

बारामती : बारामती पंचायत समितीचे सभापतिपद पहिल्या अडीच वर्षांसाठी सर्वसाधारण गटासाठी निश्चित झाले आहे. त्यामुळे यंदा तालुक्यात सभापतिपदासाठी इच्छुक वाढणार आहेत.(Latest Pune News)
गट आणि गणांची पुनर्रचना झाली असली, तरी बारामती तालुक्यात गट-गणांची संख्या मात्र कायम राहिली आहे. जिल्हा परिषदेचे 6 गट कायम असून, पंचायत समितीचे 12 गण आहेत. त्यामुळे पंचायत समितीत 12 सदस्य निवडून जातील.
सर्वसाधारण गटासाठी पद खुले झाल्याने नवोदितांसह अनुभवी सदस्यांमध्येही उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. सुपा, काऱ्हाटी, शिर्सुफळ, गुणवडी, पणदरे, मुढाळे, वडगाव निंबाळकर, मोरगाव, निंबुत, कांबळेश्वर, निरावागज व डोर्लेवाडी असे 12 गण तालुक्यात आहेत. या सर्वच गणांतील इच्छुकांना यंदा सभापतिपदाची लॉटरी लागू शकते. ग््राामीण भागात सभापतिपदाला मोठे महत्त्व असते. गेली काही वर्षे इच्छुक निवडणूक कधी लागणार, याकडे लक्ष ठेवून होते. आता निवडणूक कार्यक्रम जाहीर झालेला नसला तरी सभापतिपदाची आरक्षण सोडत पार पडली आहे.
बारामती पंचायत समिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वात यापूर्वी कार्यरत होती. येणाऱ्या निवडणुकीत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादीला तालुक्यात वातावरण चांगले आहे. तालुक्याच्या ग्रामीण भागातही मोठ्या प्रमाणावर विकासकामे झाली आहेत. राष्ट्रवादीकडे पदाधिकारी-कार्यकर्त्यांची मजबूत फळी आहे. याउलट भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्ष, राष्ट्रीय समाज पक्ष, बहुजन समाज पक्ष यांची ताकद काही प्रमाणात कमी आहे.
राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाने तालुक्यात नवीन लोकांना कामाची संधी दिली आहे. हा पक्षही विस्तारतो आहे. भाजपचेही जुने पदाधिकारी-कार्यकर्ते तालुक्यात आहेत. परंतु, महायुती एकत्रितपणे निवडणुकीला सामोरे जाते की वेगळे लढते, हे अद्याप ठरलेले नाही. उपमुख्यमंत्री पवार यांना भाजप-सेनेने लोकसभा, विधानसभेला मोठी मदत केली आहे. परंतु, तालुक्यावर असणारी पकड लक्षात घेता मित्रपक्षांना पवार सांभाळून घेतील का? याबाबत सध्यातरी साशंकता आहे.