

दौंड : दौंड नगरपालिकेचे नगराध्यक्षपद ओबीसी महिलेकरिता राखीव झाल्यानंतर प्रभाग आरक्षण सोडतीमध्ये शहरातील मातब्बरांचे पत्ते कट झाल्याने गेल्या अनेक दिवसांपासून चंग बांधून बसलेल्या आणि ‘मी अमुक प्रभागामधून निवडणूक लढवणार’ असा डंका पिटणाऱ्यांचा हिरमोड झाला आहे.(Latest Pune News)
आता सर्वच राजकीय पक्षांनी आपल्या पक्षाचे नगराध्यक्षपदाचे उमेदवार व प्रभाग निहाय उमेदवार चाचपणीकरिता बैठका आयोजित केल्या आहेत. भाजपचे आमदार राहुल कुल आणि त्यांचे कट्टर समर्थक नागरिक हितसंरक्षण आघाडीचे नेते प्रेमसुख कटारिया यांचे काय ठरणार? याची उत्सुकता आहे.
गेली अनेक वर्षे दौंड नगरपालिकेत एकहाती सत्ता ठेवणारे प्रेमसुख कटारिया यांचे नागरिक हितसंरक्षण, भाजप, राष्ट्रवादी अजित पवार गट, राष्ट्रवादी शरद पवार गट, शिवसेना (शिंदे), शिवसेना (उबाठा), काँग्रेस यापैकी कोण कोणाबरोबर युती करतात, हे पाहणे गरजेचे आहे.
दौंड शहरात खरी कसोटी आहे ती भाजपचे आमदार राहुल कुल आणि शहरातील कसलेले राजकारणी नागरिक हितसंरक्षणचे नेते प्रेमसुख कटारिया यांच्यामध्ये काय ठरणार? विद्यमान आमदार राहुल कुल व माजी नगराध्यक्ष प्रेमसुख कटारिया या एकाच नाण्याच्या दोन बाजू असल्याचे शहरात मानले जाते. त्यामुळे राहुल कुल भारतीय जनता पक्षाचे पॅनल उभे करणार की प्रेमसुख कटारिया हे आपले स्वतःचे नागरिक हितसंरक्षण मंडळाचे पॅनल उभे करणार? असा पेच दोन्ही नेत्यांसमोर आहे. त्यामुळे कार्यकर्ते अजून तरी संभमात आहेत.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून इंद्रजित जगदाळे यांच्या कन्येला नगराध्यक्षपदाची उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे, तर प्रेमसुख कटारिया यांच्या गटाकडून आकांक्षा काळे, पूजा गायकवाड, वैशाली माशाळकर व इतरही महिला ओबीसी उमेदवार आहेत, त्यामुळे दौंड नगरपालिकेची निवडणूक तिरंगी किंवा चौरंगी होण्याची शक्यता आहे.
सध्या दौंड शहरात आ. राहुल कुल यांची ताकद असली तरी, त्यांना तोडीस तोड माजी नगराध्यक्ष इंद्रजित जगदाळे व त्यांचे बंधू माजी जिल्हा परिषद सदस्य वीरधवल जगदाळे यांचे आव्हान असणार आहे.
प्रेमसुख कटारीय यांनी शहरात आमदार राहुल कुल यांच्यामार्फत बराच निधी आणला व शहरात काही विकासकामे झाली. परंतु, ही कामे म्हणावी तशी दर्जेदार झालेली नाहीत. नगरपालिका हद्दीमधील काही कामे ही सार्वजनिक बांधकाम विभागाकडे वर्ग करण्यात आली. त्यामुळे नगरपालिका सक्षम नव्हती का? असादेखील प्रश्न नागरिक विचारू लागले आहेत. जी काही कामे झालेली आहेत, ती उत्कृष्ट दर्जाची झालेली नाहीत, हे मात्र निश्चित. त्यामुळे याची किंमत कुल-कटारिया यांना मोजावी लागेल, हे मात्र तितकेच सत्य आहे.
शहरात प्रेमसुख कटारिया हे मुरब्बी राजकारणी असल्याने शेवटच्या क्षणी कोणता निर्णय घेतात, हे पाहणे गरजेचे आहे. कारण, दौंड शहराची त्यांना खडान् खडा माहिती आहे. दौंड शहरात मागासवर्गीय, मुस्लिम, ख्रिश्चन हे मतदार मोठ्या प्रमाणात असल्याने हे मतदार कोणाकडे आकर्षित होतात व कोणाच्या शब्दाला मान देतात, हे येणाऱ्या काळात समजेल. आमदार राहुल कुल व स्वतः कटारिया हे दोघे मिळून दौंड शहराच्या उमेदवाराचा निर्णय करतील, असे आजचे तरी चित्र आहे.
शहरात प्रेमसुख कटारिया हे मुरब्बी राजकारणी असल्याने शेवटच्या क्षणी कोणता निर्णय घेतात, हे पाहणे गरजेचे आहे. कारण, दौंड शहराची त्यांना खडान् खडा माहिती आहे. दौंड शहरात मागासवर्गीय, मुस्लिम, ख्रिश्चन हे मतदार मोठ्या प्रमाणात असल्याने हे मतदार कोणाकडे आकर्षित होतात व कोणाच्या शब्दाला मान देतात, हे येणाऱ्या काळात समजेल. आमदार राहुल कुल व स्वतः कटारिया हे दोघे मिळून दौंड शहराच्या उमेदवाराचा निर्णय करतील, असे आजचे तरी चित्र आहे.