

मंचर: रक्तवाहिनीत तयार झालेली गाठ विरघळवण्याच्या (थॉम्बोलिसिस) उपचारपद्धतीद्वारे पहिल्याच रुग्णावर आंबेगाव तालुक्यातील मंचर उपजिल्हा रुग्णालयात यशस्वी उपचार करण्यात आले. हृदयविकाराचा तीव झटका आलेल्या रुग्णाला वेळेत उपचार मिळाल्यामुळे त्याचे प्राण वाचविण्यात डॉक्टरांना यश आले.
मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित 70 वर्षीय महिला रुग्णाला अचानक तीव हृदयविकाराचा झटका आल्याने त्यांना तातडीने मंचर उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. रुग्णाची प्रकृती गंभीर असल्याने डॉक्टरांनी त्वरित रक्तवाहिनीत निर्माण झालेली गाठ विरघळवण्याची प्रक्रिया करण्याचा निर्णय घेतला. या उपचारापूर्वी रुग्णाच्या नातेवाईकांना संपूर्ण उपचार पद्धती व त्यातील संभाव्य धोके समजावून सांगून त्यांची लेखी संमती घेतली.
यानंतर डॉ. सदानंद राऊत (भिषक), डॉ. रामप्रसाद धायकर (भूलतज्ज्ञ), डॉ. अर्जुन दिघे (बालरोगतज्ज्ञ), डॉ. विनोद कांगुले (भूलतज्ज्ञ), डॉ. परेश पोटे, डॉ. विवेकानंद फसाले व डॉ. स्नेहल बोंबले यांच्या टीमने समन्वयाने उपचार यशस्वीरीत्या पूर्ण केले.
उपचारानंतर रुग्णाची प्रकृती स्थिर झाल्यानंतर पुढील विशेष उपचारांसाठी त्याला हृदयविकार तज्ज्ञांकडे पाठविण्यात आले. उपचारपद्धती अत्यंत महत्त्वाची व तातडीची असून, निवडक रुग्णांमध्येच ती करता येते. सार्वजनिक आरोग्य विभागाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार डॉ. सदानंद राऊत यांनी उपजिल्हा रुग्णालयातील वैद्यकीय अधिकाऱ्यांना यासंदर्भात विशेष प्रशिक्षण दिले आहे.
मंचर उपजिल्हा रुग्णालयात थॉम्बोलिसिस सुविधा सुरू झाले असून, गरीब व गरजू रुग्णांसाठी हे वरदान ठरेल. पहिल्या रुग्णावर यशस्वी उपचार झाला आहे.
डॉ. शिवाजी जाधव, वैद्यकीय अधीक्षक, उपजिल्हा रुग्णालय
संबंधित रुग्णावर उपचार पद्धतीचा खासगी रुग्णालयात साधारण 50 ते 60 हजार रुपये खर्च आला असता. येथील उपजिल्हा रुग्णालयात या उपचार पद्धतीत मोफत वैद्यकीय उपचार करून रुग्णाला जीवदान दिले आहे.
डॉ. सदानंद राऊत