पुणे: सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाशी संलग्न महाविद्यालयात कागदपत्रांनुसार 2025-26 या वर्षातील पहिल्या हप्त्यासाठी 3 हजार, तर दुसऱ्या हप्त्यासाठी 8 हजारांवर अर्ज प्रलंबित आहेत. त्यामुळे महाविद्यालयांमधील शिष्यवृत्ती अर्ज पुढेच सरकत नसल्याचे स्पष्ट झाले आहे.
उच्च शिक्षण सहसंचालनालयाच्या आदेशानंतरही अर्ज प्रलंबित राहिल्याने विद्यापीठ प्रशासनाने नाराजी व्यक्त केली. डीबीटी डॅशबोर्डनुसार पुणे विभागातील महाविद्यालये, संस्था आणि विद्यापीठस्तरावर अजूनही मोठ्या प्रमाणात अर्ज प्रलंबित आहेत.
विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीचा दुसरा हप्ता वेळेत मिळावा, यासाठी अर्जांची दररोज छाननी करणे अनिवार्य करण्यात आले आहे. कोणत्याही परिस्थितीत अर्ज प्रलंबित ठेवू नयेत, अशी स्पष्ट सूचना देण्यात आली आहे. कागदपत्रांच्या प्रती जमा न झाल्याचे कारण देऊन अर्ज थांबवू नयेत. सर्व प्रलंबित अर्जांची तातडीने छाननी करून मंजुरीसाठी पुढे पाठवावेत, असे आदेश देण्यात आले आहेत.
याशिवाय, प्राचार्य आणि संचालकांनी महाविद्यालयस्तरावर विशेष कॅम्प आयोजित करून अर्जांची पडताळणी पूर्ण करावी. या कॅम्पचा सविस्तर अहवाल संबंधित विभागाला ई-मेलद्वारे सादर करणे बंधनकारक करण्यात आल्याचे विद्यापीठ प्रशासनाने सांगितले आहे.
विद्यार्थ्यांचे नुकसान झाल्यास महाविद्यालय जबाबदार
शिष्यवृत्ती अर्जांच्या पडताळणीत होणाऱ्या दिरंगाईवर लगाम घालण्यासाठी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या प्रशासनाने संलग्न महाविद्यालयांना सक्त सूचना दिल्या आहेत. महाडीबीटी पोर्टलवरील विद्यार्थ्यांचे ऑनलाइन अर्ज तत्काळ तपासून त्यावर कार्यवाही करावी. महाविद्यालयाच्या चुकीमुळे विद्यार्थ्यांचे नुकसान झाल्यास, त्याची जबाबदारी संबंधित महाविद्यालयाची राहणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.