

वाल्हे : पिंगोरी (ता. पुरंदर) या सैनिकांच्या गावातील सुयोग संदीप शिंदे याची भारतीय सैन्यात लेफ्टनंट या पदावर निवड झाली आहे. या यशामुळे पिंगोरी गावचा आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला. या आनंदात ग्रामस्थांनी सुयोगची सजविलेल्या बैलगाडीतून मिरवणूक काढली तसेच त्याच्यासह आई नयना आणि वडील सेवानिवृत्त सैनिक संदीप शिंदे यांचाही सन्मान करण्यात आला. (Latest Pune News)
सुयोगने सलग दहावेळा अपयशाचा सामना करूनही हार न मानता प्रयत्न सुरू ठेवले. आता त्याचे देशसेवेचे स्वप्न अखेर पूर्ण झाले आहे. सुयोगचे प्राथमिक शिक्षण पिंगोरी येथे, तर माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण पुण्यात झाले. महाविद्यालयीन शिक्षण घेताना त्याने एसएसबी परीक्षेची तयारी सुरू केली होती. त्याचे वडील संदीप शिंदे हे भारतीय सैन्यातून निवृत्त झाले आहेत. त्यांच्या पावलावर पाऊल ठेवत सुयोगनेही सैन्यात अधिकारी होण्याचा निर्धार पूर्ण केला.
त्याच्या या यशाचा आनंद ग्रामस्थांनी साजरा केला. या वेळी सरपंच संदीप यादव, वाघेश्वरी देवस्थान कमिटी अध्यक्ष पोपट शिंदे, माजी सैनिक अरुण शिंदे, निवृत्त उपविभागीय पोलिस अधिकारी तुकाराम शिंदे, उद्योजक लक्ष्मण कदम, पोलिस पाटील राहुल शिंदे, सत्यवान भोसले, वीरपत्नी छाया शिंदे, वसंत शिंदे, कल्पना शिंदे, गोरख शिंदे, दत्तात्रेय शिंदे, धनंजय शिंदे, रूपेश यादव, सागर धुमाळ, अमोल शिंदे, प्रवीण शिंदे, सुनील शिंदे आदींसह ग्रामस्थ उपस्थित होते.
अनेकवेळा अपयश आले. पण, प्रत्येक वेळी काहीतरी शिकायला मिळाले. शेवटी माझे सैन्यात अधिकारी होण्याचे स्वप्न पूर्ण झाले, असे सुयोग शिंदे याने सांगितले. प्रास्ताविक रमेश शिंदे यांनी केले. देवस्थानचे उपाध्यक्ष वसंत शिंदे यांनी आभार मानले.