शंकर कवडे
पुणे: पितृपक्षामुळे पितरांच्या नैवेद्यासाठी लागणाऱ्या भाज्यांची मागणी वाढल्याने गुलटेकडी मार्केट यार्डातील भाजीपाला बाजारात तेजीचे वातावरण आहे. गवार, भेंडी, तांबडा भोपळा, कारले आणि काकडीला विशेष मागणी असून, त्यातच काही फळभाज्यांची आवक मागणीच्या तुलनेत कमी पडत आहे. परिणामी, सर्व प्रकारच्या भाज्यांच्या भावात पाच ते पंधरा टक्क्यांनी वाढ झाली आहे. रविवारी बाजारात सुमारे १०० ट्रकमधून शेतमाल दाखल झाला.
परराज्यांतून झालेल्या आवकमध्ये आंध्र प्रदेश, तामिळनाडू आणि कर्नाटक, गुजरात येथून हिरवी मिरची सुमारे १५ टेम्पो, बंगळुरू येथून आले २ टेम्पो, कर्नाटक येथून कोबी ४ टेम्पो, गुजरात आणि कर्नाटकातून भुईमूग शेंग ५ टेम्पो, इंदूर येथून गाजर १० टेम्पो, कर्नाटक येथून कोबी आणि घेवडा ३ टेम्पो, आंध्र प्रदेश व तामिळनाडू येथून शेवगा ३ ते ४ टेम्पो, तामिळनाडू येथून तोतापुरी २५ क्रेट, मध्य प्रदेश येथून लसणाची सुमारे १५ टेम्पो, इंदूर, आग्रा येथून बटाटा ५० टेम्पो आवक झाली होती.
स्थानिक भागातून झालेल्या आवकमध्ये सातारी आले सुमारे ५०० गोणी, भेंडी ५ टेम्पो, कोबी आणि गवार प्रत्येकी ५ टेम्पो, टोमॅटो १० हजार क्रेट, काकडी ८ टेम्पो, फ्लॉवर, हिरवी मिरची, ढोबळी मिरची, तांबडा भोपळा प्रत्येकी १० टेम्पो, गाजर ३ ते ४ टेम्पो, मटार ३००, घेवडा, शेवगा आणि पावटा प्रत्येकी सुमारे २ टेम्पो, कांदा सुमारे ६० टेम्पो आवक झाली होती.
मेथी महागली
मार्केट यार्डात रविवारी कोथिंबिरीची सुमारे दीड लाख जुडी, तर मेथीची ६० हजार जुडी आवक झाली. मागील आठवड्याच्या तुलनेत कोथिंबिरीची आवक दीड लाख जुड्यांनी घटली, तर मेथीची आवक स्थिर राहिली.
मात्र, पितृपक्षामुळे मागणी वाढल्याने मेथीच्या भावात शेकड्यामागे दोनशे ते तीनशे रुपयांनी वाढ झाली. तरकारी विभागात मेथी वगळता अन्य पालेभाज्यांची आवक आणि मागणी कायम असल्याने सर्व पालेभाज्यांचे दर मागील आठवड्याच्या तुलनेत स्थिर राहिले. घाऊक बाजारात पालेभाज्यांच्या प्रतिजुडीला ३ ते १५ रुपये दर मिळाला, तर किरकोळ बाजारात प्रतिजुडी १० ते २५ रुपयांना विकली जात आहे.