पुणे: जिल्ह्यासह राज्यात मागील काही दिवसांपासून पडत असलेल्या थंडीचा परिणाम फळभाज्यांच्या उत्पादनावर झाला आहे. परिणामी, गुलटेकडी मार्केट यार्डात फळभाज्यांची आवक रोडावली आहे. बाजारात होत असलेल्या मागणीच्या तुलनेत आवक कमी पडल्याने हिरवी मिरची आणि तोतापुरी कैरीच्या भावात दहा टक्क्यांनी वाढ झाली आहे. मागणी आणि पुरवठा यातील समतोलामुळे उर्वरित फळभाज्यांचे भाव मागील आठवड्याच्या तुलनेत स्थिर असल्याची माहिती ज्येष्ठ अडतदार विलास भुजबळ यांनी दिली.
पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीच्या तरकारी विभागात राज्यासह परराज्यातून 100 ट्रकमधून शेतमालाची आवक झाली. परराज्यांतून झालेल्या आवकमध्ये कर्नाटक, उत्तर प्रदेश, गुजराथ येथून हिरवी मिरची सुमारे 14 ते 15 टेम्पो, कर्नाटक येथून कोबी 4 ते 5 टेम्पो, आंध्र प्रदेश आणि तामिळनाडू येथून शेवगा 3 टेम्पो, राजस्थानातून गाजर सुमारे 11 ते 12 टेम्पो, कर्नाटक येथून घेवडा 2 ते 3 टेम्पो, कर्नाटक येथून भुईमूग 2 टेम्पो, मध्य प्रदेश येथून मटार 35 ते 36 टेम्पो, कर्नाटक येथून पावटा 2 ते 3 टेम्पो, तामिळनाडू येथून तोतापुरी कैरी, 200 क्रेटस, मध्यप्रदेश येथून लसणाची सुमारे 14 ते 15 टेम्पो तर इंदौर, आग्रा आणि स्थानिक भागातून मिळून बटाट्याची 50 ते 55 टेम्पो इतकी आवक झाली.
स्थानिक भागातून झालेल्या आवकमध्ये सातारी आले सुमारे 700 ते 750 गोणी, भेंडी सुमारे 5 ते 7 टेम्पो, कोबी 5 ते 6 टेम्पो, हिरवी मिरची 4 ते 5 टेम्पो, गवार 3 ते 4 टेम्पो, टोमॅटो 7 ते 8 हजार क्रेटस, काकडी 7 ते 8 टेम्पो, फ्लॉवर 10 ते 12 टेम्पो, ढोबळी मिरची 10ते 12 टेम्पो, तांबडा भोपळा सुमारे 10 ते 12 टेम्पो, गाजर 3 ते 4 टेम्पो, घेवडा 4 टेम्पो, पावटा 2 ते 3 टेम्पो, नवीन आणि जुना कांदा मिळून सुमारे 100 टेम्पो आवक झाली.
पालेभाज्यांचा उतरला भाव
मार्केट यार्डात आवकच्या तुलनेत पालेभाज्यांची मागणी घटली आहे. त्यामुळे चुका, कोथिंबिर, कांदापात, करडई, अंबाडी, चाकवतच्या भावात घट झाली आहे. चुकाच्या भावात घाऊक बाजारात जुडीमागे 4 रुपये, तर उर्वरित पालेभाज्यांच्या भावात प्रत्येकी 2 रुपयांनी घट झाली आहे. तर चाकवत आणि पुदीनाच्या भावात जुडीमागे प्रत्येकी 2 रुपयांनी वाढ झाली आहे.
मागणी आणि पुरवठा यातील समतोलामुळे उर्वरित पालेभाज्यांचे भाव स्थिर असल्याची माहिती व्यापाऱ्यांनी दिली. येथील बाजारात कोथिंबिरीची दीड लाख जुडी आवक झाली. ही आवक मागील आठवड्याच्या तुलनेत स्थिर आहे. तर मेथीची आवक घटली आहे. मागील आठवड्यात दीड लाख जुडी आवक झालेल्या मेथीची आज 80 हजार जुडी आवक झाली. कोथिंबिरीस जुडीस दर्जानुसार 4 ते 8 रुपये भाव मिळत असल्याचे यावेळी सांगण्यात आले.