निनाद देशमुख
पुणे : पुण्यातील लोकमान्य वसाहतीचा क्लस्टर अंतर्गत विकास करावा, अशी मागणी आमदार हेमंत रासने यांनी केली आहे. मात्र, आठ वर्षांपूर्वी जाहीर करण्यात आलेल्या क्लस्टर योजनेतून अद्याप एकाही जुन्या वाड्यांचा विकास शहरात झालेला नाही. जागा मालक आणि भाडेकरू यांच्या वादात आत्तापर्यंत एकही प्रस्ताव महापालिकेला प्राप्त झालेला नाही तर महापालिकेकडूनही वाडा मालकांना एकत्र आणण्यात कोणत्याच उपाय योजना करण्यात आल्या नसल्याने त्यांनाही अपयश आले आहे.(Latest Pune News)
मध्यवर्ती पुण्यातील पेठ भागात अनेक मोठे वाडे आहेत. यातील अनेक वाड्यांची पडझड झाली आहे, तर काही वाडे हे धोकादायक झाले आहेत. या वाड्यांचा एकत्रित विकास करण्यात यावा यासाठी, जुन्या वाड्यांच्या क्लस्टर पुनर्विकासाची योजना पुणे महापालिकेने मंजूर केली.
या योजनेला आठ वर्षांपेक्षा अधिक काळ लोटला आहे. राज्य शासनाच्या दरबारी देखील ही योजना प्रलंबित आहे. तसेच ही योजना घोषित होऊनही अद्याप एकही प्रस्ताव महापालिकेकडे आलेला नसल्याने ही योजना रखडलेली आहे. वाड्यांची क्लस्टर पुनर्विकासाची योजना ही वाड्यांच्या पुनर्विकासाला चालना देणारी आहे. यामुळे पेठ परिसराचा सुनियोजित विकास होऊन नागरिकांना देखील चांगली व मोकळी हवेशीर घरे मिळणार आहे.
मात्र, धोरणात्मक निर्णयाच्या अभावामुळे पेठ भागातील जुन्या आणि धोकादायक वाड्यांच्या पुनर्विकासाचा वेग मंदावला आहे. वाड्यांच्या विकासासाठी विशेष धोरण मंजूर झाले नाही. वाड्यांचा पुनर्विकास वेगाने करण्यासाठी युनिफाइड डेव्हलपमेंट कंट्रोल अँड प्रमोशन रूल्स (यूडीसीपीआर) मध्ये देखील काही तरतुदी देण्यात आला असून त्या धर्तीवर वाड्यांचा विकास करण्यासाठी महानगरपालिकेमार्फत प्रयत्न केले जात आहे. वाड्यांच्या क्लस्टर योजनेसाठी वाडा मालक व भाडेकरूंची संमती मिळवणे कठीण आहे. अनेक मालमत्तांवर खटले सुरू आहेत. परिणामी, एकाच परिसरातील अनेक वाडे पाडून मोठा भूभाग तयार करणे हे एक मोठे आव्हान आहे.
शहरातील धोकादायक झालेले वाडे आणि जुन्या इमारती तातडीने रिकामे करण्यासाठी पोलिसांची मदत घेण्याचा निर्णय महापालिकेने घेतला आहे. याबाबतचा प्रस्ताव बांधकाम विभागाने महापालिका आयुक्तांकडे मान्यतेसाठी ठेवला आहे. वाडे रिकामे करण्यासाठी आवश्यक ती मदत द्यावी, असे पत्र महापालिका आयुक्तांकडून पोलिस आयुक्तांना पाठविले जाणार असून त्यानंतर पोलिस बंदोबस्तात 37 धोकादायक वाडे रिकामे करण्याचे नियोजन महापालिकेने केले आहे.
वाडा मालक व भाडेकरू यांच्यात वाद ही या योजनेतील मोठी अडचण आहे. आत्तापर्यंत एकही प्रस्ताव महापालिकेला मिळलेला नाही.प्रशांत वाघमारे, शहर अभियंता, महापालिका
पुण्यात वाडे आणि चाळी या वर्षानुवर्षे दाटीवाटीच्या परंतु कायदेशीर आणि अधिकृत बांधकाम असलेल्या वस्त्या आहेत. जागा मालकांप्रमाणे भाडेकरू यांच्या देखील मोठ्या अपेक्षा आहेत. दोघांना योग्य मोबदला मिळाल्याशिवाय कोणतीही योजना यशस्वी होऊ शकत नाही. तसेच, दाट लोकवस्तीचा भाग असल्याने त्यांच्या अपेक्षेप्रमाणे बांधकाम होऊ शकत नाही. अनेक वाड्यांवर कायदेशीर प्रक्रिया कोर्टात सुरू आहेत. ही देखील एक मोठी समस्या आहे. जर ही योजना प्रभावीपणे राबवायची असेल तर महानगर पालिकेने एक स्वतंत्र कक्षाची स्थापना करून शहरातील वाड्यांचे मॅपिंग करणे गरजेचे आहे. कुण्याच्या काय काय अडचणी आहेत, याची माहिती एकत्रित करून वाडा मालक व भाडेकरू यांना योग्य प्रस्ताव द्यावा. शहरातील वाड्यांचे सर्वेक्षण करून त्याचा अहवाल तयार करून लोकांसोबत चर्चा करून एक सुसूत्र धोरण महापालिकेने तयार करणे गरजेचे आहे, तरच ही योजना यशस्वी होऊ शकेल.संदीप महाजन, आर्किटेक्ट
काय आहे योजना?
वाड्यांच्या क्लस्टर पुनर्विकास योजना ही मध्यवर्ती पेठांचा सुनियोजित विकास करण्यासाठी महत्त्वाची योजना आहे.
या योजनेत वाड्यांच्या पुनर्विकासासाठी प्रोत्साहन दिले गेले आहे.
या योजनेत अतिरिक्त 4 एफएसआय, बाजू, समोरील मार्जिनमध्ये शिथिलता देण्यात येते
भाडेकरूंच्या मोफत पुनर्वसनासाठी विशेष एफएसआयची सोय
मालमत्तांच्या पुनर्विकासासाठी रस्त्याच्या रुंदीमध्ये शिथिलता
विकास हक्कांचे विशेष क्लस्टर ट्रान्सफर (टीडीआर)
क्लस्टर डेव्हलपमेंटसाठी 5 एकर जागा आवश्यक
...या आहेत अडचणी
जागा मालक व भाडेकरू यांच्यात मोठा वाद, छोट्या मिळकती असल्याने पाच एकर भूभाग मिळण्यास अडचणी
अनेक वाड्यांची प्रकरणे कोर्टात प्रलंबित
महानगर पालिकेकडूनही जागा मालक व भाडेकरू यांच्यातील वाद मिटवण्यास कोणताच पुढाकार नाही