

पुणे: उच्च शिक्षणाची सद्य:स्थिती, महाविद्यालयांची संख्या, विद्यार्थी प्रवेश आणि शैक्षणिक सुविधांची माहिती संकलित करण्यासाठी राबविण्यात येणाऱ्या अखिल भारतीय उच्च शिक्षण सर्वेक्षण (एआयएसएचई) कार्यक्रमांतर्गत शैक्षणिक वर्ष २०२५-२६ ची माहिती भरणे राज्यातील महाविद्यालये आणि उच्च शिक्षण संस्थांना बंधनकारक करण्यात आले आहे.
संबंधित माहिती येत्या १० डिसेंबरपर्यंत एआयएसएचईच्या संकेतस्थळावर भरावी, असे निर्देश सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या अंतर्गत गुणवत्ता हमी कक्षाने दिले आहेत. केंद्र सरकारच्या शिक्षण मंत्रालयाकडून देशातील उच्च शिक्षणाबाबत धोरणात्मक निर्णय घेण्यासाठी एआयएसएचईच्या माध्यमातून दरवर्षी माहिती संकलित केली जाते.
त्यानुसार शैक्षणिक वर्ष २०२५-२६ ची आकडेवारी संबंधित महाविद्यालयांनी ऑनलाइन पद्धतीने भरायची आहे. पुणे, अहिल्यानगर आणि नाशिक जिल्ह्यांसह दादरा नगर हवेली येथील विद्यापीठाशी संलग्न महाविद्यालये, स्वायत्त महाविद्यालये आणि मान्यताप्राप्त संस्थांना हे निर्देश लागू आहेत. महाविद्यालयांनी एआयएसएचई पोर्टलवरील डीसीएफ (डेटा कॅप्चर फॉर्म) मध्ये सर्व माहिती पूर्णपणे भरल्यानंतर ऑनलाइन अर्ज सादर करून ना-हरकत प्रमाणपत्र प्राप्त करणे आवश्यक आहे.
तसेच, ज्या महाविद्यालयांना २०२५-२६ मध्ये नव्याने मान्यता मिळाली आहे, त्यांनी संस्थेचे नाव पोर्टलवर समाविष्ट करण्यासाठी नोडल अधिकाऱ्याचे नाव, मोबाईल क्रमांक, महाविद्यालयाचा नोंदणीकृत ई-मेल, शासन निर्णय आणि संलग्नता पत्राची मराठी व इंग्रजी प्रत अपलोड करावी. नूतनीकरणाच्या मान्यतेसंदर्भातील माहितीही पोर्टलवर नोंदवावी लागणार आहे.
माहिती भरण्याची जबाबदारी प्राचार्य आणि नोडल अधिकाऱ्यांवर
माहिती भरण्याची जबाबदारी संबंधित महाविद्यालयांचे प्राचार्य आणि नोडल अधिकाऱ्यांची असेल. माहिती न भरल्यास किंवा नोंदणी न केल्यास भविष्यात उद्भवणाऱ्या अडचणींसाठी संबंधित महाविद्यालये जबाबदार असतील, असे पत्रात स्पष्ट करण्यात आले आहे. त्यामुळे सर्व संलग्न, स्वायत्त आणि मान्यताप्राप्त महाविद्यालयांनी मुदतीपूर्वी माहिती भरून सहकार्य करावे, असे आवाहन विद्यापीठाच्या अंतर्गत गुणवत्ता हमी कक्षाचे संचालक आणि एआयएसएचई नोडल अधिकारी प्रा. डॉ. विनायक जोशी यांनी केले आहे.