आळेफाटा : जुन्नर कृषी उत्पन्न बाजार समितीचे आळेफाटा उपबाजारात नववर्षाच्या सुरुवातीस शुक्रवारी (दि. 2) उच्चांकी 42 हजार 600 गोणी लाल सेंद्रिय कांद्याची आवक झाली आहे. ही गेल्या वीस वर्षांतील सर्वाधिक आवक असल्याची माहिती सभापती संजय काळे, उपसभापती निवृत्ती काळे यांनी दिली.
लिलावात लाल कांद्यास प्रतिदहा किलोस 221 कमाल भाव मिळाला. पावसाळी हंगामाचे मध्यानंतर व शेवटी लागवड झालेल्या लाल सेंद्रिय नाशिक कांद्याची सध्या काढणी सुरू आहे. यामुळे बाजारात हा कांदा शेतकरीवर्ग विक्रीस आणत असल्याने आवक वाढली आहे.
उन्हाळी हंगामातील साठवणूक केलेल्या गावरान कांद्यास यावर्षी समाधानकारक भाव मिळाला नसल्याने शेतकरीवर्ग आर्थिक अडचणीत आले आहेत. त्यातच नोव्हेंबर महिन्याचे मध्यापासून पावसाळ्यातील नाशिक लाल सेंद्रिय कांदा विक्रीस दाखल झाला. सुरवातीस या कांद्यास कमी भाव मिळाला मात्र त्यानंतर या कांद्याचे भावात घसरण झाली. सततच्या पावसाने या कांद्याचे सरासरी उत्पादन कमी निघत असल्याने व सध्याचा मिळणारा भाव यामुळे लाल सेंद्रिय कांदा उत्पादक शेतकरीवर्ग हवालदिल झाले आहेत.
आळेफाटा उपबाजारात गेल्या काही महिन्यांपासून कांदा आवक ही चांगली होत आहे. गेल्या 20 वर्षांपूर्वी येथे कांदा लिलाव सुरू झाले. येथे अगदी वर्षभर कांदा आवक चांगली होते. जुन्नर तालुक्यासह शिरूर व शेजारील अहिल्यानगर जिल्ह्यातील संगमनेर, पारनेर व अकोले तालुक्यांतील शेतकरी येथे कांदा विक्रीस आणतात.
येथे शुक्रवारी झालेली कांदा आवक ही आतापर्यंतची सर्वाधिक अशी उच्चांकी आवक या उपबाजारात ठरली आहे. लिलावात जुने कांद्यास प्रतिदहा किलोस 100 ते 201 रूपये व नवीन लाल सेंद्रिय कांद्यास 30 ते 221 रुपये असा भाव मिळाल्याची माहिती संचालक नबाजी घाडगे, सचिव रूपेश कवडे, कार्यालयप्रमुख दीपक मस्करे यांनी दिली.