागा आपल्याच पदरात येतील यादृष्टीने निवडणुकीची तयारी सुरू केली आहे. तर अन्य पक्षांमधील इच्छुक युती, तसेच आघाडी होण्याच्या प्रतीक्षेत आहेत. भाजप वगळता अन्य पक्षातील इच्छुकांची संख्या अद्याप कमी आहे. आरक्षण जाहीर झाले असले, तरी बहुतांश इच्छुक युती, आघाडी अथवा स्वतंत्र लढण्याच्या निर्णयानंतर समोर येण्याची शक्यता आहे. अनुसूचित जाती गटात महिला आरक्षण लागू झाल्याने बहुतांश पक्षांना उमेदवार शोधावे लागणार आहेत. तर, नागरिकांचा मागास प्रवर्ग खुला झाल्याने बहुतांश इच्छुकांच्या आशा उंचावल्या आहेत.

विविध पक्षांतील इच्छुक उमेदवार

भाजप : निवेदिता एकबोटे, स्वाती लोखंडे, अपूर्व खाडे, पूजा जागडे, रवींद्र साळेगावकर, सुनील पांडे, अजय दुधाणे, मुकारी अलगुडे, सागर धोत्रे, संदीप काळे, अपर्ण कुऱ्हाडे, राजेश धोत्रे, राम म्हेत्रे, अनिल पाटोळे, मंजू वाघमारे-सरोदे, सारिका अरविंद कांबळे. काँग्रेस : भाऊ गोरावडे, अजित जाधव, नारायण पाटोळे, सोनाली जाधव, संजय मोरे, कैलास मंजाळकर, राहुल वंजारी, अविनाश बहिरट, जावेद निलगर, वासंती मोरे. राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) : बाळासाहेब बोडके, दयानंद इरकल, महेश हांडे, लावण्या शिंदे, मिरा आखाडे. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (शरद पवार गट) : उदय महाले, अनिता पवार, रूपेश गायकवाड. मनसे : रणजित शिरोळे, परिक्षित शिरोळे, सोनम कुसाळकर. शिवसेना (शिंदे गट) : वाहिद निलगर, विशाल डोंगरे, महेश पवार, आकाश रेणुसे, विशाल पवार. शिवसेना (ठाकरे गट) : अतुल दिघे, आनंद मंजाळकर, अशोक दिवसे, रोहिणी दिघे, राजू पवार.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT