Railway  Pudhari
पुणे

Pune Varanasi Amrit Bharat train: पुणे-वाराणसी ‘अमृत भारत’ रेल्वेला मंजुरी; पुणे-जबलपूर गाडी झाली नियमित

हडपसरहून नवी रेल्वे सेवा; प्रवाशांना दिलासा, उत्तर भारताशी थेट कनेक्टिव्हिटी वाढणार

पुढारी वृत्तसेवा

पुणे: केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी रेल्वे मंत्रालयाकडे केलेल्या पाठपुराव्यामुळे पुण्यातून उत्तर भारताकडे जाणाऱ्या दोन महत्त्वाच्या रेल्वेगाड्यांना मंजुरी मिळाली आहे. यामध्ये हडपसर (पुणे) ते बनारस (वाराणसी) यादरम्यान नवीन ‌‘अमृत भारत‌’ रेल्वे सुरू करण्याचा आणि सध्याची पुणे-जबलपूर स्पेशल ट्रेन नियमित करण्याचे दोन मोठे निर्णय घेण्यात आले आहेत. केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी मोहोळ यांना पत्र लिहून यासंदर्भातील अधिकृत मंजुरी कळवली आहे.

पुणे आणि परिसरातून मोठ्या संख्येने भाविक काशी, वाराणसी आणि प्रयागराजला जात असतात. प्रवाशांची ही गरज ओळखून मंत्री मोहोळ यांनी हडपसर ते बनारसदरम्यान नवीन रेल्वे सुरू करण्याची मागणी केली होती. रेल्वे मंत्रालयाने याला सकारात्मक प्रतिसाद देत अमृत भारत या आधुनिक रेल्वेला मंजुरी दिली आहे. ही गाडी हडपसर टर्मिनलवरून सुटणार असून, यामुळे पुणे रेल्वेस्थानकावरील ताण कमी होण्यास मदत होईल आणि प्रवाशांना थेट वाराणसीपर्यंत जलद सेवा मिळेल.

मुरलीधर मोहोळ यांनी दिल्लीत रेल्वेमंत्र्यांची भेट घेऊन या गाड्यांच्या तांत्रिक बाबींवर सविस्तर चर्चा केली होती. प्रवाशांची वाढती संख्या आणि रेल्वेचे अर्थकारण, या दोन्ही बाबी रेल्वे मंत्रालयाला पटवून देण्यात मोहोळ यांना यश आले. या गाड्यांमुळे फक्त पर्यटनच नाही, तर व्यापार आणि रोजगाराच्या संधींनाही चालना मिळणार आहे. लवकरच या दोन्ही गाड्यांचे अधिकृत वेळापत्रक जाहीर होऊन त्या प्रवाशांच्या सेवेत दाखल होतील. त्यामुळे आगामी सुट्यांच्या काळात पुणेकरांचा प्रवास अधिक सुखकर होणार आहे.

खासदार पुण्याचे की जबलपूरचे?

महाराष्ट्राच्या अंतर्गत रेल्वेगाड्या वाढवाव्यात, अशा मागणीकडे दुर्लक्ष करून फारशी मागणी नसलेली पुणे-जबलपूर रेल्वेसेवा सुरू करणारे केंद्रीय राज्यमंत्री, खासदार मुरलीधर मोहोळ हे पुण्याचे की जबलपूरचे? असा सवाल माजी आमदार, महाराष्ट्र प्रदेश काँग््रेासचे वरिष्ठ उपाध्यक्ष मोहन जोशी यांनी पत्रकाद्वारे सोमवारी केला आहे. पुणे-जबलपूर विशेष रेल्वेसेवेला आमचा विरोध नाही. पण, पुणेकरांच्या, महाराष्ट्रातील लोकांच्या मागण्या दुर्लक्षित करून जबलपूरसाठी रेल्वेसेवा सुरू करण्याचा भाजप सरकारचा अट्टहास कशासाठी आहे?, त्यांना कोणाचे राजकारण साधायचे आहे? असे प्रश्न मोहन जोशी यांनी उपस्थित केले आहेत.

महाराष्ट्रातील गाड्यांचे टर्मिनल हडपसर येथे हलविण्यात येत आहे आणि उत्तर भारतात जाणाऱ्या गाड्या पुणे स्थानकावरून सोडल्या जात आहेत. हा भेदभाव धक्कादायक आहे. वर्षानुवर्षे पुण्यातील प्रवासी कोल्हापूर, मुंबई भागांत पुणे स्थानकावरून जात असताना त्यांना त्यासाठी हडपसरला जायला लावण्याचा आटापिटा त्रासदायक आहे, असेही मोहन जोशी यांनी म्हटले आहे.

पुणे ते मुंबई, पुणे ते नाशिक आणि पुणे ते संभाजीनगर अशा जास्त वर्दळीच्या मार्गावर जास्त गाड्या सुरू व्हाव्यात, अशी महाराष्ट्रातील लोकांची मागणी आहे. या मागणीकडे रेल्वे खात्याचे दुर्लक्ष होत आहे. पुण्यातील रेल्वेसेवेत सुधारणा व्हावी, अशी मागणी पुणेकर अनेक वर्षे करीत आहेत. पुणे-लोणावळा लोकल सेवा विस्कळीत आहे, त्यात सुधारणा व्हावी, अशी मागणी प्रलंबित आहे. रेल्वे स्थानकावरील सुरक्षिततेबाबतही पुणेकरांच्या मनात भीती आहे. स्थानकावर अस्वच्छता असते, पिण्यासाठी शुद्ध पाणी मिळत नाही, अशा तक्रारी प्रवाशांच्या आहेत, असेही जोशी यांनी म्हटले आहे.

पुणे-जबलपूर गाडी आता नियमित स्वरूपात धावणार

दुसऱ्या महत्त्वपूर्ण निर्णयात पुणे आणि जबलपूर यादरम्यान धावणारी विशेष गाडी (02131/02132) आता कायमस्वरूपी नियमित केली आहे. यापुढे ही गाडी (20161/20162) पुणे-जबलपूर एक्स्प्रेस म्हणून ओळखली जाईल. ही गाडी नियमित झाल्यामुळे प्रवाशांना आता वर्षभर आगाऊ आरक्षण करणे सोपे होणार असून, विशेष गाड्यांचे जास्त तिकीटदरही कमी होऊन सर्वसामान्यांना दिलासा मिळणार आहे.

पुणे आणि उत्तर भारताला जोडणाऱ्या रेल्वेगाड्यांची मागणी अनेक वर्षांपासून प्रलंबित होती. विशेषतः ज्येष्ठ नागरिकांना काशी-प्रयागराजच्या तीर्थयात्रेसाठी थेट आणि आरामदायी रेल्वे हवी होती. ‌‘अमृत भारत‌’ एक्स्प्रेसच्या मंजुरीमुळे आणि पुणे-जबलपूर गाडी नियमित झाल्यामुळे लाखो प्रवाशांचे स्वप्न पूर्ण झाले आहे. विकासाच्या या कामात नेहमीच सहकार्य करणारे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांचा मी पुणेकरांच्या वतीने आभारी आहे. पुणेकरांच्या सुविधेसाठीचा आमचा हा पाठपुरावा यापुढेही असाच सुरू राहील.
मुरलीधर मोहोळ, केंद्रीय राज्यमंत्री

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT