voter list Pudhari
पुणे

Voter List Verification: पुण्यात मतदार पडताळणीला वेग; 25 टक्के काम पूर्ण

विशेष सखोल पुनरीक्षण कार्यक्रमांतर्गत 22 लाख मतदारांची पडताळणी; एप्रिलपासून महत्त्वपूर्ण प्रक्रिया सुरू

पुढारी वृत्तसेवा

पुणे: राज्यातील सर्वाधिक 91 लाख 60 हजार मतदार असलेल्या पुणे जिल्ह्यात केंद्रीय निवडणूक आयोगाच्या विशेष सखोल पुनरीक्षण कार्यक्रमाची पूर्वतयारी म्हणून जिल्ह्यात सध्या सुरू असलेल्या मतदारांच्या दोन याद्यांच्या पडताळणीचे काम सुमारे 25 टक्के पूर्ण झाले आहे. पडताळणी झालेल्या एकूण मतदारांची संख्या सुमारे 22 लाख असून, या मतदारांना एप्रिलमध्ये होऊ घातलेल्या विशेष सखोल पुनरीक्षण कार्यक्रमात सहभागी होण्याची गरज नाही.

केंद्रीय निवडणूक आयोगाकडून महाराष्ट्रासह 22 राज्यांमध्ये मतदार यादीच्या विशेष सखोल पुनरीक्षण कार्यक्रम सुरू आहे. त्यानुसार राज्यातील 2025 मधील मतदार यादीची पडताळणी 2002 च्या मतदार यादीशी करण्यात येत आहे. पुणे जिल्ह्यातही अशी पडताळणी सुरू झाली आहे. जिल्ह्यात 2025 च्या मतदार यादीनुसार 91 लाख 59 हजार 598 मतदार आहेत.

त्यानुसार 2002 च्या तसेच 2025 च्या मतदार यादीत नाव पुणे जिल्ह्यातच असलेल्या मतदारांची पडताळणी सुरू करण्यात आली आहे. आतापर्यंत 22 लाख 21 लाख 961 मतदारांची पडताळणी पूर्ण झाली आहे. एकूण मतदारसंख्येच्या हे प्रमाण 24.26 टक्के इतके आहे. यात बारामती मतदारसंघ आघाडीवर आहे. या मतदारांना चिन्हांकित करण्यात येत असून, चिन्हांकित मतदार अंतिम असल्याचे गृहित धरण्यात येतील. जिल्ह्यात बारामती मतदारसंघात हे काम आघाडीवर असून, भोर व आंबेगाव मतदारसंघांचा क्रमांक आहे. पुणे शहरात कसबा पेठ मतदारसंघात पडताळणी झालेल्या मतदारांचे काम अधिक आहे.

2002 च्या यादीत नाव नसेल तर...

जे मतदार 2002 च्या मतदार यादीत त्याच मतदारसंघात नाहीत अशांना, अन्य मतदारसंघात नाव असल्याचा पुरावा द्यावा लागणार आहे. मतदार यादीत नाव नसल्यास आई वडिलांचे, आजोबांचे किंवा पणजोबांचे नाव असल्याचा पुरावा द्यावा लागणार आहे. 2002 नंतर जन्मलेल्या मतदारांना गणना अर्ज भरताना जन्मदाखला किंवा शाळा सोडल्याचा दाखला द्यावा लागणार आहे. तसेच 2002 मध्ये मतदार ज्या ठिकाणी होता, त्या ठिकाणाचा रहिवासाचा पुरावा द्यावा लागणार आहे. अधिकाऱ्यांकडून या प्रमाणपत्राची पडताळणी केली जाणार आहे. ही कागदपत्रे योग्य आहेत, असे निवडणूक नोंदणी अधिकाऱ्याचे मत झाल्यानंतरच त्याचे नाव मतदार यादीत समाविष्ट करण्यात येणार आहे.

मतदार पडताळणीसाठी केंद्रस्तरीय अधिकारी त्यांच्या मतदान केंद्राच्या हद्दीतील मतदारांशी फोनवरून व प्रत्यक्ष संपर्क साधत आहेत. ज्या मतदारांची नावे पुणे जिल्ह्यात 2002 च्या यादीत नाहीत, अशा मतदारांनी 2002 मध्ये ज्या ठिकाणच्या यादीत नावे आहेत, याचा पुरावा काढून ठेवावा, जेणेकरून मतदान केंद्रस्तरीय अधिकाऱ्यांना पडताळणी करणे सोपे होईल, असे आवाहन उपजिल्हा निवडणूक अधिकारी मीनल कळसकर यांनी केले.
मीनल कळसकर, उपजिल्हा निवडणूक अधिकारी

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT