शंकर कवडे
पुणे: पंजाब आणि मध्य प्रदेशातील मटार, तर राजस्थानातील गाजराचा हंगाम सुरू झाल्याने गुलटेकडी मार्केट यार्डात परराज्यांतील मटार आणि गाजराची आवक वाढू लागली आहे. दुसरीकडे, पाण्याच्या तुटवड्याचा फटका काकडीच्या उत्पादनाला बसल्याने आवक घटली असून, रविवारी घाऊक बाजारात काकडीचे दर दुप्पट झाले. किलोमागे १५ ते ३० रुपयांनी काकडी महागली असून, भेंडीच्या भावातही वाढ झाली आहे. परराज्यांसह स्थानिक भागातून शेवग्याची आवक वाढली आहे. तसेच, उत्पादन वाढल्याने फ्लॉवर आणि कोबीचीही बाजारात आवक वाढली. परिणामी, फ्लॉवर, कोबी, शेवगा आणि मटारच्या भावात १० ते १५ टक्क्यांनी घट झाली. बाजारात राज्यासह परराज्यांतून सुमारे १०० ट्रक शेतमालाची आवक झाली.
परराज्यांतून झालेल्या आवकेत बंगळुरू येथून ३ टेम्पो, कर्नाटक, गुजरात, तमिळनाडू आणि आंध्र प्रदेशातून हिरवी मिरची १८ ते २० टेम्पो, कर्नाटकातून कोबी आणि घेवडा प्रत्येकी ४ ते ५ टेम्पो, राजस्थानातून गाजर ५ ते ६ टेम्पो, पंजाब, मध्य प्रदेश आणि हिमाचल प्रदेशातून मटार ८ ते ९ ट्रक, तमिळनाडूतून शेवगा ५ ते ६ टेम्पो, कर्नाटकातून भुईमूग ३ ते ४ टेम्पो, पावटा २ ते ३ टेम्पो, तमिळनाडूतून तोतापुरी कैरी १०० क्रेट, मध्य प्रदेशातून लसूण ८ ते १० टेम्पो, तर इंदूर, आग्रा आणि स्थानिक भागातून बटाट्याची ५० टेम्पो आवक झाली.
स्थानिक भागातून सातारी आल्याची ४०० ते ४५० गोणी, भेंडी ५ ते ६ टेम्पो, गवार ३ ते ४ टेम्पो, टोमॅटो १० हजार क्रेट, हिरवी मिरची ३ ते ४ टेम्पो, काकडी ५ ते ६ टेम्पो, फ्लॉवर १० ते १२ टेम्पो, कोबी ५ ते ६ टेम्पो, गाजर ३ ते ४ टेम्पो, तांबडा भोपळा ८ ते १० टेम्पो, घेवडा २ ते ३ टेम्पो, पावटा २ टेम्पो, तर कांद्याची सुमारे ८० टेम्पो आवक झाली.
फळभाज्यांचे दहा किलोचे घाऊक भाव (रुपयांत) : कांदा : ३७० ते ४५०, बटाटा : ८० ते २००, लसूण : ९०० ते २,५००, सातारी आले : ५०० ते ६००, भेंडी : ३०० ते ५००, गवार : ४०० ते ६००, टोमॅटो : ८० ते १२०, दोडका : ३०० ते ४००, हिरवी मिरची : २०० ते ३००, दुधी भोपळा : १०० ते २००, चवळी : २०० ते २५०, काकडी : ४०० ते ६००, हिरवी कारली : २५० ते ३००, पांढरी कारली : १८० ते २००, पापडी : ४०० ते ५००, पडवळ : १५० ते १६०, फ्लॉवर : ६० ते ८०, कोबी : ६० ते ८०, वांगी : २०० ते ३५०, डिंगरी : ३५० ते ४००, नवलकोल : ५० ते ६०, ढोबळी मिरची : ४५० ते ५००, तोंडली (कळी) : ४०० ते ४५०, तोंडली (जाड) : २०० ते २२०, शेवगा : ३०० ते ६००, गाजर : (स्थानिक) २०० ते ३००, (परराज्य) ५०० ते ८००, वालवर : ४०० ते ४५०, बीट : १५० ते १६०, घेवडा : ४०० ते ६००, कोहळा : १०० ते १५०, आर्वी : २५० ते ३००, घोसावळे : २०० ते २५०, ढेमसे : २५० ते ३००, भुईमूग शेंग : ७०० ते ८००, मटार : ६०० ते ९००, पावटा : ८०० ते ९००, तांबडा भोपळा : ८० ते १५०, तोतापुरी कैरी : १,००० ते १,१००, सुरण : २४० ते २५०, मका कणीस : ५० ते १००.
हिरवागार टपोरा हरभरा बाजारात
थंडीची चाहूल लागताच कोवळा, लुसलुसीत हरभरा बाजारात दाखल होऊ लागला आहे. रविवारी बाजारात हरभऱ्याच्या चारशे ते पाचशे गड्ड्यांची आवक झाली. घाऊक बाजारात शेकडा जुडीला १५०० ते १६०० रुपये भाव मिळाला. याखेरीज, बाजारात रविवारी कोथिंबिरीच्या सुमारे दीड लाख तर मेथी ५० हजार जुड्यांची आवक झाली. मागील आठवड्याच्या तुलनेत कोथिंबीरीची आवक १० हजार जुड्यांनी वाढली तर मेथीची आवक २० हजार जुड्यांनी वाढली. बाजारात पालेभाज्यांच्या जुडीला ५ ते १६ रुपयांचा दर मिळाला. पाण्याच्या तुटवड्याच्या परिणाम पालेभाज्यांच्या उत्पादनावर झाला असून पालेभाज्यांच्या प्रतवारीनुसार दरातील तेजी टिकून असल्याची माहिती पालेभाज्यांचे विक्रेते राजेंद्र सुर्यवंशी यांनी दिली.
पालेभाज्यांचे शेकड्यातील भाव:
(रुपयांत) : कोथिंबीर : १,००० ते १,२००, मेथी : ७०० ते १,२००, शेपू : १,२०० ते १,३००, कांदापात : १,००० ते १,२००, चाकवत : १,००० ते १,२००, करडई : ८०० ते १,०००, पुदिना : ५०० ते ६००, अंबाडी : ८०० ते १,०००, मुळे : १,५०० ते २,०००, राजगिरा : ५०० ते ८००, चुका : ५०० ते ६००, चवळई : ७०० ते ८००, पालक : १,५०० ते २,०००, हरभरा : १,५०० ते १,६००.