

चाकण: चाकण औद्योगिक भागातील भीषण वाहतूक कोंडीवर तोडगा काढण्यासाठी शासनाने प्रयत्न सुरू केले आहेत. त्यामध्ये तळेगाव-चाकण-शिक्रापूर एलिव्हेटेड मार्ग व नाशिक फाटा ते खेड या 30 किलोमीटर लांबीच्या 8 पदरी एलिव्हेटेड कॉरिडॉर प्रकल्पाने महत्त्वाचा टप्पा पार केला आहे. पुढील काळात या मार्गांची कामे सुरू होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.
तळेगाव-चाकण-शिक्रापूर राष्ट्रीय महामार्ग क्रमांक एनएच-548 डी हा रस्ता विकसित करण्याच्या कामाचा अंतिम अध्यादेश सार्वजनिक बांधकाम विभागाने जारी केला आहे. महाराष्ट्र राज्य पायाभूत सुविधा महामंडळामार्फत ‘रचना करा, बांधा, वापरा आणि हस्तांतरित करा’ (डीबीओटी) तत्त्वावर हे काम होणार आहे. तळेगाव-चाकण- शिक्रापूर हा 53 किलोमीटरचा महामार्ग मुंबई-पुणे आणि पुणे-छत्रपती संभाजीनगर या दोन राष्ट्रीय महामार्गांना जोडणारा आहे.
या रस्त्यावर अनेक ठिकाणी सतत वाहतुकीची कोंडी होत आहे. हे टाळण्यासाठी तळेगाव ते चाकण मार्गावर चारपदरी उन्नत महामार्ग आणि जमिनीस समांतर चारपदरी रस्ता विकसित करणे, तसेच चाकण ते शिक्रापूर मार्गात जमिनीस समांतर चारपदरी रस्ता महाराष्ट्र राज्य पायाभूत सुविधा महामंडळामार्फत विकसित करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती. त्यावर मागील आठवड्यात मंगळवारी 24 मार्च रोजी मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय घेण्यात आला. कामाची प्रस्तावित किंमत 4 हजार 902 कोटी रुपये आहे.
नाशिक फाटा ते खेड एलिव्हेटेड कॉरिडॉर
नियोजित नाशिक फाटा ते खेड या 30 किलोमीटर लांबीच्या 8 पदरी एलिव्हेटेड कॉरिडॉर प्रकल्पाने महत्त्वाचा टप्पा पार केला आहे. मार्च 2026 मध्ये या प्रकल्पासाठी तांत्रिक निविदा उघडण्यात आल्या असून, या प्रकल्पाच्या निविदा प्रक्रियेला आता गती मिळाली आहे. हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणमार्फत राबवण्यात येत असून, यासाठी सुमारे 7 हजार 827 कोटींचा खर्च अपेक्षित आहे.
...असा असणार मार्ग
तळेगाव ते चाकण 28.3 किलोमीटर अंतरात चौपदरी उन्नत (एलिव्हेटेड) बांधणी केली जाणार आहे. तळेगाव ते शिक्रापूर 53.2 किलोमीटरमध्ये जमिनीस समांतर चारपदरी रस्ता असणार आहे. 171 लहान जंक्शन, तर चार मोठे जंक्शन या मार्गावर उभी राहणार आहेत. डाव्या उजव्या बाजूने चढ-उतार करण्यासाठी चार रॅम्प असणार आहेत. या रस्त्यावर जमिनीवर दोन, उड्डाणपुलावर पाच असे सात पथकरवसुली नाके (टोल प्लाझा) असणार असल्याचे संबंधित अधिकारी सांगत आहेत.